Wednesday, June 24, 2026

आत्मानंद - प्रेमा नरेवाडीकर - 3


                                            मी नववीतून दहावीत गेले माझ्या दादांना खूपच छान वाटत होते की, त्यांची मुलगी शिकते आहे. काहीवर्षांनी  माझ्या भाऊजींची बदली कराडला झाली. त्यांना खोली मिळेपर्यंत आम्ही चौघं ,माझी ताई भाऊजी आणि त्यांची तीन मुलं एवढे त्या एका खोलीत राहत होतो. तरीही त्यावेळी काहीच अडचण वाटली नाही. त्यानंतर त्यांना बुधकर वकिलांच्या चाळीत दोन रूमची खोली भाड्याने मिळाली. ते तिकडे राहायला गेले.    माझी लिलाताई खूप अगत्त्यशील होती. त्यामुळे काल्याहून कराडला येणारे लोक आता आधी ताईकडे जात आणि मग आमच्याकडे येत. तिचाही माझ्यावर खूप जीव होता. मी पहिलीत असल्यापासून नेमके माझ्या रिझल्टच्या वेळी ताई-भाऊजी सुट्टीमुळे कराडला यायचे. माझा रिझल्ट लागला की भाऊजी पैसे काढून द्यायचे आणि म्हणायचे,"जा पेढे आण जा". भाऊजींची पर्सनॅलिटी पाहता स्वभाव रागीट वाटायचा. त्यामुळे आम्ही सगळी भावंडे त्यांना घाबरून असायचो. ते नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असायचे. आम्ही ताईकडे गेलो असताना मी म्हणाले की आम्हाला भगवत गीता शिकवत आहेत मला एक छोटी गीता आणायची आहे. त्यांनी लगेच एक छोटी गीता काढून मला दिली आणि म्हणाले,"ही घे, ही तुझ्या कंपास मध्ये बसेल."मी आठवीत असताना त्यांनी दिलेली ती गीता अजूनही माझ्याकडे आहे. गुरुकृपा म्हणायची दुसरे काय? भाऊजींना आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा. माझी ताई पण सुगरणच होती. मला तिच्या हातचे जेवण खूप आवडायचे, छानच करायची. तिला चार मुलगे आणि एक मुलगी होती. अनंताच्या पूजेला तर आमच्या काकांची फॅमिली,आम्ही सगळे, माझा अण्णा तोही ओगलेवाडीला बदलून आला होता, त्याचे कुटुंब शिवाय तिच्या सासरचे लोक असे सगळे यायचे. एवढ्या सगळ्यांचे ती अगदी मनापासून करायची. हसत मुखाने, कधी दमले बाई म्हणालेली मला आठवत नाही. 

        माझा भाऊ अण्णा, त्याचाही माझ्यावर खूप जीव होता. तो ग्रामसेवक होता आधी तो किन्हईला होता, त्यानंतर वाघोलीला, जिथे जिथे त्याची बदली होईल तिथं तिथं आम्ही जाऊन राहायचो. तिथल्या लोकांना भेटायला न्यायचा त्यांना कौतुकाने ही माझी धाकटी बहीण आणि आई म्हणून ओळख करून द्यायचा. तो ग्रामसेवक असल्यामुळे  त्याला  सगळे अण्णासाहेब म्हणत. तो जिथे जिथे गेला तिथे त्यानेही माणसे जोडली. त्याच्याकडे सुट्टीत महिना पंधरा दिवस आम्ही जाऊन राहत असू. जवळपास जे पाहण्यासारखे असेल तिथे तो आम्हाला दाखवायला न्यायचा. त्याची मित्रमंडळी देखील चहासाठी बोलवत. त्याचाही स्वभाव फार गंमतशीर होता. त्याने भिंतीवर देवांच्या काही फ्रेम्स लावल्या होत्या. तेव्हा तो सांगायचा की हा अमका देव हा तमका देव आणि नंतर तिथे एक कॅलेंडर लावले होते ते दाखवून म्हणायचा आणि हा देव आनंद.  एकदा आम्ही दोघं एका दुकानात काहीतरी आणायला गेलो होतो. तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि म्हणाली की, "एक रुमाल द्या "तेव्हा हा म्हणाला की, "हो हो लवकर द्या. "आणि माझ्याकडे बघून मिश्किल पणे हसत होता. कारण ती मुलगी सारखी नाक फुरफुर करून ओढत होती. तो रिटायर झाल्यावर माझे काका वारले तेव्हा त्याने एक पांढरा शर्ट आणि विजार घातली होती. थोडे इकडच्या तिकडे झाल्यावर मला म्हणाला,"अगं हे कपडे मी कोणाच्या अशा कार्याला जाताना घालायलाच ठेवले आहे, कारण हे शिवल्यापासून सारखे कुणाच्या ना कुणाच्या कार्यालाच जावे लागते आहे". आणि म्हणाला "असं कार्याला का होईना यायचे म्हणजे मला बरा टाईमपास झाला आहे" कारण तो ओगलेवाडीत राहत होता आणि बाकी  सगळे कराडमध्ये. आईचा पण माझ्या सर्व भावंडांवर जीव होता. सख्खे सावत्र असे कधी मनातही आले नाही. एकदा मी आणि आई ओगलेवाडीला अण्णा कडे गेलो होतो, त्याचवेळी तो समोरून येताना दिसला. त्याला पाहून आई म्हणाली,"बघ कसा अमिताभ बच्चन सारखा दिसतोय" कारण तो खूप उंच होता आणि त्याने दाढी वाढवली होती आणि ती पांढरी झाली होती. आमच्या वहिनी नेमक्या बुटक्या आहेत. त्यामुळे त्यांना जया-बच्चन ची जोडी असे म्हणायचो. फक्त अरुणचा सहवास मात्र मला जास्त लाभला नाही. तो पण ग्रामसेवक होता. पण तो लांब कोकणात असायचा. त्यामुळे त्याच्याकडे जाणे झाले नाही तो येईल तेवढाच त्याचा सहवास.

                          विलास आणि सु हे दोघे रिमांड होम मधून बाहेर आल्यावर घरीच होते. आधी विलास आला. त्याचे आणि माझे फार जमायचे. मी पाचवीत गेले तरी तो मला पाठीवर उचलून घ्यायचा. मी सहावीत गेले त्यावर्षी गणिताचे पुस्तक बदलले होते आणि बरीच दुकाने शोधली पण मला काही पुस्तक मिळाले नाही. मग विलास म्हणाला तुझ्या एखाद्या मैत्रिणीचे पुस्तक आण मी लिहून काढतो, त्याचे अक्षरही छान होते. त्याने थोडे लिहायला सुरुवात केली, आणि मग ते पुस्तक मिळाले. त्याने मला सायकल चालवायला शिकवली.  विलास मला सायकल वरून काल्याला घेऊन जायचा. त्याचाही स्वभाव विनोदी होता. दुसरे म्हणजे त्याला एक सवय होती आपण म्हणालो ना,"  जेवण तयार आहे जेवून घे " तर तो म्हणणार "मला आत्ता भूक नाही" आणि एखाद्या वेळेस स्वयंपाक तयार नसेल तर म्हणणार,"मला सिनेमाला जायचे आणि अजून स्वयंपाक तयार नाही". असा उलट वागायचा म्हणून कधी आपण त्याला उलट सांगितले तर मात्र बरोबर सुलट वागायचा. एकदा तो सांगत होता की, हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या वेटरला म्हणालो की,"रवा लाडू दे" वेटर म्हणाला" रवा लाडू नाही ". तर हा म्हणाला मग " गरा लाडू दे ". "तर तो वेटर माझ्याकडे बघून हसला". हा किस्सा त्याने सांगितल्यावर आम्ही सुद्धा खो-खो हसलो आणि त्याला म्हणालो की,"अरे रवा आणि गरा एकच आहे" वडिलांच्या नंतर तो आणि मी एका ताटात जेवायचो. त्याचे मिल्ट्रीतले मित्र त्याला भेटायला यायचे, ते म्हणायचे ,"तुम्ही सावत्र भावंडे आहात यावर विश्वास बसत नाही". एकच खोलीत असल्याने सगळे समोरच असायचे. एकदा विलास त्याच्या एका खेड्यातल्या मित्राकडे जाऊन आला होता. त्यानंतर त्याचा एक मित्र भेटायला आला. तर याने त्याला अण्णांच्या म्हणजे घर मालकांच्या ऑफिसमध्ये बसवले, आणि तिथे नेऊन चहा दिला. सगळे झाल्यावर तो मित्र म्हणाला,"चला आता आईची आणि श्यामाची गाठ घेतो आणि जातो". आणि तो आम्हाला भेटायला घरात आला. तर त्याचे काय झाले होते. खेड्यात मोठी घरे असतात. आणि बायका सहसा बाहेर येत नाहीत हे त्याने त्या खेड्यातल्या मित्राकडे पाहिले होते म्हणून तो पण तसे करायला गेला, पण त्याचा झाला पोपट.  पुन्हा काही तो असले करायच्या भानगडीत पडला नाही. 

         पुढे तो मिलीटरीमधून रिटायर झाल्यावर कोल्हापुरला राजाराम कॉलेजला,सुरक्षा रक्षक म्हणुन कामाला लागला. एकदा त्याच्याकडे कोल्हापूरला आम्ही गेलो होतो. बऱ्याच वर्षात तिथे राहणारी माझी मैत्रीण आशा नाईक हिला भेटले नव्हते. तिचा पत्ता शोधून काढून आम्ही दोघेच तिच्या घरी गेलो. तिने छान पोहे आणि चहा केला. खूप गप्पा मारून घरी आलो. त्यानंतर विलास मला म्हणाला की,"अगं तुझ्या मैत्रिणीने तुझ्यासाठी एक महत्त्वाची वस्तू दिली, थांब मी तुला देतो." आणि त्याने खिशात हात घातला. मला वाटले तिने मला न देता याच्याजवळ एवढे काय बर दिले असेल. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. त्याने त्याची मूठ अगदी अलगद उघडली आणि काय एक छोटासा हरभऱ्या एवढा खडा होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. तर म्हणतो कसा,"अग तिने पोहे खायला दिले होते ना त्यात सापडला मला". मग काय बसलो आम्ही हसत. 

                मी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याच्याकडे गेले होते. वहिनी म्हणाल्या होत्या की मी सगळे करते, तसे त्या हौसेने सगळे करतात. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर रोज सकाळी उठल्यावर विलास मला ताजे ब्रेडचे स्लाईस आणि एक मोठा ग्लास भरून गरम दूध द्यायचा. त्याचे पण माझ्यावर आणि आईवर खूप प्रेम होते. तरीही कधी कधी आमच्यात रुसवे फुगवे अबोला एक एक दोन दोन वर्षे चालायचा, कारण तसं किरकोळच असायचं. पण आईसारखी आण्णाला विचारायची की,"विलास कसा आहे रे? तो सारखा माझ्या स्वप्नात येतो". असे आम्ही सगळे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले होतो. सख्खे सावत्र असले आमच्या डोक्यातही नसायचे. तर असाच एकदा एक वर्षाचा अबोला होता. आणि अण्णाच्या सगळ्यात धाकट्या मुलाचे सोमाचे लग्न होते, त्यासाठी आम्ही सगळे ओगलेवाडी जमलो होतो. लग्न वगैरे झाल्यावर आई अशीच गप्पा मारत बसली होती. मीही तिथेच उभी होते. तेवढ्यात विलास समोरून आला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून नुसता रडत होता. आईच्या पण डोळ्यातून दोन दोन धारा आणि माझ्यापण. आम्ही कोणीच काही बोलत नव्हतो. फक्त अश्रूंचा अभिषेक सुरू होता. अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात आपसूकच पाणी येते. अगदी आताही हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत पुढचे लिहायला दिसेना.                         

    मी आठवीत गेल्यापासून माझा वाढदिवस निदान छोटासा केक आणून साजरा करायला दादांनी सुरुवात केली होती. त्यांचा स्वतःचा वाढदिवस असेल त्या दिवशी मात्र ते म्हणायचे," आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे  सुधारस करतो". त्यांना स्वतःला शिरा, उपीट, भडंग, पिठले एवढेच नाही तर कैरीच्या सीझनमध्ये कैऱ्या आणून त्याचा गुळांबा करायचे. आमच्यात कधी दूध नसले तर, नंदाच्या आई म्हणायच्या "द्या ते दूध त्यात साखर घालून आमच्या नंदाला देते तिला आवडते."त्यांचा नवरा म्हणजे तहसील कार्यालयात होते तेच ते शिंदे भाऊ. त्यांचा स्वभाव पण रागीट होता. मात्र तेही सुट्टी दिवशी किंवा ऑफिस वेळ व्यतिरिक्त आमच्याकडे येऊन बसत. त्यांनाही माझ्या अभ्यासाचे कौतुक वाटायचे. आणि आईच्या स्वयंपाकाचे पण. एकदा आई पुरणपोळी करत असताना ते आले होते, ते त्यांच्या बायकोला म्हणजे नंदाच्या आईंना म्हणाले,"जा बघ शामाच्या आई कशा छान पुरणपोळ्या करत आहेत." तसेच एकदा आई मोदक करत होती तेव्हाही म्हणाले ,"बघ जा शामाच्या आईने किती छान मोदक केले आहेत". त्याही नंतर शिकून तयार झाल्या. नंदाच्या आईंचा पण स्वभाव फार हळवा होता. एकदा त्या जोरजोराने रडत आमच्या आईकडे आल्या, आईला वाटले की भाऊंचे आणि दोघांचे भांडण झाले की काय. नंदाच्या आईंना विचारल्यावर कळले की त्यांचे गावाकडचे चुलते बैलाने मारले त्यामुळे त्यांचे निधन झाले. आईने त्यांना थोडे समजावले. त्यानंतर बरेच दिवसांनी तशाच रडत त्या आमच्याकडे आल्या. आईला वाटले आता काय झाले कुणी गेले की काय? ती म्हणाली,"काय झाले ?"तर त्या म्हणाल्या की भाऊंची "बदली वाईला झाली आहे ". त्यावर आई म्हणाली की," अहो चांगले झाले तुमचे जांब गाव तिथून अगदी जवळ आहे ". तेव्हा नंदाच्या आई म्हणाल्या,"तेच तर आता मला घरी म्हणजे सासरी राहावे लागणार, आणि आमची सासू मला मिश्री घासू देत नाही." यावर आई काय बोलणार तेव्हाही तिने कशीबशी त्यांची समजूत घातली. भाऊंना त्या कोणाच्या घरात गेलेल्या आवडायचे नाही पण आमच्या घरी मात्र आलेले चालायचे. आमच्या मिश्री च्या पुड्या त्या पण बांधयच्या. त्या पैशातून त्यांनी सोने घेतले होते. तेव्हा सोन्याचा दर दीडशे किंवा फार तर अडीचशे रुपये असेल. आईने पण हौसेने सोन्याची एकदाणी केली होती. एकदा नंदाच्या आईंना लग्नाला जायचे होते तेव्हा त्या आईला म्हणाल्या,"तुमची एकदाणी जरा देता का? मला लग्नाला जायचे आहे". आईने ती दिली होती. माझ्या दादांनी त्यावेळी नवीन निघालेली पॉलिस्टर साडी पुण्याहून आईसाठी आणली होती. नंदाच्या आई एक दिवस सिनेमाला निघाल्या होत्या तेव्हा आईला म्हणाल्या की,"तुमची ती नवी साडी मला नेसायला देता का?". आईने दिली. दुसऱ्या दिवशी साडी परत देताना नंदाच्या आई, हसत हसत म्हणाल्या,"तुमच्या साडीचा पायगुण चांगला आहे,"आई म्हणाली," का काय झाले ?. त्या म्हणाल्या,"अहो सिनेमाला गेले तेव्हा मला चाळीस रुपये सापडले,". असा तेव्हा साध्या साध्या गोष्टीत खूप मोठा आनंद मिळायचा. तेव्हा जास्त कपडे कोणाकडेही नसत. मी जेव्हा कॉलेजला जायला लागले तेव्हा वाड्यातल्या बायका नवी साडी आणली की, आवर्जून मला घडी मोडायला देत. ती साडी हलकी आहे की भारी आहे असले मनातही यायचे नाही. नवी साडी मिळाली ना नेसायला हेच खूप झाले. एवढेच नाही तर नवीन साडी किंवा कपडे आणले की, यांना हळदी कुंकवाचे बोट लावून देवापुढे ठेवून मग घालायचे, आणि मोठ्यांना नमस्कार करायचा. तेही सुख वेगळेच.

  पूर्वी पत्र यायची ती सहसा पोस्ट कार्ड उघडे असायचे. घरमालकांची अरुणा बरेच वेळा वाड्याच्या दिंडी दरवाजाजवळ एक कट्टा होता त्यावर बसलेली असायची, पोस्टमन आला की ही कुणाचे असेल ते पत्र घ्यायची. आणि पत्र आपल्या हातात पडायच्या आत सगळा मजकूर आमच्यापर्यंत पोहोचायचा. कारण झेंडा फडकवल्यासारखे ते पत्र फडकावत मजकूर सांगत आम्हाला द्यायची. आता त्या गोष्टीचे हसू येते आहे पण त्यावेळी खूप राग यायचा. तिला सिनेमाचे खूप वेड होते आणि गाण्यांचे पण. नव्या साडीची घडी पण ती सिनेमाला जाताना मोडायची. दुसरे म्हणजे माझे दादा पुण्याला गेलेले असले आणि त्यांचे कुणी मित्र आले की त्यांना वाड्याच्या दारातच सांगायची,"दादा नाहीत घरी ते पुण्याला गेलेत येतील चार दिवसांनी". त्यामुळे दादा घरी नसल्याची खबर वाड्याच्या दारातच त्यांच्या मित्रांना मिळालेली असायची

                   

          माझे दादा अगदी अवलिया होते. सतत काहीतरी उदाहरणे देत असायचे. हे ही विनोदी पद्धतीने. त्यांच्या मित्राची मेहुणी खेड्यातून तिच्या काहीतरी कामासाठी आमच्याकडे नेहमी यायची. तिला बोलताना सवय होती की," मी पण, हंगणे मारले" (म्हणजे टोमणा मारला). मग दादांनी तिचे नावच, हंगणे ठेवले होते. आमची एकच रूम होती आणि बाहेरून आले की थोडासा अंधार वाटायचा, स्पष्ट दिसायचे नाही. त्यांच्या मित्राने एके दिवशी ती मेहुणी येणार असल्याचे सांगितले होते. दादा बाहेरून आल्या आल्या म्हणाले की," हंगणे आले होते का? " मी आणि आई एकदम अवाक झालो कारण हंगणे तर तिथेच बसले होते. नशीब तिला काही समजले नाही. आणि आम्ही हुश्य केले. थोड्याच वेळात त्यांना पण दिसले आणि ते गप्प बसले. त्यानंतर घरमालकांच्या रानातल्या वहिनी असे ज्यांना आम्ही म्हणायचो त्यांना प्रत्येक वाक्यानंतर,"आता का वनवा का का झाला"असे म्हणायची सवय होती. मग त्या बोलायला लागल्या की आधीच दादा,"आता वनवा का का झाला". असे स्वतः म्हणायचे. आम्हाला खूप मजा यायची . बरं समोरच्या माणसाला हे मज्जा करतायेत हे लक्षात पण यायचे नाही. आणि ते आईची पण फिरकी घ्यायचे. आधी जिथे आम्ही राहत होतो तिथे लाखोळे म्हणून राहत होते त्यांची बायको हिची मैत्रीण होती. एकदा तिच्या मुलीचे लग्न होते आणि तिच्याकडे खूप पाहुणे आले होते म्हणून ती आईला म्हणाली की,"मला तुमचे गजराचे घड्याळ आणि बंब देता का?"आईने ते दिले. तेव्हा माझे दादा आईला गमतीने म्हणाले की,"एखाद्या दिवशी तुमचा नवरा जरा उसना देता का म्हटले तर तू मलाही देशील"आई काय बोलणार डोळे मोठे करून गप्प बसायची. कधी दोघांचे कशावरून भांडण झाले तर मला म्हणायचे,".  झांटीपी आहे नुसती ". आणि मला स्वतः सांगायचे की सॉक्रेटिस ची बायको. एकदा विलासने मिल्ट्रीत असताना ताज महाल पाहिला तेव्हा त्यावर चांदण्या कशा चमकतात ते पत्रात लिहिले होते. त्यावर यांनी आमच्या डोळ्यासमोर दिवसा चांदण्यात चमकतात (पैशांची कायम चणचण) असे लिहिले होते.                     

                                            

                  आमच्या दोघांचे एवढे बॉण्डिंग होते की, माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांना माहीत होत्या. माझी एक अलका नावाची मैत्रीण फक्त इयत्ता पाचवी पर्यंत माझ्या वर्गात होती. त्यानंतर तिच्या वडिलांची बदली सांगलीला झाली. पण आम्ही दोघी एकमेकींना पत्र लिहायचो. त्यामुळे सत्तरीला आलो तरी एकमेकींच्या संपर्कात आहोत. तर माझ्या दादांना त्याचेही कौतुक होते. एकदा मला म्हणाले,  " चल मी जयसिंगपूरला कामासाठी जाणार आहे जाताना तुला अलकाकडे सोडतो आणि येताना न्यायला येतो" मला तर खूप आनंद झाला. तेव्हा काही आधी फोन करा कळवा असली भानगड नव्हती. उठायचे की वर तोंड करून जायचे. जाणाऱ्याला जेवढा आनंद व्हायचा, तेवढाच आनंद ज्यांच्याकडे गेलो त्यांनाही व्हायचा. आम्ही दोघे गेलो, मी तिथे दिवस भर थांबणार होते. मग काय तिच्या आईने मला छान जेवू घातले नंतर आम्ही पिक्चर ला गेलो मज्जा मज्जा केली. संध्याकाळी माझे दादा मला न्यायला आले. तिकडून आल्यानंतर मी खूप आजारी पडले मला टायफॉईड झाला, उठवत नव्हते खूप अशक्तपणा आला होता. त्यामुळे अलकाला काही पत्र वगैरे पाठवले नाही. मग तिचे पत्र आले की तू गेल्यापासून पत्र का नाही पाठवले. त्या पत्राला माझ्या दादांनी उत्तर पाठवले की अगं ती खूप आजारी आहे बरी झाली की पाठवेल तुला पत्र. त्यावेळची साधारण पाचवीपासूनची तिची आणि दुसरी एक माझी मैत्रीण उज्वला बुरसे यांची पत्रे मी अजून जपून ठेवली आहेत. माझ्या दादांचे त्यांनी विलासला लिहिलेले 1970 चे एक पत्र मी अजून ठेवले आहे. तीच माझी मैत्रीण उज्वला जवळजवळ वीस वर्षांनी भेटल्यानंतर तिच्या नवऱ्याला सांगत होती की शामा म्हणजे तिच्या दादांचा जीव की प्राण होती. खरोखर माझ्या दादांचे जेवढे प्रेम मला मिळाले ते आज सत्तरी पर्यंत मला पुरले आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ते माझ्या सोबत राहील. एकदा त्या गयावळांच्या बायकोने आम्हाला दोघांना चहा दिला नंतर ती सहज मला म्हणाली जा तेवढ्या कप बशा धुवून आण. अरे बापरे, माझ्या दादांना एवढा राग आला, मला म्हणाले पुन्हा त्यांच्या घरचा चहा सुद्धा नको. यांच्या मुलीला तेही लाडक्या लेकीला काम सांगतात म्हणजे काय. 

                                   त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील सावकार होते, काले गावात खूप मोठा वाडा आणि शेती होती. माझे आजोबा घरजावई होते. पण हे सगळे वैभव गेल्यानंतर ते एका खोलीत राहताना मागच्या वैभवाची आठवण काढून दुःखी झालेले कधीच पाहिले नाही. आहे त्या परिस्थितीत राजासारखे राहत. तेच नव्हे तर माझे काका काकू आणि चुलत भावंडे देखील कधी त्या वैभवाचा उल्लेख करत नसत. आहे त्यामध्ये खुश रहात कधी रडगाणे गात बसायचे नाहीत. माझे दादा आणि माझा भाऊ विलास मला सायकलवरून काल्याला न्यायचे. कराड पासून काले गाव सात किलोमीटर अंतरावर आहे. माझे वडील आजीला भेटायला जाताना मला घेऊन जात. आजी खूप वयस्कर होती आणि ती वडिलांना म्हणायची ,"बाबू मला विहिरीच्या काठावर नेऊन ठेव". त्यावेळी मला त्याचा अर्थ कळायचा नाही. पण ती जीवाला वैतागली होती त्यामुळे तसे म्हणत असेल हे नंतर कळले. माझ्या काकांनी एक कार घेतली होती ते काले ते कराड अशी ट्रिप करत म्हणजे लोकांना ने-आण करत. तेव्हा ते माझ्या वडिलांकडून पण पैसे घेत. त्यावेळी काहीतरी 50-55 पैसे वगैरे असतील. 

                          मला एकच सख्खे काका होते. चुलत काका चार होते आणि चुलत आत्या चार. सगळ्यांची परिस्थिती जेमतेमच होती. फक्त एक मुक्ता आत्या होती, ती खूप श्रीमंत होती तिचा नवरा अकोल्यामध्ये इंजिनियर होता. त्यामुळे ते नातेवाईकांना भेटायला आले की लॉजवर राहत.  विमला आत्या म्हणून होती तिच्या मुलाशी माझ्या मोठ्या बहिणीचे म्हणजे लीला ताईचे लग्न झाले होते. त्यांचे गाव कागल होते. ते माझे भाऊजी ठाण्याला होते. मला सगळ्यात जास्त सहवास विठा आत्या आणि बंडू काकांचा लाभला. बंडू काकांची तर मी खूप लाडकी होते. ते किर्लोस्करवाडीत स्टेट बँकेत शिपाई होते. किर्लोस्करवाडीत सगळ्या कर्मचाऱ्यांना मग बँकेतला असो किंवा किर्लोस्कर कारखान्यातला, त्यांना राहायला स्वतंत्र घरे असत बाजूला मोठे कंपाऊंड आणि स्वतंत्र बाथरूम, तीन रूम. माझे चुलत आजोबा आणि आजी काकांकडे असायचे. विठा आत्या पण किर्लोस्करवाडीत राहत होती पण ती थोडी बाजूला राहायची. बरेच वेळा ती आणि तिची मुले काकांकडे असायची. मला काकांचे ते घर खूप आवडायचे. शिवाय ती आजी पण सुगरण होती. छान छान स्वयंपाक करायची. त्या आजोबांना पण चवीचे खायला लागायचे. त्यामुळे ते पुरणपोळी असेल त्या दिवशी आधीच खपली गहू आणून ते दळून वापरायला लावत, आणि बजावत आज काकडी कोचू नका नाहीतर कणिक बिघडेल. त्यावेळी किर्लोस्करवाडीला जायचे म्हणजे रेल्वेने जावे लागेल. ते एक अट्रॅक्शन होते. काका माझ्यासाठी कराडला येत आणि मला घेऊन काल्याला जात. नेहमी माझ्या हातून लॉटरीचे तिकीट काढत. दुर्दैवाने कधी लागले नाही ती गोष्ट वेगळी. त्यांनी मला स्टुडिओमध्ये नेऊन त्यांच्याबरोबर माझा एक फोटो पण काढला होता. तेव्हा असे उठता बसता फोटो काढता यायचे नाही त्यामुळे फोटोचे खूप अप्रूप असायचे. काकांना कुणी विचारले की ' काय कसे काय चालले आहे?"तर ते हसून म्हणत "चलती का नाम गाडी". तेव्हा त्या नावाचा किशोर कुमारचा एक सिनेमा आला होता. मी मोठी झाल्यावर सुद्धा आणि माझे वडील गेल्यानंतर सुद्धा मी आणि आई काकांकडे माझ्या अभ्यासासाठी महिना महिना जाऊन राहायचं. तिथे त्या आत्याची संजीवनी नावाची मुलगी माझ्या एवढीच होती त्यामुळे मला तिथे करमून जायचे. 

             माझ्या दादांना सोव्हिएत देशाविषयी फार प्रेम होते. त्यांनी कुठून एक लेनीनचा फोटो आणून फ्रेम करून घरात लावला होता. शिवाय आमच्याकडे सोव्हिएत नावाचे एक मासिकही यायचे. त्यांचे एक किरपे  गावचे देवकर म्हणून मित्र होते. धोतर फेटा असा त्यांचा पेहराव होता. माझे दादा त्यांना सर स्ट्राफोर्ड क्रिप्स असे म्हणत. हे स्टाफोर्ड  स्क्रिप्स  कोण हे मला अद्यापही कळले नाही. काल्याचे एक  बटू अण्णा म्हणून आमच्याकडे येत ते उंच होते. आमची शनिवारातली खोली छोटी होती पण तिला दोन दारे  होती. मागच्या दाराची उंची  फार कमी होती. ते बटू अण्णा आले की मागचे दार कमी उंच आहे हे त्यांच्या लक्षात यायचे नाही. आणि दर वेळेस त्यांचे टक्कल असलेले डोके चौकटीला धडकायचे. माझे दादा म्हणायचे,,"बटू अण्णा बाहेर जाताना चौकट थोडी बाहेर ढकलतात आणि आत येताना आत ढकलतात." 

                            बरेच वेळा दादा  मुंबईला जात असत. माननीय यशवंतराव चव्हाण त्यांचे मित्र होते. कोणाची मुले शिकली कि  त्यांना नोकरी साठी ते त्यांच्याकडे घेऊन जात. माझ्या दादांचा पेहराव म्हणजे नेहरू शर्ट आणि पायजमा. एकदा म्हणे दादा  अशाच एका मुलाला घेऊन चव्हाणसाहेबांकडे गेले होते. यांचा पेहराव पाहून तिथल्या शिपायाने यांना अडवले. तेव्हा माझे दादा म्हणाले,"जा यशाला जाऊन सांग बाब्या आलाय म्हणून". त्या शिपायाने आत जाऊन सांगितल्यावर स्वतः यशवंतरावजी यांनी बाहेर येऊन माझ्या वडिलांना मिठी मारली. अर्थात हा किस्सा मला त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या माझ्या एवढ्याच मुलीने म्हणजे वासंतीने सांगितला. ते मित्र म्हणजेच काल्याचे यशवंतराव पाटील त्यांना सगळे मास्तर म्हणत. कारण अगदी नोकरीच्या सुरुवातीलाच ते गांधी चळवळीत उतरल्यामुळे त्यांची शिक्षकाची नोकरी गेली होती. पण त्यांची पत्नी सुगंधाबाई शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या, त्यांना आम्ही बाईच म्हणत असू. त्या काळात कोणी स्त्रिया नोकरी करत नव्हत्या. या सुगंधाबाई शाळेमध्ये शिक्षकी पेशा सांभाळायच्या आणि गृहिणी म्हणून घरी नेहमी डोक्यावर पदर ,कपाळाला मोठे कुंकू ,आणि नऊवारी साडी. येणाऱ्या जाणाऱ्या चे अगत्याने करत. मला तर त्या शिक्षिकेपेक्षा कर्तव्यदक्ष गृहिणी जास्त वाटल्या, तेच त्यांचे आरोप माझ्या मनावर ठसले आहे. सातवी होऊन शिक्षिका झालेल्या त्या रिटायर होईपर्यंत विस्तार अधिकारी पदावर पोहोचल्या होत्या. त्यांची खास आठवण म्हणजे त्या पंचायत समितीमध्ये मीटिंगसाठी येत त्यावेळी पांढऱ्या स्वच्छ कपड्यात बांधून ज्वारीची भाकरी आणि तुरीचा डाळ कांदा हमखास आमच्याकडे येताना घेऊन येत. आणि म्हणत," पदरात आपली भाकरी असलेली बरी" ती त्यांची शिदोरी आणि डाळ कांदा अजून मला चवी सहित आठवतो आहे. दुसरी एक त्यांची खास आठवण म्हणजे, कधीही काल्याला मुक्काम झाला आणि सकाळी उठल्यावर दात घासताना लगेच चूळ भरायला गरम पाणी द्यायच्या. एकदा माझ्या दादांनी मुंबईहून त्यावेळी नवीन निघाली होती ती हॅन्डबॅग आणली होती. केव्हा काल्याचे  यशवंत मास्तर आले होते ,त्यांनाही आम्ही दादा म्हणायचो. यांनी त्यांना कौतुकाने ही बॅग दाखवते, तेव्हा ते म्हणाले छान आहे, मी आता कोकणात मुलीकडे चाललो आहे तेव्हा जाताना नेतो आल्यावर परत देईन. ते घेऊन गेले . मुलीकडून येताना त्यांनी त्या बॅगेतून कोकणातला फणस आणला आणि नव्या ब्यागेची वाट लागली.तोही किस्सा दादा मजेने सांगत बसले. त्यांचा स्वभावच गंमतशीर होता. 

                    आमच्या मिश्रीच्या कारखान्यात एक भामाबाई नावाच्या खूप जाड अशा बाई यायच्या, नऊवारी साडी, छान अंबाडा अशा त्या होत्या. त्याही लक्षात राहण्याचे कारण म्हणजे त्या सांगायच्या त्यांच्या शेजारी विद्यार्थी भाड्याने राहतात. त्यांचे डबे खेड्यातून बस मधून येतात. ती मुले बरेच वेळा राहिलेली भाकरी टाकून देत. भामाबाई त्या मुलांना म्हणायच्या मुलांनो त्या भाकरी टाकू नका त्या मला द्या. त्या घेऊन भामाबाई पत्र्यावर छान वाळवायचा  आणि त्यांचा चुरा करून त्यामध्ये कांदा कोथिंबीर घालून मस्त फोडणी करायच्या. हे वर्णन त्या इतके छान करायच्या की, ऐकून तोंडाला पाणी सुटायचे. नेहमी म्हणायच्या "मोत्यासारखे लेणे नाही". आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी सायरा बानू चे' दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे 'हे गाणे सारखे रेडिओवर लागलेले असायचे. त्या भामाबाई मिश्री पुडीत भरता भरता म्हणायच्या ,"जाण जा की तिकड काय पण आम्हाला कशाला विचारतोस?". आम्हाला हे ऐकताना खूप मजा वाटायची.

                         माझ्या वडिलांना गाणी ऐकायला आवडायची. आम्हाला मात्र त्याचा कंटाळा यायचा. माझ्या भावाने विलासने मिल्ट्रीतून एक रेडिओ आणला होता, त्यावर कधी कधी,'आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है 'हे गाणे लागायचे ते त्यांना फार आवडायचे. दुसरे मिलन मधील ,'सावन का महीना पवन करे शोss र 'तर पुढे ,'अरे बाबा शोर नही  सोsss र '. हे पण गाणे त्यांना आवडायचे. आणि पुढची ओळ ते रिपीट करायचे. अगदी मनमौजी होते. तेव्हडेच  संवेदनशील होते. मी लहान असताना आम्ही तिघे जेवत होतो आणि माझे दादा अचानक उठून उभे राहिले आणि म्हणाले, "आपली लता गेली, माझ्या डोळ्यासमोर लख्खन वीज चमकली ". लता म्हणजे माझी दोन नंबरची मोठी बहीण. डॉक्टरांनी सांगितले होते की हिच्या हृदयाला छिद्र आहे त्यामुळे हिचे लग्न करू नका. पण काही दिवसांनी तिने हट्ट केला की माझे काहीही होऊ दे एखाद्या गरिबाशी माझे लग्न करून द्या. तिचे लग्न केले होते आणि ती नाशिक मध्ये होती. आणि डिलिव्हरी च्या वेळेस ती गेली. ती नाशिक मध्ये आम्ही कराडमध्ये देव जाणे त्यांना तो दृष्टांत कसा झाला. कारण ते खरेच घडले होते. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते एक तर पोस्टात फोन घ्यायचा किंवा तार यायची.            

           . 

 मी दहावी  तून...अकरावीत गेले. दादा तर अजून खुश झाले. माझी पूर्व परीक्षा जवळ आली होती त्यामुळे अभ्यास सुरू होता. तरीही दादांबरोबर बाहेर जाणे काही  बंद नव्हते. मी त्यांची काठी होते ना. ऑगस्ट आठ ला माझा वाढदिवस होता म्हणून त्यांनी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली होती. पण काय झाले कोण जाणे केक काही मिळाला नाही. त्यांच्या मनात पाल चुकचुकली असे का व्हावे?. कारण मी नववीत असताना त्यांना अटॅक येऊन गेल्यापासून जरा काही घडले की मनात शंका यायच्या, असं का झालं बरं. साधारण 18 19 ऑगस्टला माझ्या दादांना परत हार्ट अटॅक आला. डॉक्टर एरम नि त्यांना बेड रेस्ट सांगितली होती. अगदी या कुशीवरून त्या कुशीवर पण वळायचे नाही म्हणून सांगितले होते. त्यांना चैन पडत नव्हता. माझे काका-काकू, भाऊ, माझी ताई सगळे जमले होते. एवढे आजारी असूनही दादा मला अभ्यास कर म्हणत होते. आणि आईला ज्या गोळ्या सांगलीच्या डॉक्टरांनी दिलेल्या त्यांची नावे सारखी घेत होते. ती नावे अजूनही मला आठवतात.  आई हात हातात घेऊन सारखे म्हणायचे की,"मी तुमच्या दोघींसाठी काहीच ठेवले नाही आता तुमचे कसे होणार?". आई म्हणायची,"आधी तुम्ही बरे व्हा मग बघू काय करायचे ते." कारण मिश्रीचा कारखाना हे आमच्या उपजीविकेचे साधन होते, आणि आई कधी घराबाहेर पडली नव्हती. पण दैवा पुढे कोणाचे काय चालणार? 21 ऑगस्टला त्यांना खूप त्रास व्हायला लागला. नेमका त्याच वेळी बल्ब गेला आणि ते स्वतःच म्हणाले "गेला बल्ब". त्यानंतर घशातून घरघर आवाज यायला लागला तेव्हाही म्हणाले," आता घरघर लागली". आणि माझे दादा मला पोरकी करून निघून गेले. अण्णाची तरी रोज एक फेरी असायची. त्याचाही संसार होता, नोकरी होती. आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची.  मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि मग अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली. तेव्हा त्यांनी तिला सगळी माहिती सांगितली. आप्पा म्हणाले," आमच्या घरातल्या बायकांना ड्राफ्ट म्हणजे काय हेही माहिती नाही". खरंतर त्या बायकांचा काय दोष, त्यांनी काही विचारले असते तर यांनी थोडेच सांगितले असते. साधा डोक्यावरून पदर खाली पडला तर म्हणायचे खिळा ठोकला पाहिजे म्हणजे पदर राहील डोक्यावर. ते काहीही असले तरी माझ्या आईला सगळ्यांनी भावाप्रमाणे धीर दिला. आईने कधी नातेवाईकांकडे तर हात पसरला नाहीच पण ओळखीच्या कुणाकडे देखील उसने कधी काही मागितले नाही.

          वाड्यात एकूण चार नळ होते शिवाय बाहेर एक जास्तीचा नळ होता. नंबर लावायची पद्धत होती. आणि तिथेच कपडे धुण्यासाठी दगड ठेवलेले होते, त्यामुळे एकावेळी चार चार बायका बसून नळाचे पाणी घेऊन तिथेच धुणे धुत गप्पा मारत बसत. धबक धबाक करत धुणे धुवायला मजा यायची. मला कधी कसला राग आलेला असला की मी जरा जास्तच धबाक धबक करायची जेणेकरून पाणी आजूबाजूला उडावे आणि तिथेच कपड्याबरोबर राग पण धुवून निघायचा . त्यामुळे कपडे आणि मन दोन्ही स्वच्छ व्हायचं. पाणी सकाळी एक दोन तास असायचे तेवढ्यात धुणे धुऊन, प्यायचे पाणी आणि वापरायचे पाणी भरून ठेवायचे. चांगला व्यायाम व्हायचा. त्या पाण्याच्या वेळात कोणीही आले तरी पाणी भरून झाल्याशिवाय कोणीच लक्ष द्यायचे नाही. आम्ही गमतीने म्हणायचो,"पाण्याच्या वेळात मुख्यमंत्री, पंतप्रधान नव्हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तर त्यालाही म्हणतील थांब बाबा आमचे पाणी भरून झाले की बघू तुझ्याकडे ". खूप मजा यायची. 

       पुढे कॉलेजला असताना माझी मैत्रीण आशा नाईक ओगलेवाडीहून अभ्यासासाठी नेहमी माझ्याकडे राहायला यायची तशी ती एकदा आली होती. आम्ही  वाड्यातल्या काही बायकांसहित चतुर्थी दिवशी कोटातल्या गणपतीला अगदी लवकर उठून जायचो. आम्हाला वाटायचे पहिला हार आमचा पडला पाहिजे. आशा आली होती तेव्हा दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे जाणार होतो. पण आशा म्हणाली मी घरीच थांबते. कारण ती उशिरा उठणार होती. पण विशेष म्हणजे आम्ही परत येईपर्यंत तिने नंबरने पाणी भरून ठेवले होते याचे आम्हाला नवल वाटले. दुसरे म्हणजे दर चतुर्थीला मी एक गणपतीच्या मंदिरा समोर असणाऱ्या लॉटरीच्या स्टॉल वरून तिकीट घ्यायचे 50 पैशाचे. आणि प्रत्येक वेळेस मला फक्त एक रुपयाचे तिकीट लागायचे. आशा नेहमी माझ्याकडे राहायला यायची. आणि आमच्या घरी उन्हाळ्यात खूप गरम व्हायचे त्यावेळी फॅन वगैरे तर नव्हता मी तर कॉट खाली झोपायचे. आशाला जास्त गरम झाले की ती टॉवेल ओला करून अंगावर घ्यायची. आम्हाला सकाळी उठायला नको वाटायचे त्यामुळे आम्ही रात्री तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचो. असेच एकदा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसल्यामुळे आम्हाला दोघींना उन्हाळे लागले. मग आईने आम्हाला दूध पाणी एकत्र करून त्यामध्ये वेलची पूड घालून खाली वर करून दिले. आशाचाही माझ्यावर खूप जीव होता. एकदा मी आजारी पडले होते आणि बरी झाल्यावर तिच्याकडे राहायला गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींकडून तिने माझी दृष्ट काढून घेतली होती. तिचे आई-वडील आणि भाऊ बहिणी सगळेच प्रेमळ होते. त्यांचे गाव  गोव्याकडील सावंतवाडी होते. त्यांच्या घरी गोव्याकडची भाषा बोलली जायची आणि मला ती खूप आवडायची. आशा मुळे मी  जुने हिंदी सिनेमे खूप पाहिले. आमचे कॉलेज सकाळी असायचे. आम्ही शेवटचा पिरियड बुडवून मॅटीनिला जायचो. मॅटिनी बारा वाजता असायची. धावत पळत बस ने जाताना आशा देवाला म्हणायची," देवा तिकीट मिळू दे तुला साखर ठेवी ठेवीन". एकदा तिला मी विचारले," आशे, दर वेळेस देवाला साखर ठेवीन म्हणतेस खरेच ठेवतेस का ग?"त्यावर,"हो तर". असं ती म्हणाली. खरं खोटं देवच जाणे . 

                      आमचा कॉलेजमधला एक ग्रुप होता. मी आशा नाईक , हाजरा शेख, आणि सावित्री आठवले. पण आमचे काही विषय वेगळे होते, जे विषय कॉमन होते त्याला आम्ही एकत्र बसायचो. माझा स्पेशल विषय इंग्लिश होता .आणि माझा स्वभाव भित्रा होता त्यामुळे या तिघी मला माझ्या क्लासरूम पर्यंत सोडायला यायच्या. आता त्या गोष्टीचे मला हसू येते आहे. माझ्या घरी अभ्यास करायला अडचण पडायची म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हाजराच्या घरी अभ्यासाला जायचो तिला आम्ही शेखी म्हणायचो. तिचा बंगला मोठा होता. चारी बाजूला मोकळी जागा आणि छान बाग होती. आम्ही त्या बागेत बसून चौघीजणी अभ्यास करायचो. कधी कधी सुट्टी दिवशी आम्ही शिवाजी हायस्कूलमध्ये अभ्यासाला  जायचो. तिथला एक वयस्कर शिपाई आमच्या ओळखीचा होता तो आम्हाला एखादी क्लासरूम उघडून द्यायचा. आम्ही डबे वगैरे घेऊन तिथे अभ्यास करायचो. कधी कधी बेंचेस जोडून आळीपाळीने डुलकी पण काढायचो. आता या घडीला सगळे मजेशीर वाटते आहे. 

                      आमचे कॉलेज सकाळी असायचे आणि पावणे सातच्या बसने जावे लागायचे. माझा कॉलेजमधला दुसरा एक इंग्लिश डिपार्टमेंटचा ग्रुप होता. यामध्ये छाया करमरकर, माधवी दातार, सिंधू मोहोळकर, कुंजन कुलकर्णी जी आटपाडीची होती. आम्हाला सगळे पंचकन्या म्हणत. आमच्या दोन ग्रुप पैकी आता हाजरा, माधवी. आणि सिंधू हयात नाहीत. कधी कधी मी छायाच्या घरी पण अभ्यासाला जायची आणि कधी सिंधूच्या घरी पण जायची. छाया चे घर पण मोठे होते. तिचे वडील डॉक्टर होते आणि माधवीचे पण. छाया नेहमी गाडीने कॉलेजला यायची. कधीकधी ती कॉलेजमधल्या ऑफिस मधून घरी फोन करायची. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते त्यामुळे आम्हाला कौतुक वाटायचे. मात्र परमेश्वरी कृपेने कधीच कुणाचा हेवा वाटला नाही. वर्षातून एकदा गॅदरिंग असायचे तेव्हा मात्र शेखीचा भाऊ जाफर आम्हाला गाडीतून कॉलेजला सोडायचा कारण गॅदरिंग रात्रीच्या वेळी असायचे. गाडीतून जाताना खूप भारी वाटायचे. एरवी आमचा सगळा प्रवास साध्या बसने असायचा कधी आराम बस नाही. पण त्याचीही कधी खंत वाटली नाही. परमेश्वराने गरजेनुसार वेळोवेळी सगळे काही पुरवले त्यासाठी त्याचे नेहमीच आभार मानते. 

     छायाला एक सवय होती, वर्गात पुढे बसलेल्या मुलीच्या साडी वरचे डिझाईन ती वहीवर काढायची. त्यातले एक अजूनही माझ्याकडे आहे. साधारण 1976-77 मधले असेल. तिला व्हाट्सअप ला फोटो काढून पाठवला तर तिलाही विशेष वाटले. कॉलेजमधली अजून एक मज्जा म्हणजे त्यावेळी आम्ही मुलं मुली एकमेकांशी अजिबात बोलायचो नाही. अगदी गल्लीतला मुलगा असला तरी. काही मुले परगावची असायची. त्यांचे डबे बस ने यायचे त्याचे आम्हाला विशेष वाटायचे. असे असले तरी कॉलेजच्या इलेक्शनच्या वेळी मात्र बरीच मुले घरी म्हणजे घराबाहेर आली होती प्रचार करायला. मुलांपैकी एक सीआर असायचा आणि मुलींपैकी एल आर असायची. गॅदरिंगच्या वेळी फिश पाँड प्रकार होता. सगळे काही लक्षात नाहीत पण एका मुलीचे नाव छबी होते तिला,'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी ', एक भडकमकर नावाचे सर होते ते अतिशय बारीक होते त्यांना 'इथे ओशाळला बोर्नविटा' असे फिश्पाँड पडलेले आठवतात. दुसरे म्हणजे गॅदरिंगच्या दिवशी  एल आर जे त्यावेळी मागेल ते देण्याची पद्धत होती. एल आर स्टेजवर आली आणि तिने काय मागितले हे काही आम्हाला कळले नाही पण बरीच जण बाजूला पळत सुटली. आम्हाला वाटले काय झाले काही संकट तर नाही ना? आम्ही सुद्धा पळण्याच्या सावध पवित्रात बसलो. तेवढ्यात कळले की दुसरे काही नाही एल आर ने सायकलच्या पुंगळ्या मागितल्या. त्यामुळे ज्यांच्या सायकल्स होत्या ते पुंगळ्या वाचवायला आणि ज्यांच्या नव्हत्या ते पुंगळ्या काढायला पळाले होते. हा प्रकार समजल्यावर आम्हाला हसू आवरेना. एकंदरीत ते दिवस फुलपाखरी होते, ना कसली जबाबदारी ना कसली काळजी फक्त अभ्यास एके अभ्यास. एका सेमिस्टरला मला आणि आशाला अगदी एकसारखे म्हणजे काहीतरी 67 पॉईंट 50 म्हणजे वरचे पॉईंट पण सारखे पडले होते. 

        आशाने एक कविता केली होती. मग मी पण एक हिंदी कविता केली आमच्या कॉलेजचा वार्षिक अंक होता,'हिरवळ 'त्यामध्ये आमच्या </div>कविता छापून आल्या होत्या. शेखीने पण एक कविता दिली होती. गंमत म्हणजे ते एक हिंदी गाणे होते पण कोणी काही त्यावर आक्षेप घेतला नाही. शेखीची आई जरा स्वभावाने कडक होती. त्यामुळे आम्ही थोडे जपून असायचो. तरी ती प्रेमळ होती. तिचे वडील खूप प्रेमळ होते. मी बँकेचे- पोस्टाचे व्यवहार करायची त्याचे त्यांना फार कौतुक वाटायचे. आमचे ग्रॅज्युएशन झाल्यावर मी एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला जाणार आहे असे सांगितल्यावर, हाजराला ते म्हणाले तू पण जा शामा बरोबर आणि तू पण एम्प्लॉयमेंट कार्ड काढ. अर्थात तिला काही गरज नव्हती. पण तिलाही थोडी माहिती व्हावी म्हणून त्यांनी तिला सांगितले. तिच्या हातात सतत सोन्याच्या कंगन, पाटल्या, गोठ वगैरे असायच्या त्यांचा आवाज मला खूप आवडायचा. तिचा स्वभावही खूप विनोदी होता. आम्ही रस्त्याने जाताना समोरच्या व्यक्तीबद्दल अगदी मोठ्याने ती विनोदी काहीतरी बोलायची, मला हसू आवरायचे नाही आणि ही निरागस चेहरा करून चालत असायची. तिला मी म्हणायची ,"अगं त्या माणसाला काय वाटेल ?"तर म्हणायची, त्याला काय कळणार आपण त्याच्याबद्दल बोलतोय का कुणाबद्दल ते". 

                           माझे एम ए पूर्ण झाल्यावर मी नोकरीसाठी प्रयत्न करायला लागले. त्यावेळी आई अगदी तहसील कार्यालयातला शिपाई असला तरी त्यालाही म्हणायची, "माझ्या मुलीसाठी एखादी नोकरी बघा हो". मला काही ते आवडायचे नाही. तहसील कार्यालयात आईला दीडशे आणि मला पन्नास रुपये असे माझे लग्न होईपर्यंत किंवा मला 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत मिळणार होते. सुरुवातीला तहसील कार्यालयात जाऊन ती पेन्शन घ्यावी लागायची. तिथे एक तानाजी माने नावाचे क्लार्क होते. तेही स्वभावाने चांगले होते. एकदा मी त्या कार्यालयाच्या जाहिरातीवरून रेकॉर्ड रूम मध्ये डेली वेजेस नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या मानेंना मी हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की,"तुलाही नोकरी नक्की मिळेल पण तू ती करू नकोस".

          वडील गेल्यानंतर आईला व मला मिळणारी दोनशे रुपये पेन्शन, आईची शिलाई आणि मला वर्षातून एकदा मिळणारी स्वातंत्र्यसैनिकांची स्कॉलरशिप यावर आमचा दोघींचा उदरनिर्वाह चालू होता. मला वर्षातून एकदा मिळणारे सातशे वीस रुपये आम्ही बँकेत ठेवायचो. कॉलेजला वार्षिक उत्पन्नाचा दाखला देताना मी आठ हजार की काहीतरी उत्पन्न दाखविले होते. आमच्या सरांनी मला बोलावून विचारले की एवढे कमी उत्पन्न तुमचे असे वाटत नाही. त्यावर मी त्यांना सांगितले की त्यापेक्षा कमी कसे दाखवायचे म्हणून तर मी तेवढे दाखवले आहे, खरं तर तेवढेही नाही. त्यांना मी खरी परिस्थिती सांगितली होती. कॉलेजला असताना मला फक्त दोनच साड्या होत्या त्यावेळी खटावच्या वायल मिळत. माझ्या मैत्रिणी मला विचारत ,"तू रोज साड्यांना इस्त्री करतेस का?". त्यांना मी सांगायची की,"माझी आई साडी धुवून व्यवस्थित वाळत घालते आणि नंतर छान घडी करून ठेवते". तेव्हा घरी इस्त्री पण नव्हती.. माझे शिक्षण होऊन वर्ष होत आले तरी नोकरीचा काही चान्स दिसेना. मी नेहमी पेपर मध्ये जाहिराती पाहून अर्ज करायची आणि तो रजिस्टर ने पाठवायची. मला बाहेर जायला नकोसे वाटायचे त्यामुळे घरमालकांचा शरद होता त्याच्याजवळ ते सगळे तयार करून द्यायची. असे बरेच अर्ज मी पाठवले होते. पण एकाचेही काही पुढे झाले नाही. नंतर नंतर तर रजिस्टरचा खर्चही फार वाटायला लागला त्यामुळे पोस्टात असणाऱ्या रजिस्टर वरच नोंद करून अर्ज पाठवायला लागलो. 

              एकदा घरमालकांचा शरद परगावी गेला होता. त्याचवेळी झेडपीची जाहिरात पेपर मध्ये आली .तो फॉर्म भरून दोन दिवसात पाठवायचा होता. मग काय एका दिवसात आम्ही मायलेकी त्या मानेंकडे अर्ज कसा भरायचा इथपासून ते तो पाठवेपर्यंत सकाळ पासून संध्याकाळपर्यंत घरातून फक्त चहा पिऊन बाहेर होतो. तेव्हा रिक्षा वगैरे काही नव्हत्या सगळीकडे पायपीट करत फिरत होतो. घरी येऊन आदल्या दिवशीची होती ती भाकरी आणि चटणी खाऊन शांत बसलो. त्या अर्जावर पण काही लवकर उत्तर येईना. 

  शेवटी एकदाचा  साध्या पोस्टकार्ड वर पण छापील स्वरूपात इंटरव्यू चा कॉल आला. इंटरव्यू सातारा झेडपी मध्ये होता. त्यापूर्वी मी हाजराच्या घरी गेले होते. त्यांचे रोजे सुरू होते. तिच्या बाबांना ही बातमी सांगून  नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले ,"श्यामा आज माझा 27 वा रोजा आहे, माझा तुला आशीर्वाद आहे की ही नोकरी तुला मिळणार". सगळीकडून असा ग्रीन सिग्नल होता तरीही धाक धुक होतीच. कारण यापूर्वी मी खूप अर्ज केले होते आणि एकाचेही उत्तर आले नव्हते. त्या मानेंच्या ओळखीचे एक शिंदे साहेब म्हणून होते. ते झेडपी मध्ये अकाउंट ऑफिसर होते. इंटरव्यूला जाशील तेव्हा त्या शिंदे साहेबांना भेट असे माने यांनी सांगितले होते. मी आणि आई सातारा झेडपी मध्ये गेलो होतो पण त्यावेळी त्या शिंदे साहेबांना आधी भेटावे हे काही लक्षात आले नाही. इंटरव्यू झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी इंटरव्यू कसा झाला वगैरे विचारले, तेव्हा त्यांना सगळे सांगितले. इंटरव्यू च्या वेळेस आतून जो मुलगा किंवा मुलगी बाहेर येत होती त्यांना आम्ही लाईन मध्ये बसलेले विचारत होतो काय विचारले म्हणून? इंटरव्यूला औरंगाबादचे 10 जण होते ते आलटून पालटून प्रश्न विचारत होते. मला जास्त काही नाही एक दोन प्रश्न विचारले होते ते म्हणजे स्त्रियांसाठी कोणी काम केले मी,"महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महात्मा फुले" ही नावे सांगितली होती. नंतर त्यांनी विचारले की,'मनी इज अ सोर्स ऑफ ऑल हॅपिनेस' या वाक्याचे भाषांतर सांगा मी म्हणाले की,"पैसा हे सर्व सुखाचे साधन आहे". झाले एवढेच. परमेश्वराने त्यावेळी मला बुद्धी दिली शिवाय माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद. मला ही नोकरी मिळाली ती दादांच्या कृपेमुळेच असे मला मनोमन वाटते. कारण त्या औरंगाबाद निवड मंडळांनी स्वातंत्र्य सैनिकांची मुलगी म्हणूनही मला प्राधान्य दिले असावे. कारण तशी सर्टिफिकेट जोडण्याबद्दल जाहिरातीत उल्लेख होता. मी माझ्या वडिलांच्या सन्मान पत्राची हाताने लिहून सर्टिफाइड केलेली कॉपी त्याला जोडली होती, त्यावेळी झेरॉक्स मशिन नव्हते. इंटरव्यू झाल्यावर आम्ही त्या शिंदे साहेबांना भेटून चालत चालत निघालो. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांचा ड्रायव्हर हाका मारत आला. तो म्हणाला," तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे म्हणून". आम्हाला वाटले आता काय झाले? गेलो परत त्यांच्याकडे. ते म्हणाले,"अगं तुझा इंटरव्यू चा नंबर वगैरे काही सांगितला नाहीस". तो मी त्यांना दिला. त्यानंतर चार दिवसांनी आम्ही शिंदे साहेबांना भेटायला गेलो कारण ते कराडमध्येच राहत होते. त्यांना विचारले तर ते म्हणाले,"तुझा इंटरव्यू तर चांगला झाला आहे". तेवढेच समाधान वाटले. आता प्रतीक्षा ऑर्डरची होती. कधी कॉल लेटर येते म्हणून वाट पाहत होतो. दहा महिने झाले तरी काही ते आले नाही. कोणी म्हणायचे की आणखी दोन महिने झाले तर ते काही येणार नाही. मग मन खूप उदास व्हायचे. पण आशा काही सुटायची नाही. 

          कराडमध्ये एक गुजराती गृहस्थ होते, ते भविष्य सांगत असत. माझ्या आईच्या मैत्रिणीने म्हणजे दिलीपच्या आईने एकदा तिला त्यांच्याकडे नेले होते. त्यांच्यावर तिचा विश्वास होता.एकदा आई त्या गुजराती काकांकडे गेली आणि म्हणाली की,"जरा माझ्या मुलीच्या लग्नाचे किंवा नोकरीचे काही जमेल का बघता का?". त्यावर त्यांनी थोडा वेळ शांत बसून सांगितले की,"लग्नाचा तर काही सध्या योग दिसत नाही पण तिला बरोबर 21 दिवसात नोकरीचा योग आहे". आईने मला त्यांच्याकडून आल्यावर हे सांगितले. मी म्हणाले,"आज एप्रिल ची तीस तारीख आहे बघूया किती खरे ठरते ते". आणि अशीच साधारण महिन्याभराने आईने भजी केली नाही म्हणून मी चिडून कॉटवर पडले होते. तेवढ्यात घरमालकांचा जयंत आला, तो म्हणाला,"अगं झोपलीस काय तुझे नाव मी झेडपीच्या ऑर्डर मध्ये पाहिले". तेव्हा निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि आमच्या गल्लीतला थोरात म्हणून एक मुलगा उपोषणाला बसला होता, त्यामुळे तिथेच त्याच्या हातात ऑर्डर दिली होती. आणि हा जयंत कशासाठी तरी तिथे गेला होता आणि त्याने ते पाहिले. ती बातमी ऐकल्यानंतर जो आनंद झाला तो काय  वर्णावा. अगदी सिनेमात पाहतो तसे वाटले. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी मे महिन्याची 21 तारीख होती वर्ष होते 1980. त्या गुजराती काकांनी सांगितलेले भविष्य अगदी खरे झाले होते. कारण ऑर्डर वर 22 मे 1980 तारीख होती आणि ती मला रजिस्टर ने मिळणार होती. पण मला मिळणार ते पण आधीच कळले. जयंत म्हणाला,"समोरच्या वाड्यातल्या मुळकांच्या मुलाला सांगू की ते रजिस्टर लवकर आणून दे म्हणून" कारण तो पोस्टात होता. पण कसले काय पोस्टात माझ्या दादांचे यादव नावाचे मित्र होते. ते त्याला म्हणाले,"तिलाच इकडे पोस्टात यायला सांग". पोस्ट जवळच होते. मग मी पाच रुपये घेऊन पोस्टात गेले. ते यादव म्हणाले" पेढे दे ". तेव्हा मी म्हणाले,"हे काय पेढ्यासाठी पाच रुपये घेऊन आले आहे". तेव्हा ते म्हणाले,"असू दे असू दे आधी जाऊन हजर हो मग बघू पेढ्याचे". मग काय ऑर्डर घेऊन आले तरंगतच घरी. त्या गुजराती काकानी सांगितल्याप्रमाणे 21 व्या दिवशी ते पत्र आले. 

           काहीवर्षांनी  माझ्या भाऊजींची बदली कराडला झाली. त्यांना खोली मिळेपर्यंत आम्ही चौघं ,माझी ताई भाऊजी आणि त्यांची तीन मुलं एवढे त्या एका खोलीत राहत होतो. तरीही त्यावेळी काहीच अडचण वाटली नाही. त्यानंतर त्यांना बुधकर वकिलांच्या चाळीत दोन रूमची खोली भाड्याने मिळाली. ते तिकडे राहायला गेले.           माझी लिलाताई खूप अगत्त्यशील होती. त्यामुळे काल्याहून कराडला येणारे लोक आता आधी ताईकडे जात आणि मग आमच्याकडे येत. तिचाही माझ्यावर खूप जीव होता. मी पहिलीत असल्यापासून नेमके माझ्या रिझल्टच्या वेळी ताई-भाऊजी सुट्टीमुळे कराडला यायचे. माझा रिझल्ट लागला की भाऊजी पैसे काढून द्यायचे आणि म्हणायचे,"जा पेढे आण जा". भाऊजींची पर्सनॅलिटी पाहता स्वभाव रागीट वाटायचा. त्यामुळे आम्ही सगळी भावंडे त्यांना घाबरून असायचो. ते नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असायचे. आम्ही ताईकडे गेलो असताना मी म्हणाले की आम्हाला भगवत गीता शिकवत आहेत मला एक छोटी गीता आणायची आहे. त्यांनी लगेच एक छोटी गीता काढून मला दिली आणि म्हणाले,"ही घे, ही तुझ्या कंपास मध्ये बसेल."मी आठवीत असताना त्यांनी दिलेली ती गीता अजूनही माझ्याकडे आहे. गुरुकृपा म्हणायची दुसरे काय? भाऊजींना आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा. माझी ताई पण सुगरणच होती. मला तिच्या हातचे जेवण खूप आवडायचे, छानच करायची. तिला चार मुलगे आणि एक मुलगी होती. अनंताच्या पूजेला तर आमच्या काकांची फॅमिली,आम्ही सगळे, माझा अण्णा तोही ओगलेवाडीला बदलून आला होता, त्याचे कुटुंब शिवाय तिच्या सासरचे लोक असे सगळे यायचे. एवढ्या सगळ्यांचे ती अगदी मनापासून करायची. हसत मुखाने, कधी दमले बाई म्हणालेली मला आठवत नाही. 

        माझा भाऊ अण्णा, त्याचाही माझ्यावर खूप जीव होता. तो ग्रामसेवक होता आधी तो किन्हईला होता, त्यानंतर वाघोलीला, जिथे जिथे त्याची बदली होईल तिथं तिथं आम्ही जाऊन राहायचो. तिथल्या लोकांना भेटायला न्यायचा त्यांना कौतुकाने ही माझी धाकटी बहीण आणि आई म्हणून ओळख करून द्यायचा. तो ग्रामसेवक असल्यामुळे  त्याला  सगळे अण्णासाहेब म्हणत. तो जिथे जिथे गेला तिथे त्यानेही माणसे जोडली. त्याच्याकडे सुट्टीत महिना पंधरा दिवस आम्ही जाऊन राहत असू. जवळपास जे पाहण्यासारखे असेल तिथे तो आम्हाला दाखवायला न्यायचा. त्याची मित्रमंडळी देखील चहासाठी बोलवत. त्याचाही स्वभाव फार गंमतशीर होता. त्याने भिंतीवर देवांच्या काही फ्रेम्स लावल्या होत्या. तेव्हा तो सांगायचा की हा अमका देव हा तमका देव आणि नंतर तिथे एक कॅलेंडर लावले होते ते दाखवून म्हणायचा आणि हा देव आनंद.  एकदा आम्ही दोघं एका दुकानात काहीतरी आणायला गेलो होतो. तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि म्हणाली की, "एक रुमाल द्या "तेव्हा हा म्हणाला की, "हो हो लवकर द्या. "आणि माझ्याकडे बघून मिश्किल पणे हसत होता. कारण ती मुलगी सारखी नाक फुरफुर करून ओढत होती. तो रिटायर झाल्यावर माझे काका वारले तेव्हा त्याने एक पांढरा शर्ट आणि विजार घातली होती. थोडे इकडच्या तिकडे झाल्यावर मला म्हणाला,"अगं हे कपडे मी कोणाच्या अशा कार्याला जाताना घालायलाच ठेवले आहे, कारण हे शिवल्यापासून सारखे कुणाच्या ना कुणाच्या कार्यालाच जावे लागते आहे". आणि म्हणाला "असं कार्याला का होईना यायचे म्हणजे मला बरा टाईमपास झाला आहे" कारण तो ओगलेवाडीत राहत होता आणि बाकी  सगळे कराडमध्ये. आईचा पण माझ्या सर्व भावंडांवर जीव होता. सख्खे सावत्र असे कधी मनातही आले नाही. एकदा मी आणि आई ओगलेवाडीला अण्णा कडे गेलो होतो, त्याचवेळी तो समोरून येताना दिसला. त्याला पाहून आई म्हणाली,"बघ कसा अमिताभ बच्चन सारखा दिसतोय" कारण तो खूप उंच होता आणि त्याने दाढी वाढवली होती आणि ती पांढरी झाली होती. आमच्या वहिनी नेमक्या बुटक्या आहेत. त्यामुळे त्यांना जया-बच्चन ची जोडी असे म्हणायचो. फक्त अरुणचा सहवास मात्र मला जास्त लाभला नाही. तो पण ग्रामसेवक होता. पण तो लांब कोकणात असायचा. त्यामुळे त्याच्याकडे जाणे झाले नाही तो येईल तेवढाच त्याचा सहवास.

                          विलास आणि सु हे दोघे रिमांड होम मधून बाहेर आल्यावर घरीच होते. आधी विलास आला. त्याचे आणि माझे फार जमायचे. मी पाचवीत गेले तरी तो मला पाठीवर उचलून घ्यायचा. मी सहावीत गेले त्यावर्षी गणिताचे पुस्तक बदलले होते आणि बरीच दुकाने शोधली पण मला काही पुस्तक मिळाले नाही. मग विलास म्हणाला तुझ्या एखाद्या मैत्रिणीचे पुस्तक आण मी लिहून काढतो, त्याचे अक्षरही छान होते. त्याने थोडे लिहायला सुरुवात केली, आणि मग ते पुस्तक मिळाले. त्याने मला सायकल चालवायला शिकवली.  विलास मला सायकल वरून काल्याला घेऊन जायचा. त्याचाही स्वभाव विनोदी होता. दुसरे म्हणजे त्याला एक सवय होती आपण म्हणालो ना,"  जेवण तयार आहे जेवून घे " तर तो म्हणणार "मला आत्ता भूक नाही" आणि एखाद्या वेळेस स्वयंपाक तयार नसेल तर म्हणणार,"मला सिनेमाला जायचे आणि अजून स्वयंपाक तयार नाही". असा उलट वागायचा म्हणून कधी आपण त्याला उलट सांगितले तर मात्र बरोबर सुलट वागायचा. एकदा तो सांगत होता की, हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या वेटरला म्हणालो की,"रवा लाडू दे" वेटर म्हणाला" रवा लाडू नाही ". तर हा म्हणाला मग " गरा लाडू दे ". "तर तो वेटर माझ्याकडे बघून हसला". हा किस्सा त्याने सांगितल्यावर आम्ही सुद्धा खो-खो हसलो आणि त्याला म्हणालो की,"अरे रवा आणि गरा एकच आहे" वडिलांच्या नंतर तो आणि मी एका ताटात जेवायचो. त्याचे मिल्ट्रीतले मित्र त्याला भेटायला यायचे, ते म्हणायचे ,"तुम्ही सावत्र भावंडे आहात यावर विश्वास बसत नाही". एकच खोलीत असल्याने सगळे समोरच असायचे. एकदा विलास त्याच्या एका खेड्यातल्या मित्राकडे जाऊन आला होता. त्यानंतर त्याचा एक मित्र भेटायला आला. तर याने त्याला अण्णांच्या म्हणजे घर मालकांच्या ऑफिसमध्ये बसवले, आणि तिथे नेऊन चहा दिला. सगळे झाल्यावर तो मित्र म्हणाला,"चला आता आईची आणि श्यामाची गाठ घेतो आणि जातो". आणि तो आम्हाला भेटायला घरात आला. तर त्याचे काय झाले होते. खेड्यात मोठी घरे असतात. आणि बायका सहसा बाहेर येत नाहीत हे त्याने त्या खेड्यातल्या मित्राकडे पाहिले होते म्हणून तो पण तसे करायला गेला, पण त्याचा झाला पोपट.  पुन्हा काही तो असले करायच्या भानगडीत पडला नाही. 

         पुढे तो मिलीटरीमधून रिटायर झाल्यावर कोल्हापुरला राजाराम कॉलेजला,सुरक्षा रक्षक म्हणुन कामाला लागला. एकदा त्याच्याकडे कोल्हापूरला आम्ही गेलो होतो. बऱ्याच वर्षात तिथे राहणारी माझी मैत्रीण आशा नाईक हिला भेटले नव्हते. तिचा पत्ता शोधून काढून आम्ही दोघेच तिच्या घरी गेलो. तिने छान पोहे आणि चहा केला. खूप गप्पा मारून घरी आलो. त्यानंतर विलास मला म्हणाला की,"अगं तुझ्या मैत्रिणीने तुझ्यासाठी एक महत्त्वाची वस्तू दिली, थांब मी तुला देतो." आणि त्याने खिशात हात घातला. मला वाटले तिने मला न देता याच्याजवळ एवढे काय बर दिले असेल. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. त्याने त्याची मूठ अगदी अलगद उघडली आणि काय एक छोटासा हरभऱ्या एवढा खडा होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. तर म्हणतो कसा,"अग तिने पोहे खायला दिले होते ना त्यात सापडला मला". मग काय बसलो आम्ही हसत. 

                मी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याच्याकडे गेले होते. वहिनी म्हणाल्या होत्या की मी सगळे करते, तसे त्या हौसेने सगळे करतात. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर रोज सकाळी उठल्यावर विलास मला ताजे ब्रेडचे स्लाईस आणि एक मोठा ग्लास भरून गरम दूध द्यायचा. त्याचे पण माझ्यावर आणि आईवर खूप प्रेम होते. तरीही कधी कधी आमच्यात रुसवे फुगवे अबोला एक एक दोन दोन वर्षे चालायचा, कारण तसं किरकोळच असायचं. पण आईसारखी आण्णाला विचारायची की,"विलास कसा आहे रे? तो सारखा माझ्या स्वप्नात येतो". असे आम्ही सगळे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले होतो. सख्खे सावत्र असले आमच्या डोक्यातही नसायचे. तर असाच एकदा एक वर्षाचा अबोला होता. आणि अण्णाच्या सगळ्यात धाकट्या मुलाचे सोमाचे लग्न होते, त्यासाठी आम्ही सगळे ओगलेवाडी जमलो होतो. लग्न वगैरे झाल्यावर आई अशीच गप्पा मारत बसली होती. मीही तिथेच उभी होते. तेवढ्यात विलास समोरून आला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून नुसता रडत होता. आईच्या पण डोळ्यातून दोन दोन धारा आणि माझ्यापण. आम्ही कोणीच काही बोलत नव्हतो. फक्त अश्रूंचा अभिषेक सुरू होता. अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात आपसूकच पाणी येते. अगदी आताही हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत पुढचे लिहायला दिसेना.                            

            दादा असताना स्वातंत्र्य सैनिक पेन्शन चा काहीतरी जीआर आला होता, त्यासाठी एक वर्षाची कैद ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भोगली त्यांना पेन्शन मिळणार होती. त्यासाठी त्यांनी जिथे जिथे कैद झाली होती तिथले दाखले मागवले होते. त्यांची कैद एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त होती. पण काही ठिकाणाहून रेकॉर्ड उपलब्ध नाही असे पत्र आले होते. पण तरीही जेवढे दाखले मिळाले होते ती एक वर्षाची होती. त्यांचे निधन झाले त्यामुळे तात्पुरते सानुग्रह अनुदान म्हणून सरकारकडून एकूण पाच हजार रुपये मंजूर झाले होते. माझ्या वडिलांचे मित्र राजाराम पाटील म्हणून होते त्यांनाही गोष्ट कळली. त्यांनी सचिवालयात जाऊन सांगितले की हे पैसे तुम्ही त्यांना एक रकमी देण्यापेक्षा दरमहा ठराविक रक्कम द्या. आणि त्या लोकांनी पण दरमहा 100 रुपये असे तहसील कार्यालयात पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी हेही नसे थोडके, तेवढाच ' बुडत्याला काडीचा आधार '. कारखान्यातील मालापासून तयार केलेले मिश्रीचे  पुडे विक्रीसाठी पाठवले पण लोकांनी पैसे बुडविले. आधी चे जे  मटेरियल होते त्याचे पैसे द्यायचे होते. आईला वाटले होते की हे सगळे विकून झाल्यावर ते पैसे देता येतील, पण पैसे आलेच नाहीत. जयसिंगपूरहून त्या माणसाचे सारखे, तगादे यायला लागले की पैसे पाठवा म्हणून. आई तर हतबल झाली होती. एक दिवस त्यांचे पत्र आले की मी समक्ष येऊन जे असेल ते जप्त करतो, त्याप्रमाणे तो माणूस एक दिवस आला. घरातले जुजबी सामान पाहून त्याला परिस्थितीची कल्पना आली. आणि तो आल्या पावली काहीही न बोलता परत गेला. त्यानंतर त्याने कधीही पैसे मागितले नाहीत. आईने मग शिलाई वरच भिस्त ठेवली. कसेतरी दिवस पार पडत होते. दादा गेले त्यावर्षी तर मी अकरावीत नापासच झाले. शरदनेच रिझल्ट आणला होता. मी तर अगदी निराश झाले. पण सगळ्यांनी समजावल्यावर मी पुन्हा तयारीला लागले. आईला मिळणारे पाच हजार रुपये संपल्यावर ते मिळणारे पैसे बंद झाले. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवांना मिळणाऱ्या पेन्शन साठी दादांचे जवळचे मित्र रामजी पाटील (ज्यांना मी आप्पा म्हणते) त्यांनी तिला अर्ज करायला सुचवले वेळोवेळी सातारला येऊन मार्गदर्शनही केले. तिने स्वतः पण कोर्टात जाऊन अ‍ॅफिडेव्हीट करून, कोर्टासमोर जे काही करावे लागेल ते केले. माझी वाघीण आई सगळीकडे बेधडक एकटी लढत होती. मी एवढी अकरावी झाले तरी मला अजिबात मॅच्युरिटी नव्हती. जेवढी आत्ता माझ्या बारा वर्षाच्या नातीला काव्याला आहे. माझे दादा 1970 मधे गेले आणि 1972 ला आईला शंभर रुपये आणि मला 50 रुपये वयाचे 24 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत मंजूर झाले. ते मंजुरीचे पत्र आले तेव्हाही अरुणा बाहेर होती. त्या पत्रावर आड्नाव चुकीचे होते . तिने तिथेच पोस्टमनला सांगितले की इथे कोणी मोरेवाडीकर रहात नाही. पण आधी आईचे नाव  होते. आणि आईने हे ऐकले होते ती म्हणाली,"ते माझेच पत्र आहे आडनाव चुकले आहे ते मी ऑफिसमधून दुरुस्त करून आणेन". नशीब ते रजिस्टर पत्र असल्यामुळे आईच्या सहीसाठी आमच्यापर्यंत आले. तहसील कार्यालयातील ते माने होतेच, त्यांना आईने विचारले तेव्हा ते म्हणाले सातारच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. मग माझी वाघीण निघाली त्या मोहिमेवर तेही एकटीच. तेव्हा सातारचे ऑफिस राजवाड्यामध्ये भरत होते. तिथे गेल्यावर ऑफिस मधला क्लार्क म्हणाला,"द्या इकडे मी ते दुरुस्त करून देतो". त्यावर आई म्हणाली,"नको, ते जिथून आले आहे तिथेच पाठवा ". त्यावेळी हे तिने मला सांगितले होते पण मला त्याचे काही विशेष वाटले नव्हते. पण आता विशेष वाटते कारण माझी आई कशीबशी चौथीपर्यंत शिकलेली होती. आणि तिला हे कसे सुचले असेल. त्यानंतर ते पत्र दुरुस्त होऊन आले. ती पेन्शन केंद्र सरकारने मंजूर केलेली होती. नंतर राज्य सरकारने पण शंभर रुपये दरमहा आईला  पेन्शन मंजूर केली. दोन्ही पत्रे इंग्लिश मध्येच होती. आईला इंग्लिश येत नव्हते. पण कसे कोण जाणे कधी कशासाठी पत्र लागले तर ती बरोबर हे केंद्र सरकारचे हे राज्य सरकारचे असे म्हणून शोधून द्यायची. त्याचे मात्र मला तेव्हाही कौतुक वाटायचे, आणि नेहमीच वाटते. घरमालकांचे सगळे भाऊ तिला बहिणीचा मान देत. पैकी आप्पा सगळ्यांच्या वतीने तिच्याकडून भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला न चुकता ओवाळून घेत. आणि त्यांच्या घरातील मुले माझ्याकडून ओवाळून घेत. त्यापैकी सुरेश नेहमी मला 50 पैशाचे लॉटरीचे तिकीट ओवाळणी मध्ये द्यायचा. आप्पांचा रवी अगदी चार-पाच वर्षांचा होता. तो पण माझ्याकडून ओवाळून घ्यायला आला. ओवा आल्यावर त्याने मला खिशातून 50 पैसे काढून ओवाळणी दिली. मी म्हणाले,'"अरे नको काही देऊस मोठा झाल्यावर दे काय द्यायचे ते". पण तो काही ऐकेना. शरद मात्र काही ना काही विशेष वस्तू देत असे. फक्त भाऊबीज आणि राखी पौर्णिमेला नाही तर माझ्या वाढदिवसाला देखील आवर्जून काहीतरी विशेष भेट देई. त्यासाठी त्याला कुठून पैसे मिळाले असतील हेही विचारले नाही.  मी मात्र करंटी त्याचा वाढदिवसही लक्षात ठेवला नाही.

            आईसारखीच ही इतर कमी शिकलेली माणसेही खूप हुशार होती. म्हणजे आईला पेन्शन मंजूर झाली त्यापूर्वी त्यांनी तिच्या जन्माचा दाखला मागितला होता. यापूर्वी त्याची कधीच गरज पडली नव्हती. तिचा जन्म पाटण तालुक्यातला. पुन्हा मानेंना विचारले ते म्हणाले,"पाटण तहसील कार्यालयात अर्ज द्यावा लागेल." तेव्हा नेमके नरसिंहपुरचे आबासाहेब पाटील आमच्या वाड्यात राहायला होते त्यांचे मेहुणे पाटण तहसील कार्यालयात होते. मग त्यांनाच पत्र लिहायचे ठरले. तेव्हा घरमालक आण्णंनी सुचवले की, 1930 नंतरचे आणि 1935 च्या आधीचे रेकॉर्ड चेक करावे लागेल. आणि आईचा जन्म 19 ऑगस्ट 1932 चा होता. या गोष्टीचेही त्यावेळी विशेष वाटले नव्हते पण आता नवल वाटते आहे. मनोमन अण्णा नाही नमस्कार करते आहे. तसेच माझे दादा गेल्यानंतर वाड्यात आम्हाला जी सुरक्षितता मिळाली त्याचे ऋण आम्ही आयुष्यात विसरणार नाही. कारण माझे दादा गेले तेव्हा मी सतरा वर्षांची आणि आई फक्त 38 वर्षांची होती.

              आणखी एक प्रसंग म्हणजे एकदा कसल्या तरी निवडणुका होत्या. त्यामध्ये दोन उमेदवार आमच्या दादांचे मित्र होते. एक होते शामराव मुळीक पैलवान आणि दुसरे होते जिरगे. तेव्हाही घरमालक आप्पा आमच्याकडे आले आणि आईला म्हणाले,'तुम्ही त्या अमक्याला मत द्या". आई म्हणाली,"हो  मी देईन त्यांना मत" त्यावर अप्पा म्हणाले,"नुसते हो नाही तो देवाचा तांब्या घ्या, त्यावर हात ठेवून हो म्हणा". ही म्हणाली," मुळीच नाही, मी एकदा शब्द दिलाय ना तो मी खरा करेन". अशी स्पष्टवक्ती होती ती. मला त्यावेळी भीती वाटलेली, पण आप्पांनी कधी त्या गोष्टीचा आकस मनात ठेवला नाही. तसेच माझे दादा गेल्यानंतर एकदा अप्पा आले आणि म्हणाले की,"दादांनी मला सांगितले आहे की त्या सोनाराकडे त्यांनी आईची एकदाणी गहाण ठेवली आहे, ती आपण आणूया". ते परत आणण्याएवढे पैसे आमच्या जवळ होते. एकदा मला कॉलेजला पास काढायला पैसे नव्हते. त्यावेळी फक्त नऊ रुपये मध्ये कराड स्टॅन्ड ते विद्यानगर असा पास मिळायचा. तेव्हा मात्र आईने घर मालकांकडून नऊ रुपये घेतले होते. धन्य ते घर मालक आणि धन्य ते  भाडेकरू. कधीही असे जाणवले नाही की ते घर मालक आणि आम्ही भाडे करू. असा जिव्हाळा आणि असे प्रेम पुन्हा कधी अनुभवायला मिळाले नाही.

            त्यांच्यातली आणखी एक व्यक्ती म्हणजे अण्णांचा शरद. तो इकडून तिकडून यायचा आणि आमच्या दाराजवळच भिंतीवर जो आरसा होता त्यामध्ये भांग पाडत उभा राहायचा. कधी कधी त्याच्याशी जास्त संवादही नसायचा. एकदा असेच डॉक्टर शांताराम पोतदार हे अमचे काल्याचे स्नेही कधी कधी आमच्याकडे येत ते आले आणि दारात उभे राहिले. आम्ही दोघी पोळ्या लाटत होतो. एकीने लाटायची आणि दुसरीने भाजायची असे आमचे सुरू असायचे. तर ते शांताराम पोतदार येऊन दारात उभे होते आणि आम्हाला वाटले नेहमीप्रमाणे शरद असेल म्हणून आम्ही पाहिले नाही. तेव्हा ते आश्चर्याने म्हणाले,"मी पाच मिनिटे झाले इथे उभा आहे आणि तुमचे लक्ष नाही". तेव्हा कुठे आम्ही पाहिले आणि त्यांना म्हणालो की आम्हाला वाटले नेहमीप्रमाणे शरदच आहे.".

           शरद चा मित्र सुरेश लाटे म्हणून होता त्याचे दुकान मंडईत होते. शरद त्याच्याकडे दिवसातून दहा वेळा जायचा. आणि मधून मधून आईला विचारायचा,"तुमची तपकीर आणायची आहे का ?"आणि येता जाता घेऊन यायचा. तेव्हा कोणाकडे फ्रिज मिक्सर गॅस असे काही नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यात कोणी आमच्याकडे आलेले दिसले की शरद विचारायचा,"लिंबू आणायचे आहे का?"आणि घेऊन यायचा. तो जसा काही आमच्या घरातलाच सदस्य होता. एकदा मी काल्याला यशवंत मास्तरांच्या वासंतीकडे एक दोन दिवस राहायला गेले होते. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी शरद हजर, म्हणाला,"तुला आईने बोलावले आहे, तुझे मामा आले आहेत." माझे सख्खे मामा तेव्हा मुंबईत टॅक्सी चालवायचे आणि कधीतरी गावाकडे आले की आईला भेटायला कराडला यायचे. पाच भावंडांमध्ये दोन मामा आणि दोन मावश्या यामध्ये माझी आई तीन नंबरची होती पण का कुणास ठाऊक ही सगळ्यांची लाडकी होती.



Tuesday, June 16, 2026

आत्मानंद - प्रेमा नरेवाडीकर - 2

           मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. तेव्हा आम्हाला शाळेने कराड मधील मुतालिक वाडा आहे तिथे नेले होते. तिथे एक जण आम्हाला मुलांना गोष्ट सांगत होते.,'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'. तर ते गृहस्थ मला खूप आवडले. त्यानंतर ते एक दिवस चाळीतील कुणाकडे तरी आले होते, मी त्यांना कुठे पाहिले हे विसरून गेले होते. मी तिथेच खेळत होते. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर का कुणास ठाऊक मला वाटले की हे माझ्या दादांचे मित्र आहेत. त्यामुळे मी दोन-तीनदा त्यांना म्हणाले की माझे दादा घरी आहेत. त्यांनाही वाटले कोण हिचा दादा आहे बघूया. मला म्हणाले चल तुझ्या दादांकडे. मी त्यांच्याबरोबर घरी आले माझे दादा दाढी करत होते, हे गृहस्त दादांकडे आणि दादा त्यांच्याकडे बघत होते प्रश्नार्थक नजरेने. शेवटी ते गृहस्थ दादांना म्हणाले की अहो तुमची मुलगी दोन तीनदा मला म्हणाली की आहेत माझे दादा घरी. ते दोघे एकमेकांना ओळखतही नव्हते. त्यानंतर गंमत म्हणून माझे दादा सगळ्यांना हे सांगत होते म्हणून मला माहिती झाले. कारण त्या दोघांना एकमेकांना भेटवून मी कधीच खेळायला पळाले होते. त्यांची फंकी पोझिशन करून. पण कसलाही प्रसंग हाताळण्यात माझे दादा हुशार होते.  

          मी चौथीत गेले तेव्हा तिथेच जवळ एक मुलगा होता, तो पाच पैसे घेऊन एक पुस्तक थोड्या वेळासाठी</div> वाचायला द्यायचा. तेव्हा मुलांसाठी वेगळी पुस्तके नसत. मी जी पुस्तके वाचायचे ती जादूची पुस्तके असत, म्हणजे याचा जीव पोपटात किंवा आणखी कुठल्यातरी पक्षात. तरी त्यावेळी ते आवडायचे. माझी नात हॅरी पॉटर सारख्या पुस्तकांच्या सेरीज च्या सेरीज वाचते आहे. मला वाटते तिला पण चौथीपासून वाचनाची जास्त आवड लागली. विशेष म्हणजे इथे मुलांसाठी खूप छान छान पुस्तके उपलब्ध आहेत. लायब्ररी सगळ्यांना मोफत आहे, एकावेळी चार चार पुस्तके सुद्धा मिळतात. शिवाय शाळेत देखील लायब्ररी आहे तिथूनही सात सात पुस्तके आणता येतात. आणि ही पटापट वाचून काढते. वर्षातून एकदा शाळेत दहा की बारा पुस्तके ठराविक वाचायला देतात आणि त्यावर प्रश्न विचारून त्यांचा रिव्ह्यू घेतात. आणि ज्यांनी अशी पुस्तके वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे दिली त्यांना 'लँगली बुक ऑफ द इयर' म्हणून एक मेडल देतात. काव्याकडे अशी दरवर्षीची मेडल्स आहेत. आता तर तिला त्याचे काही विशेष वाटत नाही. 

           मी चौथीतून पाचवीत गेले आणि आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. मला शिवाजी विद्यालय कराड या शाळेत घातले. मी पाचवीत गेले आणि त्याचवेळी शासनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या शालेयवयीन मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली. माझ्या सात भावंडांपैकी मला ही संधी मिळाली. मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती दहा रुपये होती त्यापैकी ॲडमिशनची दोन रुपये कापून घेऊन आठ रुपये मला दिले होते. आहाहा काय तो आनंद वर्णवा. जिन्यावरून मी अगदी फुलपाखरासारखे नाचत खाली वर करत होते. आता लाखोंची उलाढाल होते आहे पण त्यावेळी ते आठ रुपये मिळाल्याचा आनंद शब्दातीत होता. पाचवी ते सातवी पर्यंत दहा रुपये, आणि आठवी ते अकरावी पर्यंत 120 रुपये वर्षातून एकदा मिळत. आम्ही तिथल्या तिथे एकूण चार घरे बदलली होती. हा परिसर म्हणजे राज महाल टॉकीजच्या जवळचा आणि स्टँडच्या पूर्वेचा होता. तिथे एक मोठी वखार होती त्याचे मोठमोठे झाडाचे ओंडके पडलेले असायचे. त्याच्या  साली लांब लचक निघत. त्या काढणे हा आमचा मुलांचा एक खेळ होता आणि त्या ओंडक्यांवर चढणे हाही. तिथे घरे थोडी अंतर राखून होती. तिथेही मला मित्र-मैत्रिणी मिळाले. या घरापासून सुद्धा शाळा जवळच होती, अगदी बेल वाजली तरी ऐकू यायची. विशेष म्हणजे इथेही माळ आणि त्या कबरी होत्या. इथल्या शेजाऱ्यांपैकी सुद्धा कोणी नोकरी वगैरे करत नव्हते. बुटाला म्हणून होते त्यांचा तांदूळ तयार करायचा कारखाना होता. दुसरे एक लाखोळे म्हणून होते ते गुळ विकत आणि कांदा लसूण मिक्स केलेला मसाला विकत. माझ्या दादांनी तेव्हा मिश्री तयार करायचा कारखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारे रॉ मटेरियल ते जयसिंगपूरहून मागवत. कारखान्यासाठी थोडी जागा गावापासून दूर घेतली होती. त्यासाठी खाकी कागद आणून त्यावर प्रेसमधून 'उमा मिश्री'असे छापून घेत. त्याचे पुन्हा कटिंग करून ते पुड्या करण्यासाठी बायकांना घरी दिले जायचे. तसा एक ग्रुपच होता. कागद कटिंग करण्याचे काम अर्थात आईच करायची. मिश्रीचे रॉ मटेरियल एका मोठ्या विटांनी बांधलेल्या चुलीवर मोठे तयार करून घेतलेले सुपा सारख्या आकाराचे भांडे होते त्यावर भाजावे लागायचे. हे काम अतिशय जिकिरीचे होते कारण ते भाजताना डोळे अक्षरशः मुटक्यासारखे सुजायचे आणि लाल भडक  व्हायचे. त्यामुळे त्या कामासाठी डोंबारी सुद्धा तयार व्हायचे नाहीत. तेही काम माझी आई करायची. मिश्री तयार झाली की कारखान्यात येऊन ते काम पुड्या भरून चिकटवणे हे तो ग्रुप करायचा. पुन्हा त्या पुड्या भरून झाल्या की त्यांचा एक ठराविक पुड्या भरून मोठा पुडा तयार करायचा असायचा. तेही काम आईच करायची. माझे दादा म्हणायचे," सीताचा हात इतका सफाईदार आहे की पुडा असा फेकला तरी फुटत नाही". बाहेरची सगळी कामे दादा करत. पुड्यांचा एकत्र पुडा बांधायला मलाही आवडायचे.                        

    मी पाचवीत असताना आमच्या  शाळेत 'वयं मोठं खोटं' नावाचे नाटक बसवले होते. त्यामध्ये लहान मुले घरातली मोठी माणसे बाहेर गेलेली असतात. तेव्हा त्यांचे ऍक्टिंग करतात. मी आणि माझी मैत्रीण अलका इंगळे आणि इतर मुले त्यामध्ये होती. आम्ही आमच्या ड्रेसवरच साड्या नेसलो होतो. आधी दूधवाला येतो असा प्रसंग होता. दुधाचे पातेले घ्यायचे राहिले होते तेव्हा मी स्टेजवरूनच ओरडले,"बाई दुधाचे पातेले राहिले". सगळे लोक हसले तरीही आम्हाला काही कळले पण नाही की का हसताहेत. त्यानंतर कधीही कुठल्या नाटकात काम करायची संधी मिळाली नाही. पाचवीत असतानाच आमची सहल प्रतापगडावर गेली होती. तेव्हा सूर्यवंशी नावाच्या बाई होत्या. त्या माझे खूप लाड करायच्या. पूर्ण सहलीमध्ये मी त्यांचा पदर सोडला नव्हता. परत आल्यावर त्या सगळ्यांना सांगत होत्या की,"पूर्ण सहलीमध्ये हिने माझा पदर काही सोडला नाही". सहलीच्या बस मध्ये बसवायला माझे आई-दादा आले होते त्यांना टाटा करताना माझे डोळे भरून आले होते. आता ते आठवून खूप हसू येते कारण आता एवढी एवढी छोटी मुले ट्रीपला जातात

                     आम्हाला पाचवीपासूनच इंग्लिश शिकायला मिळाले. शिकवणारे शिक्षक चांगले असले की त्या विषयाची गोडी लागून तो विषय पक्का होतो. तसे माझे इंग्लिश देवल सरांमुळे खूप छान झाले होते आणि मला इंग्लिश आवडायला पण लागले होते. त्यामुळे आठवीत गेल्यावर सुद्धा सतत माझा हायेस्ट येत असे. वर्गात बाईंनी माझा पेपर सगळ्यांना दाखवला की मला जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. म्हणून मला नेहमी वाटते की त्या त्या वेळेचा आनंद वेगवेगळ्या वस्तू परिस्थिती यावर अवलंबून असतो. हिंदी मराठी संस्कृत इंग्लिश या सगळ्या भाषा माझ्या आवडीच्या होत्या. गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, हे विषय नावडते होते. त्यात मी बरी होते. तरी पहिल्या चार नंबर मध्ये असायचे. बाईंच्या कौतुकाच्या नजरेनेच मला अभ्यास करायची प्रेरणा मिळायची आणि वडिलांचे प्रोत्साहन.

                 पोलीस स्टेशनला लागून राज महाल टॉकीज होती. त्याचे मोठे गेट होते. आम्ही सातवीपर्यंत शिवाजी हायस्कूल मध्ये होतो. शाळा सकाळी असायची. शाळा सुटली की त्या टॉकीज च्या गेटला एक साखळी होती त्यातून आम्ही मुली आत जायचो. कारण तिथे एक पेरूचे झाड होते. तिथेच चहा बिस्कीट विकणाऱ्याचे टेबल असायचे. ते आम्ही उचलून पेरूच्या झाडाखाली आणायचो. ते डुगडुग करायचे म्हणून दोघांनी त्याला धरायचे. एकाने टेबलवर चढून पेरू काढायचे आणि एकाने बाहेरून कुणी येत नाही ना त्यासाठी गेट कडे लक्ष ठेवायचे. एकदा कुणीतरी गेट उघडले म्हणून आम्ही सगळे घाबरून पळत सुटलो. टेबलवर चढलेली जी मुलगी होती ती उतरली की नाही हेही पाहिले नाही. तसेच एकदा शिवाजी हाउसिंग कॉलनी मध्ये आमचे जगताप नावाचे सर राहायचे त्यांच्याकडे मी आणि माझी मैत्रीण सरला सोनी गेलो होतो. तेव्हा ती कॉलनी खूप श्रीमंत लोकांची होती. त्यांचे स्वतंत्र बंगले होते शिवाय बाजूला सुंदर फुलांची बाग. मी आणि सरला परत येत असताना, तिथे एका बंगल्या बाहेर डोकावणाऱ्या गुलाबाच्या फुलाचा मोह काही आवरला नाही, हळूच आम्ही दो.घी फुल तोडायला गेलो. तिथे हात लावतो न लावतो तोच त्या बंगल्यातील एक मुलगा धावत आला. मग काय आमची पळता भुई थोडी झाली. आम्ही दोघी पळत सुटलो आणि आधी राज महाल टॉकीज च्या त्या गेटमधून आत जाऊन लपलो. तिथून माझे घर जवळ होते त्यामुळे सरला म्हणाली मी थोडा वेळ तुझ्या घरी थांबून मग घरी जाते. आमच्या घरापासून जवळच एक बिरोबाचे देऊळ होते, त्या परिसरात चिंचेची झाडे होती तिथे आम्ही चिंचा गोळा करायला जायचो. दुसऱ्या एका बाजूला खाजाची मस्जिद होती, तिथेही जायचो. त्याचे कारण म्हणजे तिथे ठेवलेला मोठा ढोल, तो वाजवायचे आकर्षण असायचे. आता वाटते लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायचा. 

               माझी सहावी इयत्ता पूर्ण होई पर्यंत आम्ही देसाई बंधू वाड्यात राहायला गेलो. तोपर्यंत आमची तिथल्या तिथेच चार घरे  बदलून झाली होती. वाड्यात गेल्यावर मात्र अजूनच मजा यायला लागली कारण तिथं एकूण बारा बिऱ्हाडे आणि त्यांची मुले होती . शिवाय घर मालकांच्या घरी एकूण वीस ते पंचवीस माणसे होती. त्यांच्यात पण मुले होती मग काय आनंदी आनंद होता. प्रत्येकी एकच खोली होती मातीच्या भिंती, कोपऱ्यात मोरी तेही भाडे करू ना. प्रत्येकाच्या घरात चाळीस वॉटचा एक बल्ब असायचा. ट्यूबलाइट वगैरे काही नाही. आम्ही राहायला गेल्या गेल्या अजून सामान लावले नव्हते तोपर्यंत तिथे आधीच राहणारे शिंदे म्हणून आले. ते म्हणाले," तुम्ही स्पेशल लाईट घेणार की कसे". आम्ही आल्या आल्या ते आल्यामुळे आईला वाटले की हा कोण माणूस चौकशा करतोय म्हणून ती म्हणाली ते बघू नंतर. पण एकंदरीत तिला ते बोलणे आवडले नव्हते. पण पुढे जाऊन हेच शिंदे भाऊ म्हणून आमची त्यांच्याशी चांगली गट्टी जमली. ते तहसील कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांना एक मुलगी होती. नंतर आम्हाला कळले की स्पेशल लाईट म्हणजे भाडे करूनी स्वतः बंद करायची. आणि ज्यांची स्पेशल लाईट नाही त्यांची लाईट घर मालक बंद करणार. ज्यांना स्पेशल लाईट हवी असेल त्यांना दरमहा बारा रुपये भाडे आणि बाकीच्यांना दहा रुपये घर भाडे. घर मालक म्हणजे अण्णा देसाई ते सतत मुख्य दरवाजातून आत गेल्या गेल्या एक ऑफिस होते तिथेच असत. फक्त आंघोळ आणि जेवण्यासाठी ते तिथून हालायचे. माझे दादाही बरेच वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेत डुलकी काढायला जायचे. स्पेशल लाईट सोडून इतरांच्या लाईट्स अण्णा दहा वाजता बंद करायचे आणि पुन्हा थोडा वेळ सुरू करायचे मधल्या वेळात ज्यांना कंदील दिवा काय लावायचे असेल तर लावता यावा म्हणून ही सोय होती. माझ्या दादांना वाटायचे त्यांची मुलगी म्हणजे मी खूप अभ्यास करते. म्हणून त्यांनी आमच्याकडे स्पेशल लाईट घेतली होती. तरीही रात्री उशीर पर्यंत जर लाईट दिसली तर अण्णा तिकडून बंद करायचे आणि मी इकडून आवाज दिला की लावायचे. त्यांना वाटायचे की विनाकारण लाईट जळते आहे की काय?. पण तसे नसायचे मी खरंच अभ्यास करत बसायचे. रात्री जागून अभ्यास करणे मला आवडायचे, कारण मला सकाळी लवकर उठायला आवडायचे नाही. सकाळी आई आणि दादा,"श्यामा उठ, श्यामा उठ". असे म्हणायचे. आणि मग वाड्यातील मुले मला शामा उठ म्हणून चिडवायची. सुरवातीला आम्ही वाड्यात राहायला आल्यावर घरमालकांच्यात कोणाची कोण मुले कोणाचे कोण भाऊ काही कळायचे नाही. पण नंतर सगळे माहिती झाले. 

                    माझ्या आई-दादांची आणि घरमालकांची आधीपासून ओळख होती. तसेही घर मालक आणि सगळे  भाडेकरू एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. कधी काही वाटले नाही. आणि आणि थोड्या फार फरकाने एकूणच सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती. सगळ्यांची दारे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उघडीच असायची. एक-एकच खोली असली तरी कोणीही कधीही कोणाकडे जायचे त्यावेळी त्याचे काही वाटत नव्हते. कोणाच्या घरात काय भाजी इथं पासून ते कोणाच्यात काय नवीन आणले, कोण कुठे गेले कोणी आजारी असले, सगळे एकमेकांना माहित असायचे. एकमेकाकडे हक्काने एखादी वस्तू मागायचे. उसने वगैरे पण सुरू असायचे. नुसते मीठ पीठ नव्हे तर कधी काड्याच्या पेटीतील चार काड्या सुद्धा मागितल्या जायच्या. कारण त्यावेळी आख्खे पुडे आणण्याची पद्धत नव्हती. एकदा तर पाहुणे आले म्हणून अंगाचा साबण आणि टॉवेल सुद्धा उसना नेल्याचे मला आठवते. त्यावेळी प्रत्येकाकडे सगळ्यांसाठी एकच टॉवेल एकच साबण आणि एकच कंगवा असायचा. नेहमी अंगाला लावायला लाईफ बॉय साबण आणि कपड्यांसाठी 501 साबण असायचा. 

                               आम्हाला सगळ्यांना लहान मुलांची खूप आवड होती त्यामुळे वाड्यातील लहान मुले आमच्या घरी सतत असायची. घरमालकांच्या घरातली शरद, सुरेश, अरुणा आणि भारती या आमच्याकडे असत. अरुणा आणि भारती या दोघी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. शरद आणि सुरेश माझ्यापेक्षा थोडेसे लहान होते. शरद सुरुवातीला शर्टाला पैरण किंवा सदरा म्हणायचा. त्याला आम्ही हसायचो. नंतर सांगून सांगून तो शर्ट म्हणायला लागला. पण अजूनही त्याला ती गंमत आठवते. घर मालक माडीवर राहत, त्यांच्या घरात जाते आणि उखळ होते. काही दळायचे किंवा कुटायचे असेल तर वाड्यातल्या बायका त्यांच्या जात्यावर दळायच्या. त्यांच्या माडीवरून दोन्ही बाजूला खिडक्या होत्या त्यातून पत्र्यावर जाता यायचे आणि ते सगळ्यांच्या घरावर जाता यायचे. कुणाचे काही वाळवायचे असेल तर ते पत्र्यावर घालता यायचे. घरमालकांचे धान्य शेतातून पोत्याने यायचे आणि ते पत्र्यावर वाळत घातले जायचे. एकदा असेच त्यांचे ते धान्य एकत्र गोळा करत होते आणि तिथेच पत्र्यावर पोत्यात भरत होते. आमची खोली एक नंबरची होती, घराला लाकडी तुळया होत्या. त्या पोत्याचा भार एकाच ठिकाणी पडला आणि तुळळीचा कडकड असा आवाज झाला. आमच्याच पत्र्यावर ते झाले. आम्ही तिघे त्यावेळी जेवायला बसलो होतो. त्यानंतर त्या तुळळीला आधार म्हणून एक खांब लावला त्याला ठेपा देणे म्हणतात. काही वर्षांनी घरमालकांच्या माडीची पण थोडी पडझड झाली त्यामुळे ते खाली राहायला आले. मग आम्ही समोरच्या खोलीत राहायला लागलो. कारण तिथल्या अलकाच्या आई म्हणजे तोडकर यांनी दुसरीकडे घर बांधले होते. त्यांचा पोह्याचा कारखाना होता. ते नाना तोडकर खूप छान होते मी सतत त्यांच्यात असायची. एकदा अशीच दुपारची मी त्यांच्या घरी गेले तेव्हा ते त्यांच्या बायकोला म्हणाले अग ती आपली दस लाखाची पेटी आहे ना ती नीट ठेव नाहीतर श्यामा (म्हणजे मी) नेईल. कारण त्यावेळी दस लाख नावाचा सिनेमा लागला होता आणि त्यांनी तो बघितला होता. पण काय योगायोग असेल नंतर त्यांची परिस्थिती खूप सुधारत केली. त्यांनी नवा ट्रक घेतला. घरही बांधले आणि ते तिकडे राहायला गेले. पोह्यांचा कारखाना पण त्यांनी मोठा केला. चिरमुरे वगैरे पण तयार करायचे. 

          काही भाडे करू घर बदलून दुसरीकडे जात. मग नवीन भाडेकरू येत. पण सगळे लगेच एकमेकात मिसळून जात. देसाई बंधूंचा वाडा सगळ्यांना प्रेमाने सामावून घेई. मात्र भांडणे , शिवीगाळ असले अजिबात खपायचे नाही. तसे कोणी केले तर अण्णा त्यांना लगेच बजावायचे की आमचे घर सोडा. म्हणून भांडणे नव्हती असे नाही. कधी कधी भांडणे व्हायची पण शीतयुद्धासारखी. आणि मग ज्यांचे भांडण झाले आहे त्यांना कधी एकदा एकमेकांशी बोलतो असे व्हायचे. अगदी छोट्यात छोटी वस्तू आणली तरी सगळ्यांना ती दाखवली जायची आणि सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायचे. तेव्हा कुणाकडेच ना मिक्सर, ना कुकर, ना गॅस, ना फॅन, तरी त्याची उणिव कधीच कुणाला भासली नाही. रेडिओ देखील एखाद्याकडेच असायचा. मला वाटते त्यामुळे सगळ्यांना भरपूर वेळ असायचा. स्टो असणे म्हणजे सुद्धा फार भारी वाटायचे. एका फळीवर सगळी भांडी मावलेली असायची. मोरीत बंब, मोरीच्या कट्ट्यावर पिंप कळशी हंडा असायचे. पिंपच्या तोटीतून हात वगैरे धुता यायचे, बेसिन वगैरे प्रकार माहितही नव्हता. शौचालय वाड्यात एका कोपऱ्यात आणि दुसऱ्या एका कोपऱ्यात उकिरडा पण होता. त्याचेच मग खत तयार झाले की घरमालकांच्या शेतात टाकायला न्यायचे. त्यांच्या घरी पण एक होते ज्यांना दादा म्हणत ते आणि त्यांची बायको  ज्यांना आम्ही रानातल्या वहिनी म्हणायचो. ते दोघे शेतात जात. दुसरे आप्पा ते  गादीच्या दुकानात असत. तिसरे एक तिथेच जवळ सासुरवाडीत घर जावई म्हणून रहात ते शिलाई करत. त्यांन सगळे भाऊ म्हणत. ते रोज रात्री जेवायला मात्र इकडे येत. आणि सगळ्यात मोठे अण्णा त्यांना ' एकुमॅ ' म्हणत. म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर. जवळजवळ वीस वर्ष त्यांनी भाड्याची पावती दिली होती पण त्यानंतर राहील त्याचे घर असा नियम निघाल्यावर पावती देणे बंद केले. 

                          घरमालक  खाली राहायला आले तरी त्यांचे माडीवरचे घर बऱ्यापैकी होते. त्यामुळे मला तिथे अभ्यासाला बसता यायचे. कारण भाडेकरूंची मिळून बरीच चिल्लीपिल्ली होती. शिवाय काम आवरले की बायका आईकडे गप्पा मारायला यायच्या. आम्ही वाड्यात राहायला यायच्या आधी थोडे दिवस माझा भाऊ विलास आर्मीत भरती झाला होता. तो जेव्हा पहिल्यांदा सुट्टीवर आला तेव्हा त्याला वाड्यात फारच बुजल्यासारखे झाले. आईकडे सतत बायका येत. त्यामुळे तो आईला म्हणायचा तुच जात जा ना त्यांच्याकडे. नंतर मात्र त्याच्याही ओळखी झाल्या मित्र मिळाले आणि तो चांगलाच रमला. घरमालकांच्यात एक नियम होता म्हणजे त्यांच्या घरापुरता. स्त्रिया आपापल्या नवऱ्यांचे आणि मुले जर लहान असतील तर त्यांचे कपडे धुवायच्या. बाकी मोठी मुले त्यांचे त्यांचे कपडे धुवायचे. त्यासाठी अण्णा त्यांना पाचशे एक साबणाचा मध्ये एक तुकडा करून तो द्यायचे. त्यांची शिस्त चांगली होती. 

       या सगळ्यांची मुले शिकत होती. पण मुली काही जास्त शिकल्या नाही. मुले मात्र एक-दोन जण सोडले तर ग्रॅज्युएट झाले. भाऊंची पण एक मुलगी माझ्या वर्गात होती. तीही शिकली आणि आप्पांच्या पण दोन मुली चांगल्या शिकल्या. मी नेहमी जुनी पुस्तके घ्यायची   पाऊण किमतीला त्यांना छान कव्हर घालून व्यवस्थित वापरायचे आणि परत तेवढ्याच किमतीला विकायचे. वाड्यातली छोटी मुले माझ्याकडे पुस्तकांना कव्हर घालून घ्यायला यायची. मला पण ते काम आवडायचे. आठवीत असताना मी मोठमोठ्याने कविता म्हणायचे. म्हणजे वाड्यातल्या लोकांना कळायला की मी किती अभ्यास करते ते आणि खरोखर करायचे पण. मी आठवीत गेल्यावर माझ्या स्कॉलरशिप मधून दादांनी एक हेनरी सँडोज कंपनीचे घड्याळ घेतले होते. खूप छान होते आत कडेला डायमंड होते. त्याचा आकार खूप छोटा होता. वाड्यात लोकांना दाखवले तर ते म्हणाले,"हे तर खोटे असेल"पण नंतर त्यांना पटले ते खरे आहे. 

    माझे दादा कुठेही बाहेर निघाले की मला बरोबर घेऊन जात. सगळ्यांना सांगत हे आमचे शेंडेफळ म्हणून. माझ्या इतका त्यांचा सहवास माझ्या कोणत्याच भावंडांना मिळाला नाही. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा माझे दादा 1942 च्या लढ्यात उतरले होते. त्यामुळे सतत त्या कामात आणि जेलमध्ये असायचे. मला वाटते दादांची पण मुलांबरोबर राहायची हौस राहिली असेल त्यामुळे ते माझे खूप लाड करत, असे आता मला वाटते. विशेष म्हणजे माझ्या कोणत्याच भावंडांनी त्याबाबत माझा राग राग केला नाही. उलट त्यांनीही माझे लाडच केले. मला वाटते ते सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे असेल. आई पेक्षा माझे वडिलांशी जास्त जमायचे कदाचित आई सतत कामात असल्यामुळे असेल. मी शाळेतून आल्यावर कोणत्या बाई काय म्हणाल्या सर काय म्हणाले हे सगळे मी दादांना सांगायचे. आणि तेही कौतुकाने ऐकायचे आणि वर काहीतरी मजेशीर बोलायचे. आम्ही दोघे एकाच ताटात जेवायचो. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून मला झोपायची सवय होती. आठवीत असताना आम्ही दोघांनी एक प्लेटोचे शाळेचे पेन आणले होते. पाच रुपयाचे ते मी अकरावीपर्यंत वापरले. नंतर त्याचे निब असेल झाले त्यामुळे वापरायचे बंद करावे लागले. तेव्हा घड्याळ, पेन किंवा तत्सम वस्तू आम्ही कशी 20 किंवा 25 वर्ष वापरतो आहे हे अभिमानाने सांगितले जायचे. 

    आमचा बराचसा मिश्रीचा खप पुण्याला असायचा. घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट ने आम्ही माल पाठवायचो. तिथे एक गयावळ नावाचे आमचे दूरचे नातेवाईक होते. ते पुण्यात कस्तुरे चौकात राहत. नंतर वडील तिथे जाऊन दुकानदारांना ते सगळे पोहोचवायचे. बरेच वेळा माझे दादा मला पुण्याला त्यांच्याबरोबर घेऊन जात. दादा म्हणायचे की पुण्यात असल्यावर तू मला पाहिजे ते माग कारण मी इथे असल्यावर राजा असतो. तिथे त्यांच्याजवळ मिश्री विकून आलेले पैसे असत म्हणून ते तसे म्हणत. मग काय आम्ही दोघे सिनेमा, नाटक, हॉटेल सगळी मजा मजा करायचो. त्यांना बारीक-सारीक ठिकाणे पण सापडायची त्याचे मला नवल वाटायचे. एकदा ते पुण्याहून एकटेच येत होते आणि त्यांच्याजवळ सुट्टी नाणी एका पिशवीत होती ती त्यांनी एसटीमध्ये वरती जी जागा असते तिथे ठेवली होती. शेजारी बसलेल्या माणसाने जेव्हा त्यांना विचारले की काय आहे त्या पिशवीत तेव्हा ते म्हणाले की," अहो घराचे बांधकाम सुरू आहे त्यासाठी लागणाऱ्या चकत्या आहेत". माझ्या दादांचा स्वभाव फार मजेशीर होता. वाड्यात राहायला येण्यापूर्वी आम्ही जिथे राहत होतो तिथे अलीकडे पोलीस स्टेशन होते तिथून पुढे जाऊन थोडे वळले की आमचे घर होते. एकदा एका पोलिसाने त्यांना सायकलला लाईट नाही म्हणून पकडले. तो म्हणाला" चला पोलीस स्टेशनला"हे निघाले त्याच्या मागून पोलीस स्टेशनला, तो गेला आत मध्ये आणि हे मागच्या मागे घरी निघून आले. त्यांनी हा किस्सा आम्हाला सांगितला आणि आम्ही हसत बसलो.               

  मी सतत माझ्या दादांबरोबर असायची. असेच एकदा आम्ही दोघे  पुण्याला कामानिमित्त गेलो होतो. रस्त्याने जाताना माझे दादा मला म्हणाले,"जरा बाजूला बसू या माझ्या छातीत दुखते आहे आणि हे जरा वेगळे दुखणे वाटते आहे."आम्ही दोघे बाजूला एका कट्ट्यावर बसलो. त्यावेळी मला इतके काही त्याचे वेगळे वाटले नाही. त्यानंतर ते म्हणाले ,"छातीचा कार्डिओ ग्राम काढून घ्यावा लागेल."1967 68 मध्ये एवढे काही उपचार नव्हते. आम्ही कार्डिओग्राम काढला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आहे. तेव्हापासून आमच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असायची. जरा कुठे ते नजरेआड झाले की वाटायचे त्यांना काही झाले का? त्यांना काही होईल का?. तशी मी तर सतत त्यांच्याबरोबर असायची. आई मला कधीच घरातले काम करू द्यायची नाही. खरंतर वाड्यातल्या माझ्यापेक्षा लहान मुली काम करताना बघून मला वाटायचे आपणही काम करावे आपणही भांडी घासावीत. ती छान चकचकीत झालेली भांडी बघायला मला आवडायचे. पण आई म्हणायची,"आपलं कुठं एवढं काम असतं "आणि मला काम करायला लावलेले माझ्या दादांनाही आवडायचे नाही. एकदा आईला ते म्हणाले की," मला रात्री स्वप्न पडले की तू शामाला भांडी घासायला लावली आहेत."आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना वाटले की त्यांचे काही झाले तर आई मला काम करायला लावेल. दोघांनी मिळून माझा नुसता लाडोबा करून ठेवला होता. मला मग पुस्तके वाचायचा नाद लागला. जेवढी मिळतील तेवढी पुस्तके मी हावऱ्यासारखी वाचून काढायची. माझ्या वडिलांना पण पुस्तके वाचायचा फार नाद होता. त्यांच्या एक दोन मित्रांची हॉटेल्स होती कुणाचे दुकान होते. मी शाळेत गेले की माझे दादा डुलत डुलत पाठीवर हात बांधून प्रत्येक मित्राकडे जाऊन पेपर वाचन करून येत. त्यातले अग्रलेख त्यांना विशेष आवडत. माझे दादा सातवीपर्यंत शिकले होते. पण त्यांना भरपूर माहिती असायची. एकदा ते म्हणाले १९७३ नंतर आपल्याला टीव्हीवर कार्यक्रम बघता येतील. आम्हाला त्यावेळी इतके काही कळले नव्हते. पण त्यानंतर कराड मधील अर्बन बँकेत टीव्हीवर कसे दिसेल त्याचे प्रात्यक्षिक बघायला शाळेने आम्हाला नेले होते. तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटले होते.                     

                मी आठवीत असताना आमची सहल पुण्याला सारसबाग, सरपोद्यान, आकाशगंगा बघायला गेली होती. आमचा मुक्काम एका शाळेत होता. तिथे आमची रहायचे म्हणजे झोपायची सोय केली होती. कडेला सगळे बेंच रचून ठेवले होते रात्री ते सगळे धडधड वाजले आणि हलत होते. आम्हाला असे का होते आहे हे कळले नाही. आमच्या बाई म्हणाल्या की, "भूकंप होतो आहे ". आम्हाला सगळ्यांना त्याची खूप मजा वाटली की, कसा भूकंप होतोय म्हणून. नंतरही त्याबद्दल आम्ही मजेने चर्चा करत होतो. कारण तो आमचा पहिलाच अनुभव होता. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. शिवाजी हायस्कूलच्या इथे बस थांबवली. आमचे आई वडील आम्हाला न्यायला आले होते. पण शाळेत सगळीकडे बेंचेस बाजूला करुन व्हरांड्यात ठेवून लोकांची राहायची सोय केली होती. कारण आम्ही अनुभवलेला तो भूकंप साधा नव्हता. कोयने मधील बऱ्याच घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती आणि बरेच लोक जखमी झाले होते. ते पाहिल्यावर आम्हाला भूकंपाचे गांभीर्य समजले. जिकडे तिकडे भीतीचे वातावरण, सतत भूकंपाचा धसका. त्यामुळे थोडे जरी हालायला लागले की वाड्यातील सगळे लोक बाहेर येत मग रात्र असो की दिवस. मी तर एवढी भीती घेतली होती की एकदा मध्यरात्री मला स्वप्न पडले की, भूकंप झाला आहे आणि आमचे घर अंगावर पडले आहे. मी पालथी पडून जोर जोरात ओरडत होते. माझे आई दादा मला उचलत होते पण मला काहीच कळत नव्हते. रात्रीचे तीन वाजले होते, आणि श्यामाला काय झाले म्हणून वाड्यातले सगळे लोक माझ्या भोवती जमले होते. थोड्यावेळाने मला पूर्ण जाग आली आणि मग लक्षात आले की अरे हे तर स्वप्न होते. तरीही माझ्या मनातली भीती काही कमी झाली नाही. सगळेच सतत काळजीत असायचे. रात्री कुणालाही नीट झोप यायची नाही. मग वाड्यातल्या पुरुष माणसांनी ठरवले की आपण रात्री अंगणात पत्ते खेळत बसू किंवा गप्पा मारत बसू, बायका मुलांना रात्री निवांत झोप काढू देत. आपण दिवसा झोपू. तसेही एक शिंदे भाऊ सोडले तर कोणाची बांधील नोकरी नव्हती. एक दोन ट्रक ड्रायव्हर होते पण बाकीचे लोक जमवून घ्यायचे. तरीपण सारखे घाबरल्यामुळे एक दिवस रात्री काही एक-दोन कुटुंब म्हणजे ते तोडकर गोटे गावचे होते ते त्यांच्या गावाला आणि आम्ही काल्याला यशवंत मास्तर होते त्यांच्याकडे गेलो. कारण आमचे गाव काले असून आमचा तिथला वाडा विकला होता.  रात्री राहिलो सकाळी लक्षात आले की अरे हे तर दुमजली घर बाहेर पडेपर्यंत अंगावर पडायचे त्यापेक्षा घरीच जाऊ. पण आई म्हणाली तुम्हाला यायला पण दम नाही आणि जायला पण नाही, तुम्ही दोघे जा मी नंतर येते. आम्ही दोघे आलो. आई नंतर आली.  सगळेजण परत आले . भूकंपाची भीती तर होतीच त्यात आता धरण फुटण्याची शक्यता वर्तवली जायला लागली. म्हणजे 'इकडे आड तिकडे विहीर 'अशी अवस्था झाली. त्यावेळी सावधानता म्हणून पोस्टामध्ये एक अलार्म बसवला होता, तो रोज सकाळी दहा वाजता ट्रायल म्हणून वाजवला जायचा. म्हणजे लोकांना कळायला की धरण फुटले तर असा अलार्म वाजेल. एकदा संध्याकाळी सहा सात वाजता कुणीतरी ओरडा केला की धरण फुटले. आणि सगळे लोक पळत सुटले, आम्ही पण सगळे पळत होतो. थोडे अंतर गेल्यावर कुणीतरी सांगत आले की अहो धरण वगैरे फुटलेले नाही. चोर लोक खोटे सांगतात त्यामुळे लोक घाबरून दारे उघडी टाकून पळत सुटतात आणि हे चोऱ्या करतात. मग पुन्हा सगळे परत आलो आणि हुश्य झाले.  भूकंपाचा गोंधळ चालू असताना दादा म्हणाले,"आता आपण पुण्याला राहायला जाऊया. झाले पुन्हा' उचल तेल्या लाट, पुढची गल्ली गाठ', याप्रमाणे थोडं सामान घेऊन आम्ही तिघं पुण्याला गेलो. पण वाड्यातली खोली काही सोडली नव्हती. कारण विलास पेक्षा धाकटा भाऊ ज्याचे नाव देवदत्त होते पण त्याला आम्ही सगळे सु म्हणायचो. तर तो कारखाना सांभाळणार होता. मग काय पुण्याला गेलो त्याच गयावळांच्या वाड्यात एक छोटीशी खोली घेऊन राहिलो. तिथे कसे बसे तीन चार महिने काढले आणि पुन्हा भूकंपाचे वादळ थोडे शांत झाले असे वाटले म्हणून परत कराडला आलो. 

    आम्ही पुण्याला राहत असताना माझ्या वडिलांच्या मनात आले की माझ्या मुलीला धीट करावे, तिला स्वतःचे स्वतः बाहेर जाता यावे, बसने प्रवास करता यावा. त्यावेळी आम्ही कस्तुरे चौकात राहत होतो. मला एकदा दादा म्हणाले की, मंगळवार पेठेतून जिथे माझी मावशी रहात होती तिथून तू कस्तुरे चौकात एकटी बसने ये, त्याप्रमाणे मी एकटी जीव मुठीत धरून का होईना पण आले. जसे काही मी फार मोठा पराक्रमच केला आहे असे मला वाटले. दादानाही वाटले वावा माझी मुलगी धीट झाली. त्यानंतर एक दिवस मला म्हणाले तू आणि पपडी म्हणजे गयावळांच्यात एक मुलगी पाहुणी म्हणून आली होती. तर तुम्ही दोघी सारसबागेत बसने जा. मला वाटले हो मी करू शकते. ती मुलगी माझ्या एवढीच होती पण खेड्यात राहत होती आणि थोडी बुजरी पण होती. आम्ही दोघी बसने गेलो सारसबागेत. इकडे तिकडे थोडे भीत थोडे मजेने फिरत होतो. तेवढ्यात एक माणूस आमच्या मागे लागला. आम्हाला कळेना आता इकडे पळू की तिकडे . मग गेलो पलीकडे तळ्यातल्या गणपतीला. पण कसले काय हा माणूस तिथे पण आला. मग मात्र आम्ही खूप घाबरलो आणि पळत सुटलो. कुठे पळत होतो देव जाणे. तोही आमच्या मागे आला. तेवढ्यात समोरून पोलीस मामा येताना दिसला. थोडा धीर एकवटून आणि रडत रडत तो माणूस आमच्या मागे लागल्याचे मी त्याला सांगितले. त्या पोलिसाने लगेच त्याचे मानगुट पकडले, आणि त्याच्या थोबाडीत मारल्या. त्याला चल पोलीस स्टेशनला म्हणाला. आम्हाला वाटले आता आपले काम झाले आपण आपले घर गाठू या. पण कसले काय पोलीस मामा म्हणाले चला पोलीस स्टेशनला पोरींनो पोलीस स्टेशनला. पोलीस मामांना काही नाही वगैरे म्हणू शकत नव्हतो. मग आमची वरात पोलीस स्टेशनला निघाली. त्यांनी घरचा पत्ता विचारला आणि वडिलांचे नाव. एक पोलीस गेला दादांना बोलवायला.  दादा आल्या आल्या त्यांनी आधी माझी पाठ थोपटली. पण तरीही मी खूप घाबरले होते. त्यामुळे रडायला लागले ती पपडी पण रडायला लागली. माझे दादा येईपर्यंत त्या माणसाला पोलीस स्टेशन मधल्या अजून एक दोन पोलिसांनी पण चांगला चोप दिला होता. पोलीस दादांना म्हणाले याची तक्रार नोंदवा पण मग तारखा पडल्या तर तुम्हाला कोर्टात यावे लागेल. दादा म्हणाले,"त्याला समज द्या आणि सोडून द्या". घरी गेल्यावर कळले की जेव्हा तो पोलीस दादांना बोलवायला घरी गेला, त्याने नाव वगैरे विचारले आणि आमचे नाव वगैरे सांगून चौकशी केली तेव्हा दादा त्या पोलिसाला म्हणाले की,"पोरींचा एक्सीडेंट वगैरे झाला की काय?". तेव्हा त्यांनी सांगितले की असे काही नाही आणि घडलेला प्रसंग सांगितला. 

   तर पुण्याहून आमचे 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर 'पुन्हा कराडला आले. माझी नववी आणि दहावी झाली. वडिलांना माझे फारच कौतुक, कारण माझी सगळी भावंडे सातवीपर्यंत शिकली होती. मी अकरावीत तरी गेले.  शाळे व्यतिरिक्त ते मला घेतल्याशिवाय बाहेर पडत नसत. आई त्यांना म्हणायची,"अहो आता तिची अकरावी आहे तिला अभ्यास असतो, तिला कशाला नेता बरोबर?". माझे दादा म्हणायचे,"हे बघ ती माझी काठी आहे तिला मी नेणारच", वाड्यात तसे खेड्यातलेच भाडेकरू होते. त्यामुळे बायकांचे नाव घेऊन कोणी नवरे त्यांना बोलवत नसायचे. पण माझे दादा मात्र ही शेजार्‍यांकडे गेली असली तर , जोरात "सीता SS"म्हणून हाक मारायचे. आणि वाड्यातल्या बायका गालातल्या गालात हसायच्या. माझ्या दादांना पान खायची खूप सवय होती. ती पाने आणून पुसून त्या पानाच्या डब्यात ते अगदी निगुतीने ठेवायचे. त्यांचे तोंड सतत रंगलेले असायचे त्या पानांचा वासही छान यायचा. सण असेल त्या दिवशी मात्र बायका हौसेने," दादा आम्हाला पण पान द्या" म्हणून हक्काने मागायच्या. ते पण छान पानाचा विडा करून द्यायचे. ते जेव्हा जेव्हा बांगड्या, रिबन किंवा जे काही माझ्यासाठी पुण्याहून आणत ते वाड्यातल्या सगळ्या मुलींसाठी पण आणत. तसेच आवळे, बोरे, जांभळे हे देखील सगळ्यांसाठी आणत. त्यामुळे माझे दादा सगळ्यांचे आवडते होते आणि माझे सुपर हिरो. कारण मला त्यावेळी नेहमी वाटायचे की माझे दादा काहीही करू शकतात आणि कुठलाही प्रसंग आला तरी त्याला तोंड देऊ शकतात. वाड्यात असताना मजा म्हणजे कोणीही कुणाकडे कधीही जायचे अगदी स्वतःच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यासारखे. त्यामुळे एका खोलीत राहतोय असे कधी वाटले नाही आणि वैषम्य तर मुळीच नाही. उलट दोन रूम मधून चार रूम चार रूम मधून नऊ रूम मध्ये आले तरी त्या वेळची मौज माझ्या  मनाला अजून सुखावते. एकदा घरमालक अण्णांची अरुणा आली आणि दादांना म्हणाली," मला रात्री स्वप्न पडले की तुम्ही पुण्याहून रेडिओ आणलाय". त्यावर दादा म्हणाले की,"हो आणि शामा रेडिओच्या गाण्यावर डुलतेय आणि तू तिकडून पुक्कन लाईट बंद केलीस,हो ना ?" काय बोलतील आणि काय नाही कळायचे नाही. विशेष म्हणजे आमच्या दोघींना लागणाऱ्या सगळ्या वस्तू दादा स्वतः आणायचे.

                        कराडला परत आल्यानंतर एकदा माझी आई पुण्याला माझ्या मावशीच्या डिलिव्हरीसाठी गेली होती. तेव्हा नेहमीप्रमाणे मी व माझे दादा रात्रीच्या वेळी एका ताटात जेवत होतो आणि अचानक तो धरण फुटल्याचा अलार्म वाजायला लागला. मी दादांकडे आणि ते माझ्याकडे असे नुसते बघायला लागलो. मला वाटले आता काय करायचे. नंतर दादा मला म्हणाले की,"हे बघ मी जरी पळालो तरी कुठेतरी पडेन."(कारण त्यावेळी त्यांना अटॅक येऊन गेलेला होता.) "त्यापेक्षा तू वाड्यातल्या लोकांबरोबर पळत जा". त्यांना सोडून जायचा माझा काही जीव होईना. आम्ही दोघे स्तब्ध,असहाय्यपणे एकमेकांकडे नुसते बघत राहिलो. त्यावेळी देवाचा धावा करण्याचे देखील सुचले नाही. पण थोड्याच वेळात कोणीतरी सांगत आले की, तो अलार्म चुकून वाजला होता आणि आमचा जीव भांड्यात पडला. नंतर एकदा दुपारी मी आई आणि माझे दादा घरात होतो, अचानक त्यांना घाम आला आणि ते बेशुद्ध झाले. बापरे त्यावेळी मला कळले की ब्रम्हांड आठवणे म्हणजे काय असते ते. तो प्रसंग घडून जवळजवळ 50 एक वर्ष होऊन गेली पण अजून मला जसाच्या तसा आठवतो आहे. त्यानंतर ते बरे झाले पण तरीही सतत काळजी असायची.              

Monday, June 15, 2026

आत्मानंद - प्रेमा नरेवाडीकर - 1

                     आज वयाच्या 69 व्या वर्षी जेव्हा मी माझ्या आयुष्यातील घटना आठवते तेव्हा माझे मलाच नवल वाटते. वयाच्या 27 व्यावर्षापर्यंत मुंबई सुद्धा मी बघितली नव्हती. मला हे कळत नाही की आपल्याला वयाच्या कितव्या वर्षापासून घटना लक्षात राहायला सुरुवात होते. तेव्हा मला आठवले की, मी अगदी सात किंवा आठ महिन्यांची असेन त्यावेळी माझी आई मला कडेवर घेऊन बसने कुठेतरी निघाली होती. आणि बस स्टँडवर एक अपंग माणूस हातावर चालत होता, त्याला पाहिल्यावर मी रडून गोंधळ घातला, आईच्या अंगावर अजून वर वर चढायला लागले. त्यानंतर आम्ही बसमध्ये चढलो. मी थोडी शांत झाले पण दुसऱ्याच क्षणाला मी पुन्हा जोर जोरात रडायला लागले. कारण तो माणूस नेमका आम्ही ज्या बसमध्ये चढलो त्याच बसमध्ये चढला. बस मधल्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या माणसाला बहुतेक माझ्या नजरेआड केले किंवा रडून रडून मी झोपले. ते काही आठवत नाही. त्यानंतर मला वाटते की मी चार किंवा पाच वर्षांची असेन आम्ही शनिवार पेठेत एका दहा बाय दहाच्या खोलीत भाड्याने राहायला आलो. खोलीच्या मध्ये अगदी थोडे सामान ठेवले होते. आमच्या समोरच भुतकर वकिलांची चाळ होती. एकूण वीस बिऱ्हाडकरू भाड्याने राहत होते. प्रत्येकी दोन खोल्या दुमजली चाळ होती. दोन्ही बाजूने लाकडी जिने होते. त्या जिन्यामध्ये आम्ही मुले खेळत असायचो. चाळीतील लोकांना त्यांच्या नावाने बोलवण्याऐवजी त्यांच्या रूम नंबर वरून बोलवले जायचे. जसे की सात नंबर 11 नंबर. त्या चाळीत बरीच माझ्या बरोबरीची मुले मुली राहत होती. यापैकी आठ नंबर मध्ये एक गुजराती कुटुंब होते त्यांना पाच मुले होती. त्यामधली कांता नावाची मुलगी होती तिचे आणि माझे चांगले जमायचे. आणखी एक गुजराती कुटुंब पाच नंबर मध्ये राहत होते. त्यांचा बच्चू नावाचा मुलगा माझा मित्र होता. त्यांच्या घरात आम्ही पत्ते खेळत बसायचो. 

             माझे वडील काय उद्योग करायचे कोण जाणे. त्यावेळी काहीतरी तंबाखू विकायचे वाटते, कधीकधी म्हणायचे की मी केस कापायचा धंदा सोडून सगळे धंदे केलेत. कधी आई आणि ते चर्चा करत असायचे की काय उद्योग करावा आता? मी लगेच म्हणायचे आपण हॉटेल काढूया, कारण मला हॉटेलमधील छान छान पदार्थ आठवायचे. खरंतर माझ्या वडिलांचे आजोबा सावकार होते. म्हणजे त्यांच्या आईचे वडील आणि ती एकुलती एक होती. त्यामुळे माझे आजोबा घर जावई होते. खूप शेती होती, मोठा वाडा होता म्हणजे ज्या दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहत होतो तेवढे त्या वाड्यात बाथरूम अर्थात त्यावेळी न्हाणीघर म्हटले जायचे. मागच्या बाजूस आड पण होता. वाडा दोन मजली होता. आमचे गाव काले , कराड पासून सात किलोमीटर अंतरावर होते पण तिथे राहण्याचा कधी योग आला नाही. तिथे माझी वयस्कर आजी आणि माझे काका काकू त्यांच्या मुलांसह राहत होते. माझे वडील १९४२ च्या लढ्यात सहभागी झाले होते त्यामुळे सतत जेलमध्ये असायचे. माझी सावत्र आई नव्हती त्यामुळे माझ्या सावत्र भावंडांना माझ्या काका काकूंनी सांभाळले होते. अर्थात हे सगळे माझ्या जन्मापूर्वी. त्यामुळे माझी सावत्र भावंडे माझ्यापेक्षा खूप मोठी होती. माझ्या दोन बहिणींची लग्न माझ्या जन्मापूर्वी झाली होती, त्यापैकी मोठ्या बहिणीचा मुलगा माझ्यापेक्षा दोन किंवा तीन वर्षांनी लहान होता. माझ्या भावंडांना सावत्र म्हणणे मला आवडत नाही. कारण त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव होता. जरी घरचे गडगंज असले तरी नंतर त्या सगळ्या संपत्तीला ओहोटी लागली कशी ते मला माहिती नाही. पण गावात कडील तो वाडा ती शेती विकली गेली. माझ्या वडिलांनी वाटणीसाठी कधी आग्रह धरल्याचे आठवत नाही. मला वाटते माझ्या भावंडांना काका काकूंनी सांभाळले होते त्यामुळे असेल किंवा एकूणच त्यांचा स्वभाव तसा असल्यामुळे असेल. पण मला आश्चर्य वाटते की, वाडा व शेती विकली गेल्यावर माझे काका काकू सहकुटुंब कराडमध्ये राहायला आले पण कधीच कुणी रडगाणे गायले नाही की, आम्ही मोठ्या वाड्यात राहत होतो, काही नाही. अगदी एका खोली तेही राहत होते. कधी कधी माझे वडील व भाऊ मला सायकल वरून गावी आजीला भेटायला न्यायचे. वाडा विकल्यावर मात्र आम्ही माझ्या दादांचे मित्र यशवंतराव पाटील होते त्यांच्या घरी जायचो. कधी कधी राहायचो पण. तिथे आम्हाला घरच्यासारखे वाटायचे. खरंच त्यावेळी घरं छोटी छोटी होती पण अगत्य फार होते. अर्थात तेव्हा लोक एवढे बिझी नव्हते त्यामुळे कोणी आले गेले हाच त्यांचा विरंगुळा होता. 

           आम्ही जिथे राहात होतो तिथे पूर्वेला मोठा माळ होता. आणि त्या माळावर जिकडे तिकडे मुस्लिम लोकांच्या कबरी होत्या. त्या माळावर</div> आम्हा मुलांचा मुक्त संचार असायचा. मुलं मुली एकत्र खेळायचो. त्यामध्ये मुलं जास्त असल्यामुळे पतंग उडवणे, मांजा तयार करणे, चाक फिरवणे हे खेळ खेळले जायचे. त्यापैकी पतंग उडवायला मला फार आवडायचे. वडिलांनी मला एक हात पाय हलवणारी बाहुली आणली होती. ते एकच खेळणे मला महागातले मिळाले होते. पण कधी खेळण्याची उणीव भासली नाही. कारण सतत बाहेर उंडारणे असायचे. मला अजून एक सवय होती, छोटा आरसा हातात घेऊन उंबऱ्यावर बसायचे, त्यामुळे आभाळ असे खोल खाली आहे असा भास व्हायचा. स्टॅन्ड जवळ होते आणि स्टॅन्ड च्या समोर एक हॉटेल होते तिथे मोठमोठ्याने रेडिओ लावलेला असायचा. त्यातले एकच गाणे मला तरी कळायचे, ते म्हणजे' 'जादू नगरी से आया है कोई जादूगर ', मला वाटायचे हे काहीतरी जादूगाराचे गाणे आहे. तेव्हा घरोघरी रेडिओ नव्हते मात्र काही हॉटेलमध्ये असायचे.  खेळणी म्हणजे छोट्या पुठ्ठ्याच्या डब्यात कागदी नागोबा असायचा तो झाकण काढले की डुलायचा आणि एका तारेवर प्लास्टिकचे माकड असायचे ते खाली वर व्हायचे शिवाय पत्र्याच्या शिट्टी सारखे असायचे ते हाताने खाली वर केले की त्याचा आवाज यायचा. 

            सुरुवातीला मला बालवाडीत घातले होते. ती एका पोलीस लाईन मधील घरात होती. आम्ही एक कुत्रे पाळले होते. एकदा मी बालवाडीत गेले होते वडील मला सोडायला आले होते. त्यांच्या मागून ते कुत्रे आले होते ते त्यांना कळले नाही. तिथे समोर एक झोपडी होती त्या लोकांनी त्याला बांधून ठेवले. वडील मला न्यायला आल्यावर त्यांच्याकडून ते कुत्रे भांडण करून परत घेतले. शिवाय एक मांजर अशीच येऊन आमच्या घरी राहिली होती. मी जे खायचे तेच ती पण खायची अगदी तिखट असले तरी. तिच्यावर माझा खूप जीव होता. आमच्या दक्षिणेला पॉवर हाऊस होते तिथे मेंदीची खूप झाडे होती. आम्ही मुलं मुलं जायचो आणि मेंदीची पाने आणायचो आणि ती पाट्यावर वाटायचो. वाटता वाटता हात रंगायचे खूप मजा वाटायची. 

             मी पहिलीत गेले त्यावेळी मला सात नंबर शाळेत घातले होते. तिथे घराळ नावाच्या बाई होत्या. एकदा त्यांनी सांगितले की आज</div> इन्स्पेक्शन आहे तेव्हा नीट उत्तरे द्या. अर्थात त्यावेळी कशाचे काही गांभीर्य नव्हते. त्या साहेबांनी आम्हाला आंबा लिहा असे सांगितले आणि मी आबा लिहिले होते. बाई वर्गात चक्कर मारत होत्या त्यांनी हळूच मला सांगितले की आ वर टिंब दे, मी दिले. नंतर तिकडे ठिगळे नावाच्या बाई शिकवायला आल्या. त्यांनी एका मुलाला जोरात धपाटा मारला, ते पाहिल्यापासून मला शाळेचा  धसकाच बसला. कारण मला घरी कधीच कुणी मारले नव्हते. त्यामुळे चल आवर शाळेत जा म्हटलं की मला पोटात कळ यायची. खरंतर त्यावेळी त्या बाईंचा इतका धसका घेतला होता आणि खरंच मला कळ यायची. पण वडिलांना वाटायचे हिला शाळेत जायला नको म्हणून ही बहाणा करते आहे. त्यांनी पण चंग बांधला मला शाळेत पाठवायचा. ते म्हणाले," चल शाळेत, शाळेजवळच माझा मित्र राहतो त्याला सांगतो, हिला जेव्हा कळ येईल त्यावेळी तू पाणी दे. तो तुला पाणी देईल. आणि तुझ्या गुरुजींना पण सांगतो जेव्हा हिला जायचे असेल त्यावेळी तुम्ही बाहेर सोडा". आणि खरोखर दिवसभरात मी बरेच वेळा गेले. शाळा सुटताना वडील मला न्यायला आले, त्यांनी त्या मित्राला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला,"पोरगी दिवसभरात इतक्या वेळा गेली एवढी काही ती मॅट्रिकला आहे का? , कशाला एवढा अट्टाहास करतोस?." रस्त्याने आम्ही दोघे येत होतो, तेव्हा वडील मला म्हणाले की, "आपण तुझी शाळा बदलूया का?"मी हो म्हणाले. शाळा बदलण्यापूर्वी म्हणजे या प्रसंगापूर्वी माझा मोठा भाऊ जयप्रकाश ज्याला मी अण्णा म्हणायचे, त्याचे नुकतेच लग्न झाले होते, तो ग्रामसेवक होता. त्याचे पोस्टिंग  किन्हईला झाले होते. तो आला होता आणि मला म्हणाला, "चल येतेस का किन्हईला ?". आणि मी लगेच तयार झाले, कारण शाळेपासून तेवढीच सुटका असे मला वाटले. खरंतर मी माझ्या आई दादांना सोडून कधीच कुठे गेले नव्हते. पण यावेळी मात्र एका पायावर तयार होऊन गेले सुद्धा. 

           तिकडून आल्यावर शाळा बदलल्यानंतर मला शाळा आवडायला लागली. कारण तिथे  शिकवणाऱ्या  देशपांडे  बाई मला जवळ घ्यायच्या. त्यामुळे मला छान वाटू लागले. मग मात्र मी आजारी वगैरे पडले तर शाळा बुडायची नाहीतर नाही. आणि घर पण तिथून जवळच होते. त्यामुळे मधल्या सुट्टीत सगळ्या मैत्रिणी आणि मी माझ्या घरी पाणी प्यायला पळत पळत यायचो. त्यावेळी प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या. माझी एक मैत्रीण मृदुला जोशी तिला अजून पाणी प्यायला यायची ते आठवते. 

            माझी आई खूप टापटीप आणि स्वच्छतेची होती. तिला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडायच्या. तेथेच नावडीकर बाई होत्या, त्या वयस्कर होत्या त्यांच्या इथून आम्ही पाणी भरायचो. त्यावेळी घराघरात पाण्याचे नळ नव्हते, तर त्या बाईंना आई नेहमी सल्ले विचारायची. त्याही तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सल्ले द्यायच्या ,शिकवायच्या. त्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायच्या. एकदा आई त्यांना म्हणाली,"मला पण शिवायला शिकवाल का ?". त्या म्हणाल्या,"अगं माझं कसलं होंगाडे शिवणे." त्यापेक्षा माझ्या ओळखीच्या एक लांजेकर बाई आहेत त्या तुला छान शिकवतील मी त्यांना सांगते." ही  लगेच एका पायावर तयार झाली. तिच्यासोबत मी पण जायचे कारण त्यांची सखू नावाची मुलगी माझ्या एवढीच होती. पंधरा दिवसात ही शिकून तयार झाली. त्या लांजेकर बाईंचे संबंध अजून टिकून आहेत अर्थात त्या नाहीत पण त्यांची मुले संपर्कात आहेत. 

                शिवायला यायला लागले पण मशीन नव्हती आणि एवढे पैसेही नव्हते. मग वडिलांनी आणि दोघांनी जाऊन दुकानात चौकशी केली. एकूण  किंमत 365 रुपये होती. तेव्हा आधी नोंदणी करावी लागायची आणि मग मशीन मागवले जायचे. महिना पंधरा रुपये हप्त्याने मशीन घ्यायचे ठरले. आईने ते शिलाई करून हप्ते भरले. एक पुस्तक होते त्यामध्ये एक हप्ता दिला की रेवेन्यू तिकीट लावून त्या दुकानदाराची सही घ्यायची. ते पुस्तक मी अजून जपून ठेवले आहे. वडिलांना पण तिचे फार कौतुक होते. त्यांनी मशीनच्या चाकावर तिचे नाव टाकून घेतले होते. शिलाईतून आई थोडे थोडे पैसे साठवून बाजूला ठेवायची. त्या नावडीकर बाईंना ती म्हणायची,"माझे एवढे पैसे तुमच्याजवळ ठेवा, घरी ठेवले तर खर्चून जातील. त्या तिला म्हणाल्या, "हे बघ त्यापेक्षा तू बँकेत खाते काढ आणि त्यामध्ये पैसे साठव." आईने तेही केले, अर्थात त्यावेळी तिचे वय 25 ,26 त्यामुळे उत्साह खूप. वडील तिला सायकल चालवायला शिकवायचे. माळ तिथून जवळच होता. दिवसा हिला वेळ नसायचा मग रात्री शिकवायचे. हिच्या उत्साही स्वभावामुळे आणि काहीही करण्याची तयारी असल्यामुळे तिथे महिला मंडळ अध्यक्ष आठवले बाई होत्या त्यांनी हिला विचारले की,"पावडरचे दूध करून वाटप करशील का?"ती लगेच तयार झाली. त्यांनी त्यासाठी लागणारा टाकीचा स्टोव, ह्याला लागणारे रॉकेल, मोठे पातेले, ओगराळं, दूध पावडर, असे सगळे सामान त्या पुरवायच्या. माझी आई ते दूध तयार करायची आणि ज्यांना हवे ते लोक ग्लास वगैरे घेऊन दूध न्यायला आमच्या घरी यायचे . या कामाचे त्या बाई आईला काही पैसे  द्यायच्या . त्यावेळी मला या सगळ्या गोष्टींचे काहीच वाटले नव्हते मजा वाटायची. पण आता मात्र माझ्या आईने काय काय केले ते आठवून आश्चर्य वाटते आणि तिच्यासाठी मी दहा वेळा नतमस्तक होते. पूर्वी लोकांना रेडीमेड कपडे आवडायचे नाहीत. ते म्हणायचे त्याची शिलाई कच्ची असते आणि लगेच उसवते ते खरेही होते. त्यामुळे कपडे शिवून घेण्याकडे लोकांचा कल होता. सगळ्या चाळीतील मुला मुलींचे स्त्रियांचे पुरुषांचे कपडे आईकडे शिवायला यायचे. ती रात्र रात्र जागून ते शिवायची, तेही कंदीलाच्या उजेडात. माझे दादा तिला सोबत म्हणून जागत असायचे. दिवाळीमध्ये तर आईला अजिबात उसंत नसायची. त्यामुळे दिवाळीचा फराळ ती एका दिवसात तयार करायची. कष्ट करायला माझी आई वाघीण होती पण खोटेपणाचा तिला अतिशय राग होता. 


              माझे दोन मोठे भाऊ विलास आणि सु हे शाळेत जातो म्हणून जायचे आणि बाहेर जाऊन खेळत बसायचे. म्हणून त्यांना सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटील रिमांड होम मध्ये ठेवले होते. त्यांना भेटायला आई आणि दादा एकदा गेले तेव्हा मलाही नेले होते. त्या दोघांना सुट्टी असली की ते घरी यायचे, मग ते दोघेही माझे खूप लाड करायचे. मलाही खूप आनंद व्हायचा. नंतर विलास अठरा वर्षाचा झाल्यानंतर त्याला घरी सोडले होते. दादांनी विचार केला की विलास रिकामा बसणार त्यापेक्षा त्याला सायकल दुकान काढून देऊ. तेव्हा 250 रुपयाला एक याप्रमाणे सायकल मिळत होत्या. सहा सायकल आणल्या होत्या. एक खोके एका चौकात मोक्याच्या ठिकाणी ठेवले होते. सायकल भाड्याने दिल्यावर एका रजिस्टर मध्ये नोंद करायची असायची. सगळी जय्यत तयारी झाली.  दादांनी गजराचे घड्याळ आणले. ते म्हणाले उद्या लवकर उठून दुकानात पूजा वगैरे करून सुरुवात करूया. पहाटे गजर होईल. बापरे मला वाटले घड्याळाला कसे कळणार साडेपाच वाजले?. या विचारानेच मला झोप आली नाही. सारखी उठून घड्याळ बघत होते. इतके सगळे झाले. पण भावाचा हट्ट होता की त्याला आर्मीत जायचे आहे, त्यामुळे त्याने सायकल कोणी भाड्याने नेली तरी नोंद ठेवत नव्हता, दुर्लक्ष करत होता. एक सायकल चोरीला गेली. खरंतर वडिलांना त्या सायकल्स घेण्यापुरते कशाचे तरी पैसे मिळाले होते. आईला सायकल चोरीला गेल्यामुळे खूप वाईट वाटले. ती म्हणाली,"काही नाही माझी मशीन तिथे नेऊन ठेवा. मी तिथे बसून शिलाई पण करेन आणि नोंदी पण ठेवीन."मग काय आम्ही सगळे त्या दुकानात असायचो. त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक पण दुकान बंद केले. इतके काही कळण्याचे माझे वय नव्हते. त्या माझ्या भावाला विलासला जेव्हा आर्मी भरती असेल तेव्हा मी आणि माझे दादा आणि तो जायचो. त्यानंतर जवळजवळ एक वर्ष केवळ आईने केलेल्या शिलाईच्या पैशावर घर चालले. अर्थात हे मला थोडे कळायला लागल्यावर त्यांच्या बोलण्यातून कळाले. माझे दादा आईला कधी म्हणाले की ,"पैसे आहेत का ?"तेव्हा ती म्हणायची असतील बघा मशीनच्या ड्रॉवरमध्ये"त्यावर माझे दादा म्हणायचे,"तुझी मशीन म्हणजे कामधेनु आहे का?". पुन्हा त्यांची चर्चा सुरू व्हायची की आता काय उद्योग करूया?. मी तिथे आसपास असले की म्हणायचे आपण हॉटेल काढूया, कारण डोळ्यापुढे हॉटेलमधले छान छान पदार्थ दिसायचे. ते दोघे फक्त हसायचे. माझे दादा म्हणायचे, "मी केस कापायचा धंदा सोडून बरेच उद्योग केलेत, म्हणजे ट्रक होता, रेशन दुकान  होते, आणखी बरेच काही. मी जन्माला येण्यापूर्वी माधव नगरला खानावळ होती. तिथेच माझा जन्म झाला. त्यावेळी माझे दोन चुलत काका मदतीला असायचे म्हणे. आई सांगायची त्या कामातून तिला सवड नसायची. त्यामुळे वडिलांनीच मला देवी टोचून आणल्या होत्या. नंतर माझे  कान ही त्यांनी बाहेरून टोचून आणले. परत काय झाले कुणास ठाऊक पण त्यांनी सगळे मेढ्याला म्हणजे मेढे गाव आहे तिथे हलवले. तिथे खानावळ सुरू केली. तिथे शिंदे म्हणून एक तहसील कार्यालयातील जेवायला येत. आणखी काही दिवसांनी वडिलांनी ठरवले की आता कराडला जायचे. त्यावेळी जरुरी पुरते सामान घेऊन कराडला आले. बरीच छोटी मोठी भांडी आणि सामान त्या शिंदे म्हणून होते त्यांच्याकडे ठेवली होती. ते शिंदे सारखे पत्र पाठवून म्हणत होते की तुमची भांडी आणि सामान घेऊन जा. पण वडिलांनी लक्ष दिले नाही. आणि काही दिवसांनी वडील भांडी व सामान आणायला गेले तेव्हा, ते शिंदे म्हणाले,"कुठली भांडी माझ्याकडे काही भांडी वगैरे नाहीत." मग वडिलांना खडबडून जाग आली. कोर्टात जायचे तर वकिलाची फी भरण्याची पैसे कुठले? पण त्यांचे एक मुतालिक नावाचे वकील मित्र होते. ते सातार मध्ये होते. ते म्हणाले,"मी तुझी केस घेतो, मला काही पैसे वगैरे नको". केस सातारच्या कोर्टात असायची. त्यावेळी एसटी भाडे अगदी कमी होते तरीही परवडायचे नाही आणि मी लहान असल्याने मला ते आठ नंबर भाभींकडे ठेवून जायचे. त्या भाभी मला आंघोळ घालण्यापासून सगळे करायच्या. त्यांची आणि माझ्या आईची चांगली मैत्री होती. चाळीत त्यावेळी सगळ्यांकडे बंब होते. आणि हे दोघे म्हणायचे की त्या भांड्यात आपला बंब पण आहे. त्यामुळे ते दोघे सातारहून आले की मी उत्सुकतेने आपला बंब आला का म्हणून पहायची. पण निराशाच व्हायची. एकदा ते वकील म्हणाले की,"काहीतरी लेखी पुरावा असता तर बरे झाले असते". त्यावर आई म्हणाली,"त्यांची पत्रे आहेत तुमची भांडी घेऊन जा म्हणून , ती चालतील का?"त्यावेळी पाच पैशाची पोस्ट कार्ड असायची आणि ती एका तारेत खुपसून ठेवलेली असायची. तर त्यावर वकील म्हणाले,"हो हो चालतील ना."आणि मग ते शिंदे पण तडजोड करायला तयार झाले. सगळी भांडी नाही पण बरीच भांडी आणि ज्याची मी उत्सुकतेने वाट पाहत होते तो बंब परत मिळाला आणि मला खूप आनंद झाला.  त्या त्या वेळेचा आनंद वेगळाच असतो. एकदा मला शाळेत जाताना 25 पैशाचे नाणे सापडले होते. ते मी मुठीत घट्ट धरून ठेवले होते आणि त्या 25 पैशात काय काय घेता येईल याचे स्वप्न रंगवले होते. कारण त्यावेळी रावळगाव चॉकलेट पाच किंवा तीन पैशाला मिळायचे.

  

Monday, February 23, 2026

आर्थिक स्वावलंबन ...फायर (Financial Independence Retire Early) - FIRE

 "ए  राजा ऊठ ",


"झोपू दे गं आई अजून थोडं"


"अरे शाळेत जायला उशीर होईल "


"होऊ दे "


"दररोज मी का जायचं  शाळेत याची दोन चांगली कारणं दे तरंच उठतो"


" एक म्हणजे तू आता पन्नास वर्षाचा घोडा आहेस आणि दुसरे म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस."  हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित कि हो ना राव मला पण नाही जायचं रोज उठून काम करायला.


मला  माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे. पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय लागतो आपण  त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमाने इतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं  तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलेच पाहिजे ह्या विचाराचे मनावर इतके पक्के गारुड असते कि नोकरी कायम स्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. हळू हळू माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार "निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल" असं म्हणत बाजूला पडतात.


खरंतर आपण निवृत्ती पर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं कि आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या रिटायरमेंटचा दिवस येईपर्यंत काम केलेच पाहिजे. अशावेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं कि तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण जे सर्वमान्य काम करण्याचे वय ठरवले आहे त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत ते पूर्ण  करू शकता तर तुम्ही अश्या वक्तव्यावर काय म्हणाल ? "कसं  श्यक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल " , "ह्म्म्म असेल पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी कि "खरंच काय बर करावं लागेल यासाठी, बघूया तरी आपल्याला जमतंय का? असं काही. चला तर मग बघुयाच हा प्रकार काय आहे.


आपण नोकरी  करतो ते दरमहिना ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग असे ठराविक उत्पन्न आपल्याला नोकरी न करता मिळाले तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी हि केवळ अर्थार्जनासाठी करत असू तर ती करण्याची काही गरज अश्यावेळी राहात नाही.


या प्रकारचे आर्थिक स्वावलंबन हे अंतिम ध्येय असले तरी ते गाठण्यासाठी मात्र अनेक टप्पे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ठरवणं कि आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अश्या दोन्ही आघाड्यांवर प्राध्यान्य कोण कोणत्या गोष्टींना आहे. या प्राधान्य असणाऱ्या गोष्टींपैकी पैसा कोणत्या गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल अश्या प्रकारे साधारण रूपरेषा ठरली कि त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.


आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही तसा उशिराच म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. आम्ही म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा मी मुलीच्या जन्मावेळी भारतात गेले असताना गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केट आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायाला हवा हि जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अश्या गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरु झाला होता.


आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचे सगळे श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमची बचत आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैश्याच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरु झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला तेव्हा खरं तर एवढं शिकलो ते यासाठीच ना नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड हा पहिला विचार होता. पण योगायोग असा कि दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्यूत्तर क्षेत्रात काम करतो आपण माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचे होत असेल असे आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल अश्या चार पाच गोष्टींतरी मनातं नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचे काम आवडते पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. मलाही माझ्या आवडी आणि छंदांना जास्त वेळ द्यायचा आहे. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्या सोबत भरपूर भटकायचं आहे, तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जग फुलवायचं आहे. असा सगळा विचार करता करता लक्षात आलं कि हे सगळं करायचं तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.


सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्या पासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी कुठे कुठे खर्चात कपात करता येईल या कडे कटाक्षाने लक्ष दिले. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहात होतो ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचे गाव होते त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. एकाच कंपनीत असलो तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्स मध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्या इतपत होती तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबे आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती आणि नवरा बायको दोघांकडे वेग-वेगळी गाडीही होती. आम्हाला त्याची फारशी गरज वाटली नाही आणि त्यामुळे दोघात एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो तोपर्यंत हि व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरु झाली कि लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे. घरांची किंमत आवाक्यात गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडे देत छोट्या अपार्टमेंट मध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये ?असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा  निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्यानं घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (जसे कि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचे ठिकाण इ.) टाकले कि त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्ष त्या घरात राहाणं आवश्यक आहे याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच सहा वर्ष राहाणं तरी गरजेचे होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खात्री नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन तीन वर्षातून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी, आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो मोबाईल फोन चे बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. ते थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ठ प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्यतो रोज घरून डबा घेऊन जाणं आणि कॅंटीन मध्ये विकत न खाणं यावर भर दिला. याचा दुहेरी फायदा अस कि पैसे तर वाचतातच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अश्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना "हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना? "असा प्रश्न  करत असतो त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.


याचा अर्थ असा नाही कि आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीलाच कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचे त्याची एक साधारण यादी तयार केली होतीच. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि विकांताला जवळपास भटकंती, कॅम्पिंग, माझे फ्लायिंग, नवऱ्याचे रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग आणि आम्हा तिघांचं स्कीईंग अशा आवडी आणि छंदासाठी वाजवी खर्च करण्याला आमची तयारी असते. या सगळ्या गोष्टीसाठी साहित्य घेताना नेहमी आम्ही उत्तम दर्जाचंच घेतो पण जिथे पैसे वाचवणे शक्य आहे तिथे ते या गोष्टी करतानाही वाचवतो. जसे कि चांगले साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतो ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना एअर बी अँड बी सारख्या साईट वरून जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो किंवा हॉस्टेल्समधे राहतो. बाहेरच्या देशात गेलो तरी लोकल ट्रान्सपोर्टनं  फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अश्या गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधी मिळते.  वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट  करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच हि गोष्ट आहे ना याचा काटेकोरपणे विचार करतो.


कुटुंब म्हणून आमचा कल वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर आहे. शिवाय ऑउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अश्या संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्ट मधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून आम्ही साधारण दोन वर्षांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्यावेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोचलो आहे. इथे सुद्धा दोघंही एकाच कंपनीत असल्यामुळे एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तश्याच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधले आहेत. इथे थोडी वर्ष राहिल्यानंतर कदाचित अजून काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्या प्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. हे आम्ही चाळीशी गाठेपर्यंत म्हणजे अजून चार पाच वर्षात होईल अशी अपेक्षा आहे.


एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल - http://www.mrmoneymustache.com/2012/01/13/the-shockingly-simple-math-behind-early-retirement  हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल पण मूळ संकल्पना तशीच राहील.


शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचा खोचा जाणून घ्यायला हव्यात. मी अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खात्रीशीर रित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं सांगू शकत नाही कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेग-वेगळ्या. अंतिम ध्येय हे पैसा साठवणे नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असे नाही. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे. 


आमच्या या प्रवासात आम्हाला खालील पुस्तके आणि ब्लॉग्ज यांचा मार्गदर्शनासाठी बराच उपयोग झाला.


पुस्तक यादी

१. इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामीन ग्रॅहम ( हे वाचून कळले कि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक  करायची असल्यास खूप  अभ्यास करावा लागेल आणि वेळ द्यावा लागेल त्यामुळे इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला )

२. बॉगलहेड्स -  ( हे पुस्तक वाचून कळले कि यूएस मध्ये कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.)


ब्लॉग यादी

१.एमएमएम   - http://www.mrmoneymustache.com

२. बॉगलहेड्स - https://www.bogleheads.org/forum/index.php

३. मॅडफिएन्टिस्ट - http://www.madfientist.com

४. कॅनेडियन काऊच पोटेटो - https://canadiancouchpotato.com



भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला 

१. जागो इंव्हेस्टर - http://www.jagoinvestor.com

२. सुब्रमनी - http://www.subramoney.com

३. फ्री फिन कॅल - https://freefincal.com


तुम्ही सुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचेही स्वागत आहे.



कॅनडामध्ये स्थलांतर


आमच्या ओळखीत काही जणांनी स्वतः पिआर करुन कॅनडात येऊन जोब शोधले आहेत. त्यामुळे पिआर करणे आणि जॉब मिळणे ही अवघड गोष्ट नाही. पण ज्यांनी केले आहेत ते शक्यतो भारतातुन पिआर करुन इथे आले (मोस्ट्ली कुटुंबाला भारतातच ठेऊन). इथे येऊन जॉब शोधला आणि मग कुटुंबाला बोलावुन घेतले.
आमच्या केस मध्ये तुम्ही आधिच्या धाग्यात वाचल्या प्रमाणे नवर्‍याने आधी एक दोन वर्ष कॅनडातल्या ब्रांचमधल्या लोकांशी नेट्वर्किंग करणे सुरु केले होते. त्यामुळे त्याच्या प्रोफाईला साजेशी संधी येताच वेग वेगळ्या लोकांनी त्याला या रिकाम्या होणार्‍या जागेबद्दल आणि हायरिंग मॅनेजरला त्याच्या बद्दल सांगितले. हे सगळं पाल्हाळ सांगण्याचा उद्देश हा कि तुझ्या कंपनीची ब्रांच इथे असेल तर नेटवर्किंग चालु करायला हरकत नाही. अर्थात तुझ्या सध्याच्या साहेबाला चालणार असेल तर. त्याला कल्पना देउन त्याच्याकडुन किंवा अजुन कोणी सिनिअर मेंटॉर असेल तर त्याच्या कडुन काही होईल का याची चाचपणी करायला हरकत नाही. या गोष्टीसाठी वेळ लागेल पण हा एक हमखास नोकरी मिळण्याचा यशस्वी मार्ग आहे.
शिवाय, ज्या लोकांनी इथे येऊन नोकरी शोधली त्यांना त्यांच्या आधीच्या प्रोफाईल पेक्षा थोड्या खालच्या पातळीवर सुरुवात करावी लागली कारण जरी तुमची पात्रता असली तरी तुमच्या कामबद्दल हमी देणारी, तुमच्या बरोबर काम केलेली लोकं इथली नसतात. काही अपवाद असतील पण मी ज्यांचे अनुभव ऐकले त्यांनी तरी असे सांगितले.
शिपिंग इंडस्ट्रीमधे माझ्या काही ओळखी नाहीत. नवर्‍याला विचारुन बघते. आमचे काही कस्ट्मर्स शिपिंग इन्डस्ट्री मधे आहेत आणि नवरा सेल्स मधे असल्यामुळे त्याचे काही काँटॅक्ट असतील तर विचारेन (आत्ता तो परगावी आहे).
सरकारकडुन एक्स्पेन्सेस मिळण्याबाबत मला काही कल्पना नाही आणि मिळत जरी असतील तरी ती अगदीच तुटपुंजी रक्कम असेल असे मला तरी वाटते. कॅनडा गवर्मेंट्च्या वेबसाईट्वर कदाचीत काही माहिती मिळेल.
as a bachelor आणि पुढे फॅमीली आल्यावर खर्चात किती तफावत येते? ऑन अॅन अॅवरेज हाउसींग, शाळा, भाजी-पाला वगैरे साठि साधारण किती खर्च येतो?
कॅनडामधे हाऊसिंग महाग आहे, विशेषतः व्हॅंकुवर आणि टोरांटोमधे, पण एकटे रहाणार असाल आणि शेअर्ड अकोमोडेशनला हरकत नसेल तर ५००CAD/महिना किंवा कमी मधे सुद्धा राहायची सोय होऊ शकेल. ग्रोसरी महिन्याला २००CAD (तु स्वतः करुनच खाणार असं ग्रुहित धरलंय ;)), युटिलिटीज कॉमन असतील तर साधारण १५०CAD (इलेक्ट्रीसिटि+ इंटरनेट), फोन ४५-५० CAD आणि कम्युट १५०- २०० CAD, जर नोकरी नसेल तर बाकी खर्च करण्यावर थोडे नियंत्रण असेल म्हणुन हा हिशोब केला आहे. तर साधारण १००० CAD/ महिना असा खर्च धरायला हरकत नाही. कोणीही जर पेनी पिंचर असेल तर बर्‍यापैकी कमी पैशात काम भागायला हरकत नाही.
पुढे जर कुटुंबाला आणायचे असेल तर २ बेडरुम अपार्ट्मेंटला आमच्या एरीयामध्ये साधारण १५००- १७०० भाडं आहे. नुकताच काही टेनंट प्रोटेक्षन लॉ पास झाला आहे त्यामुळे लाँग्टर्म लीज करणेसुद्धा सहज शक्य होईल असे वाटते. टाऊन्हाऊस भाड्याने घ्यायचे झाल्यास साधारण १८००- २००० पर्यंत मिळेल. सध्या हाऊसिंग मार्केट खूप हाय आहे . सिन्गल फॅमिली होम (३/४ बेडरुम्स) विकत घ्यायचे असल्यास साधारण ८००,००० ते १,०००,००० पर्यंत किमती आहेत आणि तेही जुन्या घरांच्या. असो तो नंतरचा प्रश्न आहे पण एक कल्पना असावी म्हणुन सांगितले. आणि मग बाकी खर्च तुमच्या कुटुंबाच्या आकाराच्या आणि कोणत्या गोष्टिसाठी खर्च करण्याला प्राधान्य आहे त्याप्रमाणे वाढेल. (छोटं घर, पब्लिक ट्रांस्पोर्ट, युस्ज्ड कार Vs नविन कार, अ‍ॅक्टीविटीज इ. इ.). मु़ख्य म्हणजे वर्क व्हिजा/पिआर असल्यावर हेल्थ केअर कार्ड मिळते. त्यामुळे किरकोळ आजारासाठी वॉक-इन डॉक्टरकडे गेल्यास एक पै खर्चावी लागत नाही. प्रिस्क्रिप्शन वर कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समुळे काही डिस्काऊंट मिळतो. (कुवेतचं मला माहित नाही पण आम्ही ६ वर्ष युएस मधे रहिल्यामुळे तिथल्या हेल्थकेअर पेक्षा ही सिस्टीम आम्हाला फारच छान वाटली)
सरकारी शाळांमध्ये एजुकेशन फ्री आहे (थोडीफार अ‍ॅक्टीविटी फी वगैरे असेल पण अगदीच नगण्य). आपल्या कॅचमेंट मधल्या शाळेत प्रवेश सहज मिळतो. शिवाय अर्ली /लेट फ्रेंच इमर्शन असे पर्याय सरकारी शाळेतही उपलब्ध आहेत. शाळांचा दर्जा युएसच्या शाळांच्या तुलनेत चांगला आहे असं ऐकलं वाचलं आहे. मुलांना डे केअर मधे वगैरे पाठवायचा साधारण खर्च ८००- १००० CAD/ child upto 5yrs. ज्या वर्षात मुल पाच वर्षाचे होते त्या वर्षात सप्टेंबरमधे केजी मध्ये घालु शकता. बिफोर आणि आफ्टर स्कुल केअर सेंटर शाळेत किंवा शाळेच्या जवळपास मिळुन जाते.
शिवाय कम्युनिटी मधल्या सोयी चांगल्या आहेत. पब्लिक पार्क्स, रिक्रिएशन सेंटर्स चांगली आहेत. पब्लिक ट्रांस्पोर्ट चांगले आहे. मल्टी एथनीक कम्युनिटि आहे. व्हॅंकुवरमधे हिवाळ्यात तापमान शुन्याच्या (c) खाली फार कमी वेळा जाते, सिटित स्नो पडला तर अगदी अर्धा दिवस वगैरे रहातो. आजुबाजुच्या डोंगरांवर बघायला मिळतो. गावातच २-३ स्कि रिसॉर्ट्स पण आहेत.

Monday, June 19, 2023

होमस्कुलिंग

होमस्कुलिंग म्हणजे काय 


मी आणि माझा नवरा नेहमी होमस्कुलिंग बद्दल वाचत असतो आणि जस्तीत जास्त त्याबद्दल माहिती करुन घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यातुन जे काही समजलं उमजलं आहे ते इथे लिहायचा प्रयत्न करते.
याबद्द्ल जेव्हढं वाचलं आहे त्यातुन याचे दोन प्रकार आहेत असं वाटतं. एक म्हणजे शाळेतला अभ्यासक्रम घरात फॉलो करणे किंवा एक पॅटर्न ठरवुन त्या प्रमाणे घरी ठरविक वेळापत्रक आखुन अभ्यास. याचा फायदा म्हणजे मुलाला शाळेतलाच अभ्यास पण त्याच्या सोयीने आणि आवडीप्रमाणे करता येणे. म्हणजे मी मराठीच पुस्तक वाचतीय आणि ४५ मि झाले तरी मला तेच वाचायचं शाळेत मला ते करता येणार नाही कारण मला तिथलं टाइमटेबल फॉलो करायचं आहे. पण घरी मी दिवसभर तेच वाचत बसेन. मग उद्या मी गणित , भुगोल असा काही अभ्यास करेन. किंवा एक दोन दिवस काहिच करणार नाही. यात मुलाचा फायदा म्हणजे जे काही वाचन आणि अभ्यास होणार आहे तो केव्हा आणि कसा करायचा ते ठरवायचं स्वातंत्र्य मुलाला असल्यामुळे जेवढं काही वाचन - लेखन होतं ते मनापासुन होतं आणि विषयाची चांगली जाण येते. उगाच करायचं म्हणुन किंवा मारुन मुट्कुन काही घडत नाही.
दुसरा प्रकार म्हणजे अनस्कुलिंग. म्हणजे आपल्या गरजेनुसार आणि आवडीप्रमाणे शिकणे. जसं कि मी शाळेत जात नाही म्हणुन व्हिडिओ गेम्स खेळत बसले दिवसभर तर मला काहि दिवसांनी त्याचा कंटाळा येईल मग मला स्वतः व्हिडिओ गेम्स बनवावे वाटले तर मग त्यासाठी कोणतं पुस्तकं वाचायला लागेल काय कोर्स करता येईल आणि ते मी शिकणं म्हणजे थोडक्यात रिव्हर्स इंजीनिअरिंग किंवा बिगिन विथ द एंड इन माईंड. मग मला माझ्या ध्येया पर्यंत पोचण्यासाठी जे काहि शिकायला लागेल ते मी शिकणार. पण त्याव्यतिरिक्त दुसरं काही शिकणार नाही. किंवा इन जनरल आजुबाजुच्या व्यवहारिक जगातुन प्रत्यक्ष शिक्षण घेणार. मग यात संगणक प्रोग्रॅमिंग पासुन ते अ‍ॅस्ट्रॉनॉमी पर्यंत काहिही येऊ शकतं.
युट्युबवर बर्‍याच भारतातल्या पालकांचे होमस्कुलिंग बद्दलचे विचार आणि माहिती किंवा स्वानुभव सांगणारे व्हिडिओ आहेत. भारतातल्या होमस्कुल करणार्‍या पालकांची एक असोशिएशन पण आहे हि त्याची लिंक - स्वशिक्षण
हि त्या एमआयटीला गेलेल्या होमस्कुल्ड मुलीची लिंक
हे सगळं वाचुन आणि असंख्य युट्युब व्हिडिओ / टेड टॉक्स बघुन असं वाटतं कि खरचं का आपण आपल्या बाळांना शाळेत पाठवायला पाहिजे. शाळा म्हणजे फन आहे पण त्याबरोबर बाकिच्या कितीतरी स्ट्रेसफुल गोष्टिहि आहेत ज्या शाळेबरोबर येतात. एकदा का आपण त्या सिस्टिममधे घुसलो कि त्याबरहुकुम वागावेच लागते तिथे काही एक्सेप्शन नाही. त्यामानने आपण घरात बरचं फ्लेक्सिबल राहु शकतो. मुलांना सोशल करायला घराबाहेर खेळायला घेऊन जाणं, त्यांना ज्या अक्टिव्हिटीमधे इंटरेस्ट आहे त्याचं कोचिंग उपलब्ध करुन देणं यातुनही मुलं सोशलायज होऊ शकतात.
आता मी एवढं लिहिलय म्हणजे माझी पोरगी १००% होमस्कुल करणार का? तर माहित नाही. सध्या तरी ती (५ वर्ष) मॉन्टेसरी टाइपच्या डे केअरला जाते आणि तिथे आनंदी आहे. आम्ही दोघेही जॉब करतो. पुढे मागे दोघापैकी एकाने जॉब सोडला तर होमस्कुलिंग पर्यायाचा आम्ही नक्किच विचार करणार आहोत.
बाकि how children fail आणि how children learn हि John Holt यांची पुस्तकं वाचनिय आहेत. सर केन रॉबिन्सन यांचा हा टेड टॉकहि इंटरेस्टिंग आहे.

Wednesday, February 7, 2018

कॅम्पिंग साहित्याची ओळख

कॅम्पिंग हा प्रकार वेगळ्या नावाने आपण भारतात करतच असतो. ते ट्रेक्स जेव्हा आपण दिवसभर वणवण करून कोण्या एका गडावर जातो ,तिथल्या मंदिरात किंवा गुहेत पथारी पसरतो. भोवतालचे तीन दगड एकत्र करून सोबत नेलेल्या सामानातून काही बाही शिजवून खातो आणि सोबत आणलेल्या पांघरुणात मस्त ताणून देतो. थोड्याफार फरकाने या अश्याच प्रकाराला बाहेरच्या देशांमधे हायकिंगआणि कॅम्पिंग म्हणतात. पुण्यात राहत असताना सह्याद्रीमध्ये एकदिवसीय नाईट ट्रेक भरपूर केले. तेंव्हा हायकिंगआणि कॅम्पिंगसाठी कश्याप्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात ह्याची फारच जुजबी माहिती होती. आत्ता माझ्याकडे जे काही हायकिंगआणि कॅम्पिंग साहित्य आहे ते जर माझ्याकडे भारतात असताना देखील असले असते तर त्या ट्रेक्सना अजून रंगत आली असती.
आम्ही (मी आणि नवऱ्याने ) भारतातही बरंच ट्रेकींग केल्यामुळे अमेरिकेत आल्यावर सुद्धा इथे आपल्याला कुठे कुठे जाता येईल याचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली आणि इथेही ट्रेकींग आणि त्याच्या जोडीने कॅम्पिंग सुरु झालं . हळुहळु करत जे गरजेचं आहे ते कॅम्पिंगच सामान आमच्याकडे जमा होत गेलं. त्याचीच माहिती या लेखात द्यायचा प्रयत्न आहे.

सुरुवातीला टेंट बद्दल बघू, कुठेही (भौगोलीक दृष्ट्या) आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात वापरण्यायोग्य टेंट हवा असेल तर डबल वौल्ड , थ्री सीजन , वेस्टिब्युल असलेला टेंट घेतलेला चांगला. वेस्टिब्युल म्हणजे टेंटच्या दारासमोर थोडा आडोसा असलेला भाग , याचा उपयोग पावसात स्टोव्ह पेटवून खाणे तयार करण्यासाठी किंवा जास्तीचे सामान ठेवण्यासाठी होतो. जर मुख्यत्वे backpacking प्रकारचे कॅम्पिंग करायचे असल्यास हलका साधारण दोन किलोच्या आसपास (पाच पौंड पेक्षा कमी )वजन असलेला टेंट घेतलेला बरा.
खालच्या फोटोमध्ये टेंटच्या समोरच्या भागात जो ताणून पुढे आलेला भाग आहे तोच वेस्टिब्युल एरिया



अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे backpack किंवा rucksack - ऑस्प्रे कंपनी अप्रतीम backpack बनवण्यात अग्रेसर आहे. डोयटर (Deuter) कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या backpack बनवते. भारतात आड्वेंचर वल्ड या कंपनीच्याही  backpack  मिळतात .  जर उद्देश नुसते एक दिवसाचेच ट्रेक्स करायचा असेल तर साधारण २० ते ३० लि. ची backpack पुरेशी असते पण २ -३ दिवसांच्या ट्रेकसाठी ५०लि आणि ५ पेक्षा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी ७० लि. ची backpack असेल तर सगळे सामान त्यात व्यवस्थित बसते. 
माझ्याकडे ४० लि. ची आड्वेंचर वल्डची backpack आहे तर नवऱ्याकडे ऑस्प्रेची ६०लि. ची. माझ्या bag  ला खांद्यावर येणाऱ्या पट्यांना चांगले कुशनिंग आहे तसेच bag  हेलकावे न खाता पाठीवर व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला बांधायला सुद्धा एक पट्टा आहे. पाठीला आधारासाठी bag  च्या आतल्या बाजुला दोन अल्युमिनीयमच्या पट्ट्या आहेत. ऑस्प्रे bag  ला असेच खांद्याचे आणि कमरेचे पट्टे आहेत पण पाठीला वरपासुन खाली पर्यंत आधार देणारे जास्त चांगले पॅडिंग आहे. 

फोटो आड्वेंचर वल्डची backpack -                                                                   फोटो ऑस्प्रेची backpack


आता स्लीपिंग bag आणि स्लीपिंग पॅड/mat निवडीबद्दल थोडी माहिती घेऊया . 
साधारणत:  स्प्रिंग, समर ,फॉल (वसंत ऋतु , उन्हाळा आणि शरद ऋतु / पानगळ) या दरम्यान कॅम्पिंग करायचे असल्यास २० ते ३० डिग्री फ़ेरनाईट (- ६ ते -१ डिग्री सेल्सिअस ) साठी तयार केलेली स्लीपिंग bag पुरेशी होईल तर low  altitude विंटर कॅम्पिंगसाठी ० ते १५ फ़ेरनाईट(- १८ ते -९ डिग्री सेल्सिअस) साठी तयार केलेली स्लीपिंग bag घ्यावी. डाऊन आणि सिंथेटीक अश्या दोन प्रकारच्या स्लीपिंग bag असतात. सिंथेटीक प्रकारची स्लीपिंग bag ही डाऊनच्या तुलनेत थोडी जड असते पण ओली झाल्यास लवकर वाळते.
डाऊन (नारंगी)आणि सिंथेटीक (निळी) स्लीपिंग bag. 



स्लीपिंग पॅड निवडताना त्याचे R रेटिंग  महत्वाचे असते. जेवढे जास्त R रेटिंग तेवढे चांगले इन्सुलेशन पण तेवढेच जास्त वजनही वाढते मग या स्लीपिंग पॅडचे. ३ R रेटिंग असलेले स्लीपिंग पॅड वेगवेगळ्या वातावरणातल्या  कॅम्पिंगसाठी पुरेसे होऊ शकते आणि त्यामानाने वजनाने देखील हलके असते. काही फुगवून वापरायची स्लीपिंग पॅडस कमी जागा व्यापणारी आणि वजनाने हलकी अशी असतात . Therm-a-rest, Exped, Big Agnes यांची स्लीपिंग पॅड चांगली आहेत. अगदीच हलके काही हवे असेल तर फोमचे स्लीपिंग mat ही मिळतात पण यात इन्सुलेशन फारच कमी असते.
Exped






आता कॅम्पसाइटवर खाणे तयार करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाचा स्टोव्ह आणि भांडी 
MSR या कंपनीचे  Whisperlite / Dragonfly हे दोन स्टोव्ह वेगवेगळ्या इंधनावर (multiple  fuel) वापरता येतात. त्यामुळे ते भारताबाहेर आणि भारतातही तेवढ्याच सहजतेने वापरता येऊ शकतात, शिवाय high altitude आणि थंड विरळ हवेत सुद्धा हे स्टोव्ह चांगले चालतात. GSI आणि snow peak  ह्यांची भांडी चांगल्या दर्जाची वजनाला हलकी आणि कमी जागेत मावणारी आहेत.इथे शक्यतो सगळ्या स्पोर्टींग गुडसच्या दुकानात fuel canister मिळतो. मोठ्या सुपरमार्केट मध्ये कोलमन चे मोठे स्टोव्ह आणि fuel canister मिळतात ते backpacking पेक्षा कार कॅम्पिंगसाठी जास्त सोयीस्कर असतात.
high altitude मध्ये  पाणी गरम करण्यासाठी उपयुक्त असे jetboil भांडे . पाणी गरम झाले कि यावरचा इंडिकेटर नारंगी रंगाचा होतो.
जेट बॉईल                                   



केनिस्टर सह कुकिंग स्टव्ह 



कुकिंग किट

























या व्यतिरिक्त कॅम्पिंग आणि हायकिंगला पूरक अश्या गोष्टी म्हणजे चांगले सोल असलेले हायकिंग ( हे मोठ्या हाईकच्या आधी घेऊन वापरायची सवय करावी). हायकिंग पोल, Swiss knife, Nalgene बॉटल , dry compressions sacks , हेड lamp, कॅम्पसाइट lamp , हमक अश्या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत.
Nalgene बॉटल आणि हमक पॅक 

कॅम्पिंग आणि हायकिंग साहित्य घेण्यासाठी अजून जास्त महिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आत्मानंद - प्रेमा नरेवाडीकर - 4

            मला बाहेर जायचे म्हटले की आई किंवा कोणीतरी मैत्रीण बरोबर हवी असायची. त्यामुळे माझे सगळे अर्ज पोस्टात जाऊन शरदच रजिस्टर करायचा. त...