Monday, February 23, 2026

आर्थिक स्वावलंबन ...फायर (Financial Independence Retire Early) - FIRE

 "ए  राजा ऊठ ",


"झोपू दे गं आई अजून थोडं"


"अरे शाळेत जायला उशीर होईल "


"होऊ दे "


"दररोज मी का जायचं  शाळेत याची दोन चांगली कारणं दे तरंच उठतो"


" एक म्हणजे तू आता पन्नास वर्षाचा घोडा आहेस आणि दुसरे म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस."  हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित कि हो ना राव मला पण नाही जायचं रोज उठून काम करायला.


मला  माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे. पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय लागतो आपण  त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमाने इतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं  तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलेच पाहिजे ह्या विचाराचे मनावर इतके पक्के गारुड असते कि नोकरी कायम स्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. हळू हळू माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार "निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल" असं म्हणत बाजूला पडतात.


खरंतर आपण निवृत्ती पर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं कि आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या रिटायरमेंटचा दिवस येईपर्यंत काम केलेच पाहिजे. अशावेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं कि तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण जे सर्वमान्य काम करण्याचे वय ठरवले आहे त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत ते पूर्ण  करू शकता तर तुम्ही अश्या वक्तव्यावर काय म्हणाल ? "कसं  श्यक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल " , "ह्म्म्म असेल पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी कि "खरंच काय बर करावं लागेल यासाठी, बघूया तरी आपल्याला जमतंय का? असं काही. चला तर मग बघुयाच हा प्रकार काय आहे.


आपण नोकरी  करतो ते दरमहिना ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग असे ठराविक उत्पन्न आपल्याला नोकरी न करता मिळाले तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी हि केवळ अर्थार्जनासाठी करत असू तर ती करण्याची काही गरज अश्यावेळी राहात नाही.


या प्रकारचे आर्थिक स्वावलंबन हे अंतिम ध्येय असले तरी ते गाठण्यासाठी मात्र अनेक टप्पे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ठरवणं कि आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अश्या दोन्ही आघाड्यांवर प्राध्यान्य कोण कोणत्या गोष्टींना आहे. या प्राधान्य असणाऱ्या गोष्टींपैकी पैसा कोणत्या गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल अश्या प्रकारे साधारण रूपरेषा ठरली कि त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.


आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही तसा उशिराच म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. आम्ही म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा मी मुलीच्या जन्मावेळी भारतात गेले असताना गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केट आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायाला हवा हि जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अश्या गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरु झाला होता.


आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचे सगळे श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमची बचत आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैश्याच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरु झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला तेव्हा खरं तर एवढं शिकलो ते यासाठीच ना नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड हा पहिला विचार होता. पण योगायोग असा कि दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्यूत्तर क्षेत्रात काम करतो आपण माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचे होत असेल असे आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल अश्या चार पाच गोष्टींतरी मनातं नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचे काम आवडते पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. मलाही माझ्या आवडी आणि छंदांना जास्त वेळ द्यायचा आहे. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्या सोबत भरपूर भटकायचं आहे, तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जग फुलवायचं आहे. असा सगळा विचार करता करता लक्षात आलं कि हे सगळं करायचं तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.


सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्या पासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी कुठे कुठे खर्चात कपात करता येईल या कडे कटाक्षाने लक्ष दिले. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहात होतो ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचे गाव होते त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. एकाच कंपनीत असलो तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्स मध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्या इतपत होती तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबे आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती आणि नवरा बायको दोघांकडे वेग-वेगळी गाडीही होती. आम्हाला त्याची फारशी गरज वाटली नाही आणि त्यामुळे दोघात एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो तोपर्यंत हि व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरु झाली कि लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे. घरांची किंमत आवाक्यात गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडे देत छोट्या अपार्टमेंट मध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये ?असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा  निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्यानं घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (जसे कि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचे ठिकाण इ.) टाकले कि त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्ष त्या घरात राहाणं आवश्यक आहे याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच सहा वर्ष राहाणं तरी गरजेचे होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खात्री नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन तीन वर्षातून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी, आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो मोबाईल फोन चे बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. ते थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ठ प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्यतो रोज घरून डबा घेऊन जाणं आणि कॅंटीन मध्ये विकत न खाणं यावर भर दिला. याचा दुहेरी फायदा अस कि पैसे तर वाचतातच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अश्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना "हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना? "असा प्रश्न  करत असतो त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.


याचा अर्थ असा नाही कि आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीलाच कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचे त्याची एक साधारण यादी तयार केली होतीच. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि विकांताला जवळपास भटकंती, कॅम्पिंग, माझे फ्लायिंग, नवऱ्याचे रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग आणि आम्हा तिघांचं स्कीईंग अशा आवडी आणि छंदासाठी वाजवी खर्च करण्याला आमची तयारी असते. या सगळ्या गोष्टीसाठी साहित्य घेताना नेहमी आम्ही उत्तम दर्जाचंच घेतो पण जिथे पैसे वाचवणे शक्य आहे तिथे ते या गोष्टी करतानाही वाचवतो. जसे कि चांगले साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतो ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना एअर बी अँड बी सारख्या साईट वरून जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो किंवा हॉस्टेल्समधे राहतो. बाहेरच्या देशात गेलो तरी लोकल ट्रान्सपोर्टनं  फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अश्या गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधी मिळते.  वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट  करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच हि गोष्ट आहे ना याचा काटेकोरपणे विचार करतो.


कुटुंब म्हणून आमचा कल वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर आहे. शिवाय ऑउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अश्या संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्ट मधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून आम्ही साधारण दोन वर्षांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्यावेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोचलो आहे. इथे सुद्धा दोघंही एकाच कंपनीत असल्यामुळे एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तश्याच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधले आहेत. इथे थोडी वर्ष राहिल्यानंतर कदाचित अजून काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्या प्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. हे आम्ही चाळीशी गाठेपर्यंत म्हणजे अजून चार पाच वर्षात होईल अशी अपेक्षा आहे.


एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल - http://www.mrmoneymustache.com/2012/01/13/the-shockingly-simple-math-behind-early-retirement  हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल पण मूळ संकल्पना तशीच राहील.


शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचा खोचा जाणून घ्यायला हव्यात. मी अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खात्रीशीर रित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं सांगू शकत नाही कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेग-वेगळ्या. अंतिम ध्येय हे पैसा साठवणे नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असे नाही. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे. 


आमच्या या प्रवासात आम्हाला खालील पुस्तके आणि ब्लॉग्ज यांचा मार्गदर्शनासाठी बराच उपयोग झाला.


पुस्तक यादी

१. इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामीन ग्रॅहम ( हे वाचून कळले कि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक  करायची असल्यास खूप  अभ्यास करावा लागेल आणि वेळ द्यावा लागेल त्यामुळे इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला )

२. बॉगलहेड्स -  ( हे पुस्तक वाचून कळले कि यूएस मध्ये कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.)


ब्लॉग यादी

१.एमएमएम   - http://www.mrmoneymustache.com

२. बॉगलहेड्स - https://www.bogleheads.org/forum/index.php

३. मॅडफिएन्टिस्ट - http://www.madfientist.com

४. कॅनेडियन काऊच पोटेटो - https://canadiancouchpotato.com



भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला 

१. जागो इंव्हेस्टर - http://www.jagoinvestor.com

२. सुब्रमनी - http://www.subramoney.com

३. फ्री फिन कॅल - https://freefincal.com


तुम्ही सुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचेही स्वागत आहे.



कॅनडामध्ये स्थलांतर


आमच्या ओळखीत काही जणांनी स्वतः पिआर करुन कॅनडात येऊन जोब शोधले आहेत. त्यामुळे पिआर करणे आणि जॉब मिळणे ही अवघड गोष्ट नाही. पण ज्यांनी केले आहेत ते शक्यतो भारतातुन पिआर करुन इथे आले (मोस्ट्ली कुटुंबाला भारतातच ठेऊन). इथे येऊन जॉब शोधला आणि मग कुटुंबाला बोलावुन घेतले.
आमच्या केस मध्ये तुम्ही आधिच्या धाग्यात वाचल्या प्रमाणे नवर्‍याने आधी एक दोन वर्ष कॅनडातल्या ब्रांचमधल्या लोकांशी नेट्वर्किंग करणे सुरु केले होते. त्यामुळे त्याच्या प्रोफाईला साजेशी संधी येताच वेग वेगळ्या लोकांनी त्याला या रिकाम्या होणार्‍या जागेबद्दल आणि हायरिंग मॅनेजरला त्याच्या बद्दल सांगितले. हे सगळं पाल्हाळ सांगण्याचा उद्देश हा कि तुझ्या कंपनीची ब्रांच इथे असेल तर नेटवर्किंग चालु करायला हरकत नाही. अर्थात तुझ्या सध्याच्या साहेबाला चालणार असेल तर. त्याला कल्पना देउन त्याच्याकडुन किंवा अजुन कोणी सिनिअर मेंटॉर असेल तर त्याच्या कडुन काही होईल का याची चाचपणी करायला हरकत नाही. या गोष्टीसाठी वेळ लागेल पण हा एक हमखास नोकरी मिळण्याचा यशस्वी मार्ग आहे.
शिवाय, ज्या लोकांनी इथे येऊन नोकरी शोधली त्यांना त्यांच्या आधीच्या प्रोफाईल पेक्षा थोड्या खालच्या पातळीवर सुरुवात करावी लागली कारण जरी तुमची पात्रता असली तरी तुमच्या कामबद्दल हमी देणारी, तुमच्या बरोबर काम केलेली लोकं इथली नसतात. काही अपवाद असतील पण मी ज्यांचे अनुभव ऐकले त्यांनी तरी असे सांगितले.
शिपिंग इंडस्ट्रीमधे माझ्या काही ओळखी नाहीत. नवर्‍याला विचारुन बघते. आमचे काही कस्ट्मर्स शिपिंग इन्डस्ट्री मधे आहेत आणि नवरा सेल्स मधे असल्यामुळे त्याचे काही काँटॅक्ट असतील तर विचारेन (आत्ता तो परगावी आहे).
सरकारकडुन एक्स्पेन्सेस मिळण्याबाबत मला काही कल्पना नाही आणि मिळत जरी असतील तरी ती अगदीच तुटपुंजी रक्कम असेल असे मला तरी वाटते. कॅनडा गवर्मेंट्च्या वेबसाईट्वर कदाचीत काही माहिती मिळेल.
as a bachelor आणि पुढे फॅमीली आल्यावर खर्चात किती तफावत येते? ऑन अॅन अॅवरेज हाउसींग, शाळा, भाजी-पाला वगैरे साठि साधारण किती खर्च येतो?
कॅनडामधे हाऊसिंग महाग आहे, विशेषतः व्हॅंकुवर आणि टोरांटोमधे, पण एकटे रहाणार असाल आणि शेअर्ड अकोमोडेशनला हरकत नसेल तर ५००CAD/महिना किंवा कमी मधे सुद्धा राहायची सोय होऊ शकेल. ग्रोसरी महिन्याला २००CAD (तु स्वतः करुनच खाणार असं ग्रुहित धरलंय ;)), युटिलिटीज कॉमन असतील तर साधारण १५०CAD (इलेक्ट्रीसिटि+ इंटरनेट), फोन ४५-५० CAD आणि कम्युट १५०- २०० CAD, जर नोकरी नसेल तर बाकी खर्च करण्यावर थोडे नियंत्रण असेल म्हणुन हा हिशोब केला आहे. तर साधारण १००० CAD/ महिना असा खर्च धरायला हरकत नाही. कोणीही जर पेनी पिंचर असेल तर बर्‍यापैकी कमी पैशात काम भागायला हरकत नाही.
पुढे जर कुटुंबाला आणायचे असेल तर २ बेडरुम अपार्ट्मेंटला आमच्या एरीयामध्ये साधारण १५००- १७०० भाडं आहे. नुकताच काही टेनंट प्रोटेक्षन लॉ पास झाला आहे त्यामुळे लाँग्टर्म लीज करणेसुद्धा सहज शक्य होईल असे वाटते. टाऊन्हाऊस भाड्याने घ्यायचे झाल्यास साधारण १८००- २००० पर्यंत मिळेल. सध्या हाऊसिंग मार्केट खूप हाय आहे . सिन्गल फॅमिली होम (३/४ बेडरुम्स) विकत घ्यायचे असल्यास साधारण ८००,००० ते १,०००,००० पर्यंत किमती आहेत आणि तेही जुन्या घरांच्या. असो तो नंतरचा प्रश्न आहे पण एक कल्पना असावी म्हणुन सांगितले. आणि मग बाकी खर्च तुमच्या कुटुंबाच्या आकाराच्या आणि कोणत्या गोष्टिसाठी खर्च करण्याला प्राधान्य आहे त्याप्रमाणे वाढेल. (छोटं घर, पब्लिक ट्रांस्पोर्ट, युस्ज्ड कार Vs नविन कार, अ‍ॅक्टीविटीज इ. इ.). मु़ख्य म्हणजे वर्क व्हिजा/पिआर असल्यावर हेल्थ केअर कार्ड मिळते. त्यामुळे किरकोळ आजारासाठी वॉक-इन डॉक्टरकडे गेल्यास एक पै खर्चावी लागत नाही. प्रिस्क्रिप्शन वर कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समुळे काही डिस्काऊंट मिळतो. (कुवेतचं मला माहित नाही पण आम्ही ६ वर्ष युएस मधे रहिल्यामुळे तिथल्या हेल्थकेअर पेक्षा ही सिस्टीम आम्हाला फारच छान वाटली)
सरकारी शाळांमध्ये एजुकेशन फ्री आहे (थोडीफार अ‍ॅक्टीविटी फी वगैरे असेल पण अगदीच नगण्य). आपल्या कॅचमेंट मधल्या शाळेत प्रवेश सहज मिळतो. शिवाय अर्ली /लेट फ्रेंच इमर्शन असे पर्याय सरकारी शाळेतही उपलब्ध आहेत. शाळांचा दर्जा युएसच्या शाळांच्या तुलनेत चांगला आहे असं ऐकलं वाचलं आहे. मुलांना डे केअर मधे वगैरे पाठवायचा साधारण खर्च ८००- १००० CAD/ child upto 5yrs. ज्या वर्षात मुल पाच वर्षाचे होते त्या वर्षात सप्टेंबरमधे केजी मध्ये घालु शकता. बिफोर आणि आफ्टर स्कुल केअर सेंटर शाळेत किंवा शाळेच्या जवळपास मिळुन जाते.
शिवाय कम्युनिटी मधल्या सोयी चांगल्या आहेत. पब्लिक पार्क्स, रिक्रिएशन सेंटर्स चांगली आहेत. पब्लिक ट्रांस्पोर्ट चांगले आहे. मल्टी एथनीक कम्युनिटि आहे. व्हॅंकुवरमधे हिवाळ्यात तापमान शुन्याच्या (c) खाली फार कमी वेळा जाते, सिटित स्नो पडला तर अगदी अर्धा दिवस वगैरे रहातो. आजुबाजुच्या डोंगरांवर बघायला मिळतो. गावातच २-३ स्कि रिसॉर्ट्स पण आहेत.

Monday, June 19, 2023

होमस्कुलिंग

होमस्कुलिंग म्हणजे काय 


मी आणि माझा नवरा नेहमी होमस्कुलिंग बद्दल वाचत असतो आणि जस्तीत जास्त त्याबद्दल माहिती करुन घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यातुन जे काही समजलं उमजलं आहे ते इथे लिहायचा प्रयत्न करते.
याबद्द्ल जेव्हढं वाचलं आहे त्यातुन याचे दोन प्रकार आहेत असं वाटतं. एक म्हणजे शाळेतला अभ्यासक्रम घरात फॉलो करणे किंवा एक पॅटर्न ठरवुन त्या प्रमाणे घरी ठरविक वेळापत्रक आखुन अभ्यास. याचा फायदा म्हणजे मुलाला शाळेतलाच अभ्यास पण त्याच्या सोयीने आणि आवडीप्रमाणे करता येणे. म्हणजे मी मराठीच पुस्तक वाचतीय आणि ४५ मि झाले तरी मला तेच वाचायचं शाळेत मला ते करता येणार नाही कारण मला तिथलं टाइमटेबल फॉलो करायचं आहे. पण घरी मी दिवसभर तेच वाचत बसेन. मग उद्या मी गणित , भुगोल असा काही अभ्यास करेन. किंवा एक दोन दिवस काहिच करणार नाही. यात मुलाचा फायदा म्हणजे जे काही वाचन आणि अभ्यास होणार आहे तो केव्हा आणि कसा करायचा ते ठरवायचं स्वातंत्र्य मुलाला असल्यामुळे जेवढं काही वाचन - लेखन होतं ते मनापासुन होतं आणि विषयाची चांगली जाण येते. उगाच करायचं म्हणुन किंवा मारुन मुट्कुन काही घडत नाही.
दुसरा प्रकार म्हणजे अनस्कुलिंग. म्हणजे आपल्या गरजेनुसार आणि आवडीप्रमाणे शिकणे. जसं कि मी शाळेत जात नाही म्हणुन व्हिडिओ गेम्स खेळत बसले दिवसभर तर मला काहि दिवसांनी त्याचा कंटाळा येईल मग मला स्वतः व्हिडिओ गेम्स बनवावे वाटले तर मग त्यासाठी कोणतं पुस्तकं वाचायला लागेल काय कोर्स करता येईल आणि ते मी शिकणं म्हणजे थोडक्यात रिव्हर्स इंजीनिअरिंग किंवा बिगिन विथ द एंड इन माईंड. मग मला माझ्या ध्येया पर्यंत पोचण्यासाठी जे काहि शिकायला लागेल ते मी शिकणार. पण त्याव्यतिरिक्त दुसरं काही शिकणार नाही. किंवा इन जनरल आजुबाजुच्या व्यवहारिक जगातुन प्रत्यक्ष शिक्षण घेणार. मग यात संगणक प्रोग्रॅमिंग पासुन ते अ‍ॅस्ट्रॉनॉमी पर्यंत काहिही येऊ शकतं.
युट्युबवर बर्‍याच भारतातल्या पालकांचे होमस्कुलिंग बद्दलचे विचार आणि माहिती किंवा स्वानुभव सांगणारे व्हिडिओ आहेत. भारतातल्या होमस्कुल करणार्‍या पालकांची एक असोशिएशन पण आहे हि त्याची लिंक - स्वशिक्षण
हि त्या एमआयटीला गेलेल्या होमस्कुल्ड मुलीची लिंक
हे सगळं वाचुन आणि असंख्य युट्युब व्हिडिओ / टेड टॉक्स बघुन असं वाटतं कि खरचं का आपण आपल्या बाळांना शाळेत पाठवायला पाहिजे. शाळा म्हणजे फन आहे पण त्याबरोबर बाकिच्या कितीतरी स्ट्रेसफुल गोष्टिहि आहेत ज्या शाळेबरोबर येतात. एकदा का आपण त्या सिस्टिममधे घुसलो कि त्याबरहुकुम वागावेच लागते तिथे काही एक्सेप्शन नाही. त्यामानने आपण घरात बरचं फ्लेक्सिबल राहु शकतो. मुलांना सोशल करायला घराबाहेर खेळायला घेऊन जाणं, त्यांना ज्या अक्टिव्हिटीमधे इंटरेस्ट आहे त्याचं कोचिंग उपलब्ध करुन देणं यातुनही मुलं सोशलायज होऊ शकतात.
आता मी एवढं लिहिलय म्हणजे माझी पोरगी १००% होमस्कुल करणार का? तर माहित नाही. सध्या तरी ती (५ वर्ष) मॉन्टेसरी टाइपच्या डे केअरला जाते आणि तिथे आनंदी आहे. आम्ही दोघेही जॉब करतो. पुढे मागे दोघापैकी एकाने जॉब सोडला तर होमस्कुलिंग पर्यायाचा आम्ही नक्किच विचार करणार आहोत.
बाकि how children fail आणि how children learn हि John Holt यांची पुस्तकं वाचनिय आहेत. सर केन रॉबिन्सन यांचा हा टेड टॉकहि इंटरेस्टिंग आहे.

Wednesday, February 7, 2018

कॅम्पिंग साहित्याची ओळख

कॅम्पिंग हा प्रकार वेगळ्या नावाने आपण भारतात करतच असतो. ते ट्रेक्स जेव्हा आपण दिवसभर वणवण करून कोण्या एका गडावर जातो ,तिथल्या मंदिरात किंवा गुहेत पथारी पसरतो. भोवतालचे तीन दगड एकत्र करून सोबत नेलेल्या सामानातून काही बाही शिजवून खातो आणि सोबत आणलेल्या पांघरुणात मस्त ताणून देतो. थोड्याफार फरकाने या अश्याच प्रकाराला बाहेरच्या देशांमधे हायकिंगआणि कॅम्पिंग म्हणतात. पुण्यात राहत असताना सह्याद्रीमध्ये एकदिवसीय नाईट ट्रेक भरपूर केले. तेंव्हा हायकिंगआणि कॅम्पिंगसाठी कश्याप्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात ह्याची फारच जुजबी माहिती होती. आत्ता माझ्याकडे जे काही हायकिंगआणि कॅम्पिंग साहित्य आहे ते जर माझ्याकडे भारतात असताना देखील असले असते तर त्या ट्रेक्सना अजून रंगत आली असती.
आम्ही (मी आणि नवऱ्याने ) भारतातही बरंच ट्रेकींग केल्यामुळे अमेरिकेत आल्यावर सुद्धा इथे आपल्याला कुठे कुठे जाता येईल याचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली आणि इथेही ट्रेकींग आणि त्याच्या जोडीने कॅम्पिंग सुरु झालं . हळुहळु करत जे गरजेचं आहे ते कॅम्पिंगच सामान आमच्याकडे जमा होत गेलं. त्याचीच माहिती या लेखात द्यायचा प्रयत्न आहे.

सुरुवातीला टेंट बद्दल बघू, कुठेही (भौगोलीक दृष्ट्या) आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात वापरण्यायोग्य टेंट हवा असेल तर डबल वौल्ड , थ्री सीजन , वेस्टिब्युल असलेला टेंट घेतलेला चांगला. वेस्टिब्युल म्हणजे टेंटच्या दारासमोर थोडा आडोसा असलेला भाग , याचा उपयोग पावसात स्टोव्ह पेटवून खाणे तयार करण्यासाठी किंवा जास्तीचे सामान ठेवण्यासाठी होतो. जर मुख्यत्वे backpacking प्रकारचे कॅम्पिंग करायचे असल्यास हलका साधारण दोन किलोच्या आसपास (पाच पौंड पेक्षा कमी )वजन असलेला टेंट घेतलेला बरा.
खालच्या फोटोमध्ये टेंटच्या समोरच्या भागात जो ताणून पुढे आलेला भाग आहे तोच वेस्टिब्युल एरिया



अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे backpack किंवा rucksack - ऑस्प्रे कंपनी अप्रतीम backpack बनवण्यात अग्रेसर आहे. डोयटर (Deuter) कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या backpack बनवतेभारतात आड्वेंचर वल्ड या कंपनीच्याही  backpack  मिळतात .  जर उद्देश नुसते एक दिवसाचेच ट्रेक्स करायचा असेल तर साधारण २० ते ३० लि. ची backpack पुरेशी असते पण २ -३ दिवसांच्या ट्रेकसाठी ५०लि आणि ५ पेक्षा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी ७० लि. ची backpack असेल तर सगळे सामान त्यात व्यवस्थित बसते. 
माझ्याकडे ४० लि. ची आड्वेंचर वल्डची backpack आहे तर नवऱ्याकडे ऑस्प्रेची ६०लि. ची. माझ्या bag  ला खांद्यावर येणाऱ्या पट्यांना चांगले कुशनिंग आहे तसेच bag  हेलकावे न खाता पाठीवर व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला बांधायला सुद्धा एक पट्टा आहे. पाठीला आधारासाठी bag  च्या आतल्या बाजुला दोन अल्युमिनीयमच्या पट्ट्या आहेत. ऑस्प्रे bag  ला असेच खांद्याचे आणि कमरेचे पट्टे आहेत पण पाठीला वरपासुन खाली पर्यंत आधार देणारे जास्त चांगले पॅडिंग आहे. 

फोटो आड्वेंचर वल्डची backpack -                                                                   फोटो ऑस्प्रेची backpack


आता स्लीपिंग bag आणि स्लीपिंग पॅड/mat निवडीबद्दल थोडी माहिती घेऊया . 
साधारणत:  स्प्रिंग, समर ,फॉल (वसंत ऋतु , उन्हाळा आणि शरद ऋतु / पानगळ) या दरम्यान कॅम्पिंग करायचे असल्यास २० ते ३० डिग्री फ़ेरनाईट (- ६ ते -१ डिग्री सेल्सिअस ) साठी तयार केलेली स्लीपिंग bag पुरेशी होईल तर low  altitude विंटर कॅम्पिंगसाठी ० ते १५ फ़ेरनाईट(- १८ ते -९ डिग्री सेल्सिअस) साठी तयार केलेली स्लीपिंग bag घ्यावी. डाऊन आणि सिंथेटीक अश्या दोन प्रकारच्या स्लीपिंग bag असतात. सिंथेटीक प्रकारची स्लीपिंग bag ही डाऊनच्या तुलनेत थोडी जड असते पण ओली झाल्यास लवकर वाळते.
डाऊन (नारंगी)आणि सिंथेटीक (निळी) स्लीपिंग bag. 



स्लीपिंग पॅड निवडताना त्याचे R रेटिंग  महत्वाचे असते. जेवढे जास्त R रेटिंग तेवढे चांगले इन्सुलेशन पण तेवढेच जास्त वजनही वाढते मग या स्लीपिंग पॅडचे. ३ R रेटिंग असलेले स्लीपिंग पॅड वेगवेगळ्या वातावरणातल्या  कॅम्पिंगसाठी पुरेसे होऊ शकते आणि त्यामानाने वजनाने देखील हलके असते. काही फुगवून वापरायची स्लीपिंग पॅडस कमी जागा व्यापणारी आणि वजनाने हलकी अशी असतात . Therm-a-rest, Exped, Big Agnes यांची स्लीपिंग पॅड चांगली आहेत. अगदीच हलके काही हवे असेल तर फोमचे स्लीपिंग mat ही मिळतात पण यात इन्सुलेशन फारच कमी असते.
Exped






आता कॅम्पसाइटवर खाणे तयार करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाचा स्टोव्ह आणि भांडी 
MSR या कंपनीचे  Whisperlite / Dragonfly हे दोन स्टोव्ह वेगवेगळ्या इंधनावर (multiple  fuel) वापरता येतात. त्यामुळे ते भारताबाहेर आणि भारतातही तेवढ्याच सहजतेने वापरता येऊ शकतात, शिवाय high altitude आणि थंड विरळ हवेत सुद्धा हे स्टोव्ह चांगले चालतात. GSI आणि snow peak  ह्यांची भांडी चांगल्या दर्जाची वजनाला हलकी आणि कमी जागेत मावणारी आहेत.इथे शक्यतो सगळ्या स्पोर्टींग गुडसच्या दुकानात fuel canister मिळतो. मोठ्या सुपरमार्केट मध्ये कोलमन चे मोठे स्टोव्ह आणि fuel canister मिळतात ते backpacking पेक्षा कार कॅम्पिंगसाठी जास्त सोयीस्कर असतात.
high altitude मध्ये  पाणी गरम करण्यासाठी उपयुक्त असे jetboil भांडे . पाणी गरम झाले कि यावरचा इंडिकेटर नारंगी रंगाचा होतो.
जेट बॉईल                                   



केनिस्टर सह कुकिंग स्टव्ह 



कुकिंग किट

























या व्यतिरिक्त कॅम्पिंग आणि हायकिंगला पूरक अश्या गोष्टी म्हणजे चांगले सोल असलेले हायकिंग ( हे मोठ्या हाईकच्या आधी घेऊन वापरायची सवय करावी). हायकिंग पोल, Swiss knife, Nalgene बॉटल , dry compressions sacks , हेड lamp, कॅम्पसाइट lamp , हमक अश्या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत.
Nalgene बॉटल आणि हमक पॅक 

कॅम्पिंग आणि हायकिंग साहित्य घेण्यासाठी अजून जास्त महिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Saturday, September 23, 2017

ट्रेकिंगची हौस

नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली. एक एक जण काहीतरी कारण देऊन सटकु लागला. शेवटी फक्त दोन मुलं आणि मी असे तिघेच उरलो. त्यामुळे मिश्र गटाचा असा आमचा ग्रुप ठरला. रोज सकाळी उठुन दोन किमी पळायचं संध्याकाळी जवळच्या टेकडीवर जायचं असा ट्रेनिंग प्लॅन ठरला.
मी पळायला जायला तसा आळसचं केला. सकाळी वाटायचं संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पळायला जाऊ आणि संध्याकाळी घरी आल्यावर काही ना काही कारण निघून राहून जायचं. तसं नाही म्हणायला दोन - तीन वेळा जवळच्या टेकडीवर जाणं झालं. तेच माझं ट्रेनिंग. बाकी दोघे मला सांगत होते कि ते रोज पळायला जातायेत. माझ्यामुळे ग्रुप मागे नको पडायला असे वाटुन मी पण मग एक दोन दिवस गेले पळायला. जास्त वेळचं नव्हता हातात. आज पळायला जाऊ उद्या पळायला जाऊ करता करता स्पर्धा उद्यावर येऊन ठेपली होती.
स्पर्धा नाशिक जवळ होती आणि रविवारी सकाळी लवकर सुरु होणार होती त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच नाशकात जाऊन राहिलो. दुसऱ्या दिवशी सात वाजता आयोजकांनी सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. तिथून एक बस आम्हाला स्पर्धा जिथे सुरु होणार तिथे घेऊन जाणार होती. बसमध्ये आमच्या सारखेच इतर ग्रुप होते. त्यांच्याकडे बघून आम्ही कोण कोण आपल्याला 'कांटे कि टक्कर' देऊ शकतात याची चर्चा करु लगलो. आता थोडं दडपणही जाणवायला लागलं होतं. पण आम्ही आपले १००% देऊन स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला.
शेवटी एकदाचा तो स्पर्धा सुरु झाली असे जाहीर करणारा क्षण आला. आयोजकांनी शिट्टी वाजवली आणि एक एक ग्रुप पुढे सरसावू लागला. त्या बसने आम्हाला एका घाटात मध्येच सोडले होते. तो घाट उतरून आम्हाला आधी बसगड नावाच्या गडावर जायचे होते. त्यानंतर मध्ये थोडं जंगल आणि नदी पार करून हरगड नावाचा दुसरा गड सर करायचा होता. तो स्पर्धेतला शेवटचा टप्पा असणार होता. एका कागदावर स्पर्धेचा साधारण मार्ग दर्शवणारा नकाशा आम्हाला दिला होता. तोच आता आमचा मार्गदर्शक होता.
नियमांनुसार स्पर्धेच्या मार्गावर टाईम कंट्रोल (टिसी) आणि पॅसेज कंट्रोल (पीसी) असे दोन प्रकारचे थांबे अधून मधून असणार होते. आमच्याकडे एक कार्ड देण्यात आले होते. प्रत्येक थांब्यावर आमच्या कार्डावर शिक्के मारण्यात येणार होते. पीसी तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गानेच जात आहात कि नाही ते तपासण्यासाठी आणि टाईम कंट्रोल तुमच्या ग्रुपची एकंदर वेळ नोंदवण्यासाठी होते. साधारण ८ वाजता स्पर्धा सुरु झाली. उत्साहाने आम्ही जवळपास पळतच तो घाट उतरला. बराच वेळ डांबरी रस्त्यावरून चालत पळत गेल्यावर एकदाचा पहिला टिसी थांबा आला. इथं पर्यंत पोचे पर्यंत आम्ही थोडे थकलो होतो. काही ग्रुप आमच्या पुढे होते तर काही मागे. अजुनही मिश्र गटात चुरस होती. खुल्या गटात मात्र एक गट विशेष लक्षवेधक ठरला होता. ही तीन मुले स्पर्धेच्या सुरुवाती पासून पळतच होती ती कधीच आम्हाला चालताना दिसली नाही. टाईम कंट्रोल थांब्यावरही सगळ्यात आधी तेच पोहोचले होते. या थांब्यानंतर मात्र डांबरी रस्ता सोडून जंगलातली वाट सुरु होत होती. आम्ही इथपर्यंत पोचायला दोन तास घेतले होते.
इथून पुढे बसगडाची चढाई करायची होती. आम्ही दिलेल्या नकाशाच्या आधारे मार्गक्रमण करत होतो. मध्ये एक दोन पीसी लागले आम्ही तिथे अजून गडमाथा किती लांब आहे याची चौकशी केली. पण अजून थोडं पुढे जा एक दोन टेकड्यांनंतर पोचालचं तिथे असे त्यांनी सांगितले. पुढच्या एक दोन टेकड्या म्हणजे जणुकाही एक दोन गडचं होते. त्यासंपेपर्यंत आमचा उत्साह बराच मावळला होता. आम्हाला तिघांना एका गतीने चढणे अवघड होत होते. मी चढताना सारखीच थांबत होते आणि त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. कसही करुन गडमाथा गाठू आणि मग उतरताना जरा वेगात उतरू म्हणजे जे काही स्पर्धक आपल्या पुढे असतील त्यांना गाठता येईल अशी आमची खलबते चालू होती. अधून मधून तिघांच्याही पायात गोळे येत होते आणि मग आम्ही थांबुन पाणी पी ग्लुकॉन-डी खा असे करत पुढे जात होतो. वेळ भर दुपारची असली तरी वाटेवर बरीचशी झाडी असल्यामुळे उन्हाचा एवढा त्रास होत नव्हता. गडावर पोहोचण्याच्या थोडं खाली एक अतिशय चिंचोळी आणि धोकादायक वाट होती. एका बाजूला खडा काताळ आणि एका बाजूला खोल दरी. सावधपणे आम्ही तो टप्पा पार पाडला. ती पळणारी मुले गड उतरुन खाली येत होती. अजुनही ती पळतच होती. आम्हाला बघून थांबली. त्यांच्याकडुन कळालं कि ते पोलीस भरतीची तयारी करत होते आणि रोज १० किमी पळण्याचा त्यांचा सराव खूप दिवसांपासून चालू होता. पोचाल गडावर ५ -१० मिनिटात असा धीर आम्हाला देऊन ते पुन्हा पळायला लागले. आम्हाला तेव्हढं अंतर पार करायला अर्धा तास लागला. शेवटी गडावर पोचलो. टीसी थांब्यावर शिक्का मारून घेताना कळालं की पुढच्या टीसीला आम्ही २ पर्यंत नाही पोचलो तर आमचा ग्रुप स्पर्धेतून बाद होईल. ते ऐकून सगळं बळ एकवटून आम्ही गड उतरायच्या मागे लागलो. आता उतरणीवर तर सटसट खाली येऊ असं वाटलं होतं पण कसचं काय आमच्या ग्रुप लीडरला उतरताना पायात बरेच गोळे येऊ लागले. त्यामुळे त्याची चाल खूपच मंदावली होती. गडमाथ्यावर आम्ही एक वाजता होतो. गड चढायला जरी आम्हाला तीन तास लागले होते तरी आपण एका तासात गड उतरून सहज पुढच्या टीसी थांब्यावर दोन पर्यंत पोचू असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात दोन वाजता आम्ही त्या थांब्या पासून फारच लांब होतो. जसे दोन वाजून गेले तसे आधी हळहळ आणि नंतर दडपणातून सुटका अश्या विचित्र मनस्थितीतून आम्ही गेलो. आता आपण स्पर्धेतून बाद झालो आहे तेव्हा जाऊ निवांत. आता घाई करायची काही गरज नाही असं आम्हाला वाटलं. कसे बसे तीन वाजता आम्ही त्या पुढच्या टिसी थांब्यावर पोचलो. आम्ही स्पर्धेतून बाद झालोच होतो पण आमच्या सारखेच खुल्या आणि मिश्र गटातले एक दोन ग्रुप तिथे होते जे आमच्या सोबत बाद झाले होते. सर्वानुमते आता हरगडाला जायची काही गरज नाही असे ठरले.
मग आता इथून लवकर बाहेर पडू म्हणुन जवळ नाशिकला जायला वाहन कुठे मिळेल याची चौकशी केली. तर हाय रे कर्मा तिथून अजून आठेक किलोमिटर चालून गेल्यावर एका पाड्याजवळ एसटी थांबा आहे आणि संध्याकाळी सहा ला तिथे नाशिकला जाणारी शेवटची बस येते असं कळालं. मग पुन्हा फरफट सुरु झाली. पण आता आमच्या सोबत बाकीचे ग्रुपवालेही होते. दिवसाच्या सुरुवातीला एकमेकांकडे स्पर्धक म्हणुन बघणारे आम्ही आता सहप्रवासी झालो होतो. त्यांचीही अवस्था आमच्या ग्रुपपेक्षा वेगळी नव्हती कोणी गड घाईत उतरताना पायाला लागून घेतलं होतं तर कोणाच्या पायाला चालून चालून फोड आले होते. सगळेच धीम्या गतीने एकमेकांना धीर देत चाललो होतो. हरगड जरी सगळ्यांनी टाळला होता तरी एक नदी आमच्या वाटेत आम्हाला ओलांडावीच लागणार होती. नदीत जास्त नाही पण गुडघाभर तरी पाणि होते. शूज ओले होऊ नये म्हणुन सगळ्यांनी ते हातात घेतले आणि त्यामुळे नदीतले गोटे टोकदार दगड लागून पायांना अजून जखमा झाल्या. पण सांगता कोणाला ? सगळे अर्जुन झाले होते. त्या पक्षाच्या डोळ्यासारखी आम्हाला ती सहाची एसटीच फक्त दिसत होती. आमची नऊ जणांची फौज क्षणभरच विश्रांती घेऊन पुन्हा चालायला लागली. एकमेकांना आधार देत 'साथी हात बढाना' सारखी गाणी म्हणत आम्ही चाललो होतो.
स्पर्धेच्या मार्गातून बाहेर पडुन आम्ही हा वेगळाच मार्ग घेतला होता त्यामुळे मध्ये टिसी ,पीसी नव्हते. त्यामुळे अंतराचा अंदाज येत नव्हता. जरी सांगणारा आठ किमी वर बसथांबा आहे म्हणाला होता तरी तो नक्की तेव्हढ्याच अंतरावर असेल याची काही खात्री नव्हती. एव्हाना साडेचार वाजून गेले होते आणि आम्ही एका कच्च्या रस्त्याला लागलो होतो. विशेष म्हणजे अत्तापर्यंत आम्हाला स्पर्धक आणि आयोजक सोडून दुसरा एकही माणूस दिसला नव्हता. त्यामुळे कोणाला रस्ता बरोबर आहे कि नाही हे विचारण्याचा प्रश्नचं नव्हता . आम्ही जो दिसेल तो रस्ता पकडून चाललो होतो. सुदैवाने अजून थोडावेळ चालाल्यावर एक आदिवासी पाडा लागला. त्यातल्या एकाशी बोलून कळाले कि आम्ही बरोबर रस्त्यावर आहोत आणि अजून अर्धा एक तास चाललो कि पोहोचू बस थांब्यावर. ऐकून हुश्श वाटलं. चालायला हुरूप आला. आपण वेळेत गाडी पकडणार अशी अशा वाटायला लागली. त्यामुळे कि काय आमची पाऊले त्यातल्या त्यात झपाझप पडू लागली.
आता थोडं अंधारून पण यायला लागलं होतं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. रस्ता चढणीचा होता त्यामुळे सगळ्यांचा वेगही मंदावला होता. कोणीतरी पुढं जाऊन बस दिसली तर तिला थांबवावं असं सगळे म्हणत होते. पण पुढे जाणर कोण सगळेच लंगडे घोडे झाले होते. चढण संपेपर्यंत सहा वाजत आले होते. चढण पार केल्या केल्या आम्ही उभे होतो त्या उताराच्या खाली आम्हाला पडीक असा एसटी चा थांबा दिसल्या. सगळ्यांनी हुर्रे च्या आरोळ्या ठोकल्या. तेवढ्यात लांबून एसटी सुद्धा येताना दिसली. अरे देवा! आम्हाला अजून तो उतार उतरून त्या थांब्या पर्यंत पोहोचायला आमच्या गतीने पाचेक मिनिटं तरी नक्की लागणार होती. आता तो एसटी वाला नक्की आपल्याला सोडून जाणार म्हणून सगळे निराश झाले , दुसर्‍याच क्षणी उतारता उतरता कोणीतरी जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. सगळ्यांनी मग त्याचं अनुकरण करत ओरडणे आणि हातवारे सुरु केले. त्यावेळी आम्ही किती दीनवाणे दिसलो असू ते त्या एसटी ड्रायवरलाच माहित. आमचा आरडाओरडा कामाला आला होता. ड्रायवर चक्क आमची वाट बघत थांबला होता. गाडीपाशी पोहोचून आम्ही त्याला असंख्य धन्यवाद दिले. त्याच्या चेहऱ्यावर 'त्यात काय एवढं ?' असे भाव होते. अर्थात त्याला आमची फरफट माहित नव्हती म्हणून.
सगळेच एवढे थकून गेलो होतो कि तिकिटे काढून झाल्या झाल्या कधी डोळे मिटले ते कळालं हि नाही. नाशिक बस स्टँड वर उतरताना पाय अक्षरश: मणा-मणाचे झाले होते. कसेबसे पाय फरफटत एका बस मधून उतरून दुसऱ्या पुण्याला जाणाऱ्या बस मध्ये चढलो. पहाटे कधीतरी आपापल्या घरी पोहोचलो. पेन किलर खाऊन मी झोपून गेले. दुपारी लंच नंतर जाऊ ऑफिसला असा विचार करून जरा उशीराचाच गजर लावला. सकाळी मैत्रिण जाताना हलवून गेली तिला पण लंच च्या वेळी फोन करून मी उठल्याची खात्री कर असं सांगुन मी परत झोपले. दुपारी तिचा फोन आला तरी मी झोपलेलेच होते. बापरे आता उठावं म्हणुन उठायला गेले तर एक सणसणीत कळ पायातून मस्तकात गेली. मला स्वत:च्या जोरावर पाय इकडून तिकडेही करता येत नव्हते. आता आपल्याला परत चालता येईल कि नाही या विचाराने मला रडू यायला लागलं. पण थोड्याच वेळात स्वत:ला सावरून मी हाताच्या आधाराने उठून बसले. पाय भयानक दुखत होते. पण थोडे थोडे हलवता येत होते. संध्याकाळी मैत्रिणीच्या आधाराने डॉक्टरकडे जाऊन आले. कोणतीही शारीरिक तयारी न करता अतिश्रम केल्याने आणि स्नायुंच्या डी-हायड्रेशन मुळे असे झाल्याचे त्यांनी मला सांगितले. मला याची थोडीफार कल्पना होतीच पण एवढा भयानक त्रास होईल असे वाटले नव्हते. तिथेच दृढ निश्चय केला कि इथून पुढे कोणताही ट्रेक किंवा असल्या स्पर्धा पुर्ण तयारीशिवाय करणार नाही आणि पुढच्या मोठ्या ट्रेकच्या तयारीसाठी मनात मनोरे रचायला सुरुवात केली.


आर्थिक स्वावलंबन ...फायर (Financial Independence Retire Early) - FIRE

 "ए  राजा ऊठ ", "झोपू दे गं आई अजून थोडं" "अरे शाळेत जायला उशीर होईल " "होऊ दे " "दररोज मी का ज...