"ए राजा ऊठ ",
"झोपू दे गं आई अजून थोडं"
"अरे शाळेत जायला उशीर होईल "
"होऊ दे "
"दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे तरंच उठतो"
" एक म्हणजे तू आता पन्नास वर्षाचा घोडा आहेस आणि दुसरे म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित कि हो ना राव मला पण नाही जायचं रोज उठून काम करायला.
मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे. पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमाने इतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलेच पाहिजे ह्या विचाराचे मनावर इतके पक्के गारुड असते कि नोकरी कायम स्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. हळू हळू माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार "निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल" असं म्हणत बाजूला पडतात.
खरंतर आपण निवृत्ती पर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं कि आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या रिटायरमेंटचा दिवस येईपर्यंत काम केलेच पाहिजे. अशावेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं कि तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण जे सर्वमान्य काम करण्याचे वय ठरवले आहे त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत ते पूर्ण करू शकता तर तुम्ही अश्या वक्तव्यावर काय म्हणाल ? "कसं श्यक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल " , "ह्म्म्म असेल पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी कि "खरंच काय बर करावं लागेल यासाठी, बघूया तरी आपल्याला जमतंय का? असं काही. चला तर मग बघुयाच हा प्रकार काय आहे.
आपण नोकरी करतो ते दरमहिना ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग असे ठराविक उत्पन्न आपल्याला नोकरी न करता मिळाले तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी हि केवळ अर्थार्जनासाठी करत असू तर ती करण्याची काही गरज अश्यावेळी राहात नाही.
या प्रकारचे आर्थिक स्वावलंबन हे अंतिम ध्येय असले तरी ते गाठण्यासाठी मात्र अनेक टप्पे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ठरवणं कि आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अश्या दोन्ही आघाड्यांवर प्राध्यान्य कोण कोणत्या गोष्टींना आहे. या प्राधान्य असणाऱ्या गोष्टींपैकी पैसा कोणत्या गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल अश्या प्रकारे साधारण रूपरेषा ठरली कि त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.
आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही तसा उशिराच म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. आम्ही म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा मी मुलीच्या जन्मावेळी भारतात गेले असताना गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केट आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायाला हवा हि जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अश्या गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरु झाला होता.
आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचे सगळे श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमची बचत आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैश्याच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरु झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला तेव्हा खरं तर एवढं शिकलो ते यासाठीच ना नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड हा पहिला विचार होता. पण योगायोग असा कि दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्यूत्तर क्षेत्रात काम करतो आपण माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचे होत असेल असे आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल अश्या चार पाच गोष्टींतरी मनातं नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचे काम आवडते पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. मलाही माझ्या आवडी आणि छंदांना जास्त वेळ द्यायचा आहे. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्या सोबत भरपूर भटकायचं आहे, तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जग फुलवायचं आहे. असा सगळा विचार करता करता लक्षात आलं कि हे सगळं करायचं तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.
सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्या पासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी कुठे कुठे खर्चात कपात करता येईल या कडे कटाक्षाने लक्ष दिले. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहात होतो ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचे गाव होते त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. एकाच कंपनीत असलो तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्स मध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्या इतपत होती तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबे आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती आणि नवरा बायको दोघांकडे वेग-वेगळी गाडीही होती. आम्हाला त्याची फारशी गरज वाटली नाही आणि त्यामुळे दोघात एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो तोपर्यंत हि व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरु झाली कि लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे. घरांची किंमत आवाक्यात गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडे देत छोट्या अपार्टमेंट मध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये ?असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्यानं घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (जसे कि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचे ठिकाण इ.) टाकले कि त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्ष त्या घरात राहाणं आवश्यक आहे याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच सहा वर्ष राहाणं तरी गरजेचे होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खात्री नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन तीन वर्षातून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी, आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो मोबाईल फोन चे बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. ते थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ठ प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्यतो रोज घरून डबा घेऊन जाणं आणि कॅंटीन मध्ये विकत न खाणं यावर भर दिला. याचा दुहेरी फायदा अस कि पैसे तर वाचतातच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अश्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना "हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना? "असा प्रश्न करत असतो त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.
याचा अर्थ असा नाही कि आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीलाच कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचे त्याची एक साधारण यादी तयार केली होतीच. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि विकांताला जवळपास भटकंती, कॅम्पिंग, माझे फ्लायिंग, नवऱ्याचे रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग आणि आम्हा तिघांचं स्कीईंग अशा आवडी आणि छंदासाठी वाजवी खर्च करण्याला आमची तयारी असते. या सगळ्या गोष्टीसाठी साहित्य घेताना नेहमी आम्ही उत्तम दर्जाचंच घेतो पण जिथे पैसे वाचवणे शक्य आहे तिथे ते या गोष्टी करतानाही वाचवतो. जसे कि चांगले साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतो ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना एअर बी अँड बी सारख्या साईट वरून जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो किंवा हॉस्टेल्समधे राहतो. बाहेरच्या देशात गेलो तरी लोकल ट्रान्सपोर्टनं फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अश्या गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधी मिळते. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच हि गोष्ट आहे ना याचा काटेकोरपणे विचार करतो.
कुटुंब म्हणून आमचा कल वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर आहे. शिवाय ऑउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अश्या संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्ट मधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून आम्ही साधारण दोन वर्षांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्यावेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोचलो आहे. इथे सुद्धा दोघंही एकाच कंपनीत असल्यामुळे एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तश्याच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधले आहेत. इथे थोडी वर्ष राहिल्यानंतर कदाचित अजून काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्या प्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. हे आम्ही चाळीशी गाठेपर्यंत म्हणजे अजून चार पाच वर्षात होईल अशी अपेक्षा आहे.
एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल - http://www.mrmoneymustache.com/2012/01/13/the-shockingly-simple-math-behind-early-retirement हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल पण मूळ संकल्पना तशीच राहील.
शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचा खोचा जाणून घ्यायला हव्यात. मी अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खात्रीशीर रित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं सांगू शकत नाही कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेग-वेगळ्या. अंतिम ध्येय हे पैसा साठवणे नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असे नाही. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे.
आमच्या या प्रवासात आम्हाला खालील पुस्तके आणि ब्लॉग्ज यांचा मार्गदर्शनासाठी बराच उपयोग झाला.
पुस्तक यादी
१. इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामीन ग्रॅहम ( हे वाचून कळले कि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असल्यास खूप अभ्यास करावा लागेल आणि वेळ द्यावा लागेल त्यामुळे इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला )
२. बॉगलहेड्स - ( हे पुस्तक वाचून कळले कि यूएस मध्ये कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.)
ब्लॉग यादी
१.एमएमएम - http://www.mrmoneymustache.com
२. बॉगलहेड्स - https://www.bogleheads.org/forum/index.php
३. मॅडफिएन्टिस्ट - http://www.madfientist.com
४. कॅनेडियन काऊच पोटेटो - https://canadiancouchpotato.com
भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला
१. जागो इंव्हेस्टर - http://www.jagoinvestor.com
२. सुब्रमनी - http://www.subramoney.com
३. फ्री फिन कॅल - https://freefincal.com
तुम्ही सुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचेही स्वागत आहे.