Wednesday, June 24, 2026

आत्मानंद - प्रेमा नरेवाडीकर - 3


                                            मी नववीतून दहावीत गेले माझ्या दादांना खूपच छान वाटत होते की, त्यांची मुलगी शिकते आहे. काहीवर्षांनी  माझ्या भाऊजींची बदली कराडला झाली. त्यांना खोली मिळेपर्यंत आम्ही चौघं ,माझी ताई भाऊजी आणि त्यांची तीन मुलं एवढे त्या एका खोलीत राहत होतो. तरीही त्यावेळी काहीच अडचण वाटली नाही. त्यानंतर त्यांना बुधकर वकिलांच्या चाळीत दोन रूमची खोली भाड्याने मिळाली. ते तिकडे राहायला गेले.    माझी लिलाताई खूप अगत्त्यशील होती. त्यामुळे काल्याहून कराडला येणारे लोक आता आधी ताईकडे जात आणि मग आमच्याकडे येत. तिचाही माझ्यावर खूप जीव होता. मी पहिलीत असल्यापासून नेमके माझ्या रिझल्टच्या वेळी ताई-भाऊजी सुट्टीमुळे कराडला यायचे. माझा रिझल्ट लागला की भाऊजी पैसे काढून द्यायचे आणि म्हणायचे,"जा पेढे आण जा". भाऊजींची पर्सनॅलिटी पाहता स्वभाव रागीट वाटायचा. त्यामुळे आम्ही सगळी भावंडे त्यांना घाबरून असायचो. ते नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असायचे. आम्ही ताईकडे गेलो असताना मी म्हणाले की आम्हाला भगवत गीता शिकवत आहेत मला एक छोटी गीता आणायची आहे. त्यांनी लगेच एक छोटी गीता काढून मला दिली आणि म्हणाले,"ही घे, ही तुझ्या कंपास मध्ये बसेल."मी आठवीत असताना त्यांनी दिलेली ती गीता अजूनही माझ्याकडे आहे. गुरुकृपा म्हणायची दुसरे काय? भाऊजींना आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा. माझी ताई पण सुगरणच होती. मला तिच्या हातचे जेवण खूप आवडायचे, छानच करायची. तिला चार मुलगे आणि एक मुलगी होती. अनंताच्या पूजेला तर आमच्या काकांची फॅमिली,आम्ही सगळे, माझा अण्णा तोही ओगलेवाडीला बदलून आला होता, त्याचे कुटुंब शिवाय तिच्या सासरचे लोक असे सगळे यायचे. एवढ्या सगळ्यांचे ती अगदी मनापासून करायची. हसत मुखाने, कधी दमले बाई म्हणालेली मला आठवत नाही. 

        माझा भाऊ अण्णा, त्याचाही माझ्यावर खूप जीव होता. तो ग्रामसेवक होता आधी तो किन्हईला होता, त्यानंतर वाघोलीला, जिथे जिथे त्याची बदली होईल तिथं तिथं आम्ही जाऊन राहायचो. तिथल्या लोकांना भेटायला न्यायचा त्यांना कौतुकाने ही माझी धाकटी बहीण आणि आई म्हणून ओळख करून द्यायचा. तो ग्रामसेवक असल्यामुळे  त्याला  सगळे अण्णासाहेब म्हणत. तो जिथे जिथे गेला तिथे त्यानेही माणसे जोडली. त्याच्याकडे सुट्टीत महिना पंधरा दिवस आम्ही जाऊन राहत असू. जवळपास जे पाहण्यासारखे असेल तिथे तो आम्हाला दाखवायला न्यायचा. त्याची मित्रमंडळी देखील चहासाठी बोलवत. त्याचाही स्वभाव फार गंमतशीर होता. त्याने भिंतीवर देवांच्या काही फ्रेम्स लावल्या होत्या. तेव्हा तो सांगायचा की हा अमका देव हा तमका देव आणि नंतर तिथे एक कॅलेंडर लावले होते ते दाखवून म्हणायचा आणि हा देव आनंद.  एकदा आम्ही दोघं एका दुकानात काहीतरी आणायला गेलो होतो. तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि म्हणाली की, "एक रुमाल द्या "तेव्हा हा म्हणाला की, "हो हो लवकर द्या. "आणि माझ्याकडे बघून मिश्किल पणे हसत होता. कारण ती मुलगी सारखी नाक फुरफुर करून ओढत होती. तो रिटायर झाल्यावर माझे काका वारले तेव्हा त्याने एक पांढरा शर्ट आणि विजार घातली होती. थोडे इकडच्या तिकडे झाल्यावर मला म्हणाला,"अगं हे कपडे मी कोणाच्या अशा कार्याला जाताना घालायलाच ठेवले आहे, कारण हे शिवल्यापासून सारखे कुणाच्या ना कुणाच्या कार्यालाच जावे लागते आहे". आणि म्हणाला "असं कार्याला का होईना यायचे म्हणजे मला बरा टाईमपास झाला आहे" कारण तो ओगलेवाडीत राहत होता आणि बाकी  सगळे कराडमध्ये. आईचा पण माझ्या सर्व भावंडांवर जीव होता. सख्खे सावत्र असे कधी मनातही आले नाही. एकदा मी आणि आई ओगलेवाडीला अण्णा कडे गेलो होतो, त्याचवेळी तो समोरून येताना दिसला. त्याला पाहून आई म्हणाली,"बघ कसा अमिताभ बच्चन सारखा दिसतोय" कारण तो खूप उंच होता आणि त्याने दाढी वाढवली होती आणि ती पांढरी झाली होती. आमच्या वहिनी नेमक्या बुटक्या आहेत. त्यामुळे त्यांना जया-बच्चन ची जोडी असे म्हणायचो. फक्त अरुणचा सहवास मात्र मला जास्त लाभला नाही. तो पण ग्रामसेवक होता. पण तो लांब कोकणात असायचा. त्यामुळे त्याच्याकडे जाणे झाले नाही तो येईल तेवढाच त्याचा सहवास.

                          विलास आणि सु हे दोघे रिमांड होम मधून बाहेर आल्यावर घरीच होते. आधी विलास आला. त्याचे आणि माझे फार जमायचे. मी पाचवीत गेले तरी तो मला पाठीवर उचलून घ्यायचा. मी सहावीत गेले त्यावर्षी गणिताचे पुस्तक बदलले होते आणि बरीच दुकाने शोधली पण मला काही पुस्तक मिळाले नाही. मग विलास म्हणाला तुझ्या एखाद्या मैत्रिणीचे पुस्तक आण मी लिहून काढतो, त्याचे अक्षरही छान होते. त्याने थोडे लिहायला सुरुवात केली, आणि मग ते पुस्तक मिळाले. त्याने मला सायकल चालवायला शिकवली.  विलास मला सायकल वरून काल्याला घेऊन जायचा. त्याचाही स्वभाव विनोदी होता. दुसरे म्हणजे त्याला एक सवय होती आपण म्हणालो ना,"  जेवण तयार आहे जेवून घे " तर तो म्हणणार "मला आत्ता भूक नाही" आणि एखाद्या वेळेस स्वयंपाक तयार नसेल तर म्हणणार,"मला सिनेमाला जायचे आणि अजून स्वयंपाक तयार नाही". असा उलट वागायचा म्हणून कधी आपण त्याला उलट सांगितले तर मात्र बरोबर सुलट वागायचा. एकदा तो सांगत होता की, हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या वेटरला म्हणालो की,"रवा लाडू दे" वेटर म्हणाला" रवा लाडू नाही ". तर हा म्हणाला मग " गरा लाडू दे ". "तर तो वेटर माझ्याकडे बघून हसला". हा किस्सा त्याने सांगितल्यावर आम्ही सुद्धा खो-खो हसलो आणि त्याला म्हणालो की,"अरे रवा आणि गरा एकच आहे" वडिलांच्या नंतर तो आणि मी एका ताटात जेवायचो. त्याचे मिल्ट्रीतले मित्र त्याला भेटायला यायचे, ते म्हणायचे ,"तुम्ही सावत्र भावंडे आहात यावर विश्वास बसत नाही". एकच खोलीत असल्याने सगळे समोरच असायचे. एकदा विलास त्याच्या एका खेड्यातल्या मित्राकडे जाऊन आला होता. त्यानंतर त्याचा एक मित्र भेटायला आला. तर याने त्याला अण्णांच्या म्हणजे घर मालकांच्या ऑफिसमध्ये बसवले, आणि तिथे नेऊन चहा दिला. सगळे झाल्यावर तो मित्र म्हणाला,"चला आता आईची आणि श्यामाची गाठ घेतो आणि जातो". आणि तो आम्हाला भेटायला घरात आला. तर त्याचे काय झाले होते. खेड्यात मोठी घरे असतात. आणि बायका सहसा बाहेर येत नाहीत हे त्याने त्या खेड्यातल्या मित्राकडे पाहिले होते म्हणून तो पण तसे करायला गेला, पण त्याचा झाला पोपट.  पुन्हा काही तो असले करायच्या भानगडीत पडला नाही. 

         पुढे तो मिलीटरीमधून रिटायर झाल्यावर कोल्हापुरला राजाराम कॉलेजला,सुरक्षा रक्षक म्हणुन कामाला लागला. एकदा त्याच्याकडे कोल्हापूरला आम्ही गेलो होतो. बऱ्याच वर्षात तिथे राहणारी माझी मैत्रीण आशा नाईक हिला भेटले नव्हते. तिचा पत्ता शोधून काढून आम्ही दोघेच तिच्या घरी गेलो. तिने छान पोहे आणि चहा केला. खूप गप्पा मारून घरी आलो. त्यानंतर विलास मला म्हणाला की,"अगं तुझ्या मैत्रिणीने तुझ्यासाठी एक महत्त्वाची वस्तू दिली, थांब मी तुला देतो." आणि त्याने खिशात हात घातला. मला वाटले तिने मला न देता याच्याजवळ एवढे काय बर दिले असेल. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. त्याने त्याची मूठ अगदी अलगद उघडली आणि काय एक छोटासा हरभऱ्या एवढा खडा होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. तर म्हणतो कसा,"अग तिने पोहे खायला दिले होते ना त्यात सापडला मला". मग काय बसलो आम्ही हसत. 

                मी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याच्याकडे गेले होते. वहिनी म्हणाल्या होत्या की मी सगळे करते, तसे त्या हौसेने सगळे करतात. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर रोज सकाळी उठल्यावर विलास मला ताजे ब्रेडचे स्लाईस आणि एक मोठा ग्लास भरून गरम दूध द्यायचा. त्याचे पण माझ्यावर आणि आईवर खूप प्रेम होते. तरीही कधी कधी आमच्यात रुसवे फुगवे अबोला एक एक दोन दोन वर्षे चालायचा, कारण तसं किरकोळच असायचं. पण आईसारखी आण्णाला विचारायची की,"विलास कसा आहे रे? तो सारखा माझ्या स्वप्नात येतो". असे आम्ही सगळे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले होतो. सख्खे सावत्र असले आमच्या डोक्यातही नसायचे. तर असाच एकदा एक वर्षाचा अबोला होता. आणि अण्णाच्या सगळ्यात धाकट्या मुलाचे सोमाचे लग्न होते, त्यासाठी आम्ही सगळे ओगलेवाडी जमलो होतो. लग्न वगैरे झाल्यावर आई अशीच गप्पा मारत बसली होती. मीही तिथेच उभी होते. तेवढ्यात विलास समोरून आला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून नुसता रडत होता. आईच्या पण डोळ्यातून दोन दोन धारा आणि माझ्यापण. आम्ही कोणीच काही बोलत नव्हतो. फक्त अश्रूंचा अभिषेक सुरू होता. अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात आपसूकच पाणी येते. अगदी आताही हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत पुढचे लिहायला दिसेना.                         

    मी आठवीत गेल्यापासून माझा वाढदिवस निदान छोटासा केक आणून साजरा करायला दादांनी सुरुवात केली होती. त्यांचा स्वतःचा वाढदिवस असेल त्या दिवशी मात्र ते म्हणायचे," आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे  सुधारस करतो". त्यांना स्वतःला शिरा, उपीट, भडंग, पिठले एवढेच नाही तर कैरीच्या सीझनमध्ये कैऱ्या आणून त्याचा गुळांबा करायचे. आमच्यात कधी दूध नसले तर, नंदाच्या आई म्हणायच्या "द्या ते दूध त्यात साखर घालून आमच्या नंदाला देते तिला आवडते."त्यांचा नवरा म्हणजे तहसील कार्यालयात होते तेच ते शिंदे भाऊ. त्यांचा स्वभाव पण रागीट होता. मात्र तेही सुट्टी दिवशी किंवा ऑफिस वेळ व्यतिरिक्त आमच्याकडे येऊन बसत. त्यांनाही माझ्या अभ्यासाचे कौतुक वाटायचे. आणि आईच्या स्वयंपाकाचे पण. एकदा आई पुरणपोळी करत असताना ते आले होते, ते त्यांच्या बायकोला म्हणजे नंदाच्या आईंना म्हणाले,"जा बघ शामाच्या आई कशा छान पुरणपोळ्या करत आहेत." तसेच एकदा आई मोदक करत होती तेव्हाही म्हणाले ,"बघ जा शामाच्या आईने किती छान मोदक केले आहेत". त्याही नंतर शिकून तयार झाल्या. नंदाच्या आईंचा पण स्वभाव फार हळवा होता. एकदा त्या जोरजोराने रडत आमच्या आईकडे आल्या, आईला वाटले की भाऊंचे आणि दोघांचे भांडण झाले की काय. नंदाच्या आईंना विचारल्यावर कळले की त्यांचे गावाकडचे चुलते बैलाने मारले त्यामुळे त्यांचे निधन झाले. आईने त्यांना थोडे समजावले. त्यानंतर बरेच दिवसांनी तशाच रडत त्या आमच्याकडे आल्या. आईला वाटले आता काय झाले कुणी गेले की काय? ती म्हणाली,"काय झाले ?"तर त्या म्हणाल्या की भाऊंची "बदली वाईला झाली आहे ". त्यावर आई म्हणाली की," अहो चांगले झाले तुमचे जांब गाव तिथून अगदी जवळ आहे ". तेव्हा नंदाच्या आई म्हणाल्या,"तेच तर आता मला घरी म्हणजे सासरी राहावे लागणार, आणि आमची सासू मला मिश्री घासू देत नाही." यावर आई काय बोलणार तेव्हाही तिने कशीबशी त्यांची समजूत घातली. भाऊंना त्या कोणाच्या घरात गेलेल्या आवडायचे नाही पण आमच्या घरी मात्र आलेले चालायचे. आमच्या मिश्री च्या पुड्या त्या पण बांधयच्या. त्या पैशातून त्यांनी सोने घेतले होते. तेव्हा सोन्याचा दर दीडशे किंवा फार तर अडीचशे रुपये असेल. आईने पण हौसेने सोन्याची एकदाणी केली होती. एकदा नंदाच्या आईंना लग्नाला जायचे होते तेव्हा त्या आईला म्हणाल्या,"तुमची एकदाणी जरा देता का? मला लग्नाला जायचे आहे". आईने ती दिली होती. माझ्या दादांनी त्यावेळी नवीन निघालेली पॉलिस्टर साडी पुण्याहून आईसाठी आणली होती. नंदाच्या आई एक दिवस सिनेमाला निघाल्या होत्या तेव्हा आईला म्हणाल्या की,"तुमची ती नवी साडी मला नेसायला देता का?". आईने दिली. दुसऱ्या दिवशी साडी परत देताना नंदाच्या आई, हसत हसत म्हणाल्या,"तुमच्या साडीचा पायगुण चांगला आहे,"आई म्हणाली," का काय झाले ?. त्या म्हणाल्या,"अहो सिनेमाला गेले तेव्हा मला चाळीस रुपये सापडले,". असा तेव्हा साध्या साध्या गोष्टीत खूप मोठा आनंद मिळायचा. तेव्हा जास्त कपडे कोणाकडेही नसत. मी जेव्हा कॉलेजला जायला लागले तेव्हा वाड्यातल्या बायका नवी साडी आणली की, आवर्जून मला घडी मोडायला देत. ती साडी हलकी आहे की भारी आहे असले मनातही यायचे नाही. नवी साडी मिळाली ना नेसायला हेच खूप झाले. एवढेच नाही तर नवीन साडी किंवा कपडे आणले की, यांना हळदी कुंकवाचे बोट लावून देवापुढे ठेवून मग घालायचे, आणि मोठ्यांना नमस्कार करायचा. तेही सुख वेगळेच.

  पूर्वी पत्र यायची ती सहसा पोस्ट कार्ड उघडे असायचे. घरमालकांची अरुणा बरेच वेळा वाड्याच्या दिंडी दरवाजाजवळ एक कट्टा होता त्यावर बसलेली असायची, पोस्टमन आला की ही कुणाचे असेल ते पत्र घ्यायची. आणि पत्र आपल्या हातात पडायच्या आत सगळा मजकूर आमच्यापर्यंत पोहोचायचा. कारण झेंडा फडकवल्यासारखे ते पत्र फडकावत मजकूर सांगत आम्हाला द्यायची. आता त्या गोष्टीचे हसू येते आहे पण त्यावेळी खूप राग यायचा. तिला सिनेमाचे खूप वेड होते आणि गाण्यांचे पण. नव्या साडीची घडी पण ती सिनेमाला जाताना मोडायची. दुसरे म्हणजे माझे दादा पुण्याला गेलेले असले आणि त्यांचे कुणी मित्र आले की त्यांना वाड्याच्या दारातच सांगायची,"दादा नाहीत घरी ते पुण्याला गेलेत येतील चार दिवसांनी". त्यामुळे दादा घरी नसल्याची खबर वाड्याच्या दारातच त्यांच्या मित्रांना मिळालेली असायची

                   

          माझे दादा अगदी अवलिया होते. सतत काहीतरी उदाहरणे देत असायचे. हे ही विनोदी पद्धतीने. त्यांच्या मित्राची मेहुणी खेड्यातून तिच्या काहीतरी कामासाठी आमच्याकडे नेहमी यायची. तिला बोलताना सवय होती की," मी पण, हंगणे मारले" (म्हणजे टोमणा मारला). मग दादांनी तिचे नावच, हंगणे ठेवले होते. आमची एकच रूम होती आणि बाहेरून आले की थोडासा अंधार वाटायचा, स्पष्ट दिसायचे नाही. त्यांच्या मित्राने एके दिवशी ती मेहुणी येणार असल्याचे सांगितले होते. दादा बाहेरून आल्या आल्या म्हणाले की," हंगणे आले होते का? " मी आणि आई एकदम अवाक झालो कारण हंगणे तर तिथेच बसले होते. नशीब तिला काही समजले नाही. आणि आम्ही हुश्य केले. थोड्याच वेळात त्यांना पण दिसले आणि ते गप्प बसले. त्यानंतर घरमालकांच्या रानातल्या वहिनी असे ज्यांना आम्ही म्हणायचो त्यांना प्रत्येक वाक्यानंतर,"आता का वनवा का का झाला"असे म्हणायची सवय होती. मग त्या बोलायला लागल्या की आधीच दादा,"आता वनवा का का झाला". असे स्वतः म्हणायचे. आम्हाला खूप मजा यायची . बरं समोरच्या माणसाला हे मज्जा करतायेत हे लक्षात पण यायचे नाही. आणि ते आईची पण फिरकी घ्यायचे. आधी जिथे आम्ही राहत होतो तिथे लाखोळे म्हणून राहत होते त्यांची बायको हिची मैत्रीण होती. एकदा तिच्या मुलीचे लग्न होते आणि तिच्याकडे खूप पाहुणे आले होते म्हणून ती आईला म्हणाली की,"मला तुमचे गजराचे घड्याळ आणि बंब देता का?"आईने ते दिले. तेव्हा माझे दादा आईला गमतीने म्हणाले की,"एखाद्या दिवशी तुमचा नवरा जरा उसना देता का म्हटले तर तू मलाही देशील"आई काय बोलणार डोळे मोठे करून गप्प बसायची. कधी दोघांचे कशावरून भांडण झाले तर मला म्हणायचे,".  झांटीपी आहे नुसती ". आणि मला स्वतः सांगायचे की सॉक्रेटिस ची बायको. एकदा विलासने मिल्ट्रीत असताना ताज महाल पाहिला तेव्हा त्यावर चांदण्या कशा चमकतात ते पत्रात लिहिले होते. त्यावर यांनी आमच्या डोळ्यासमोर दिवसा चांदण्यात चमकतात (पैशांची कायम चणचण) असे लिहिले होते.                     

                                            

                  आमच्या दोघांचे एवढे बॉण्डिंग होते की, माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांना माहीत होत्या. माझी एक अलका नावाची मैत्रीण फक्त इयत्ता पाचवी पर्यंत माझ्या वर्गात होती. त्यानंतर तिच्या वडिलांची बदली सांगलीला झाली. पण आम्ही दोघी एकमेकींना पत्र लिहायचो. त्यामुळे सत्तरीला आलो तरी एकमेकींच्या संपर्कात आहोत. तर माझ्या दादांना त्याचेही कौतुक होते. एकदा मला म्हणाले,  " चल मी जयसिंगपूरला कामासाठी जाणार आहे जाताना तुला अलकाकडे सोडतो आणि येताना न्यायला येतो" मला तर खूप आनंद झाला. तेव्हा काही आधी फोन करा कळवा असली भानगड नव्हती. उठायचे की वर तोंड करून जायचे. जाणाऱ्याला जेवढा आनंद व्हायचा, तेवढाच आनंद ज्यांच्याकडे गेलो त्यांनाही व्हायचा. आम्ही दोघे गेलो, मी तिथे दिवस भर थांबणार होते. मग काय तिच्या आईने मला छान जेवू घातले नंतर आम्ही पिक्चर ला गेलो मज्जा मज्जा केली. संध्याकाळी माझे दादा मला न्यायला आले. तिकडून आल्यानंतर मी खूप आजारी पडले मला टायफॉईड झाला, उठवत नव्हते खूप अशक्तपणा आला होता. त्यामुळे अलकाला काही पत्र वगैरे पाठवले नाही. मग तिचे पत्र आले की तू गेल्यापासून पत्र का नाही पाठवले. त्या पत्राला माझ्या दादांनी उत्तर पाठवले की अगं ती खूप आजारी आहे बरी झाली की पाठवेल तुला पत्र. त्यावेळची साधारण पाचवीपासूनची तिची आणि दुसरी एक माझी मैत्रीण उज्वला बुरसे यांची पत्रे मी अजून जपून ठेवली आहेत. माझ्या दादांचे त्यांनी विलासला लिहिलेले 1970 चे एक पत्र मी अजून ठेवले आहे. तीच माझी मैत्रीण उज्वला जवळजवळ वीस वर्षांनी भेटल्यानंतर तिच्या नवऱ्याला सांगत होती की शामा म्हणजे तिच्या दादांचा जीव की प्राण होती. खरोखर माझ्या दादांचे जेवढे प्रेम मला मिळाले ते आज सत्तरी पर्यंत मला पुरले आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ते माझ्या सोबत राहील. एकदा त्या गयावळांच्या बायकोने आम्हाला दोघांना चहा दिला नंतर ती सहज मला म्हणाली जा तेवढ्या कप बशा धुवून आण. अरे बापरे, माझ्या दादांना एवढा राग आला, मला म्हणाले पुन्हा त्यांच्या घरचा चहा सुद्धा नको. यांच्या मुलीला तेही लाडक्या लेकीला काम सांगतात म्हणजे काय. 

                                   त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील सावकार होते, काले गावात खूप मोठा वाडा आणि शेती होती. माझे आजोबा घरजावई होते. पण हे सगळे वैभव गेल्यानंतर ते एका खोलीत राहताना मागच्या वैभवाची आठवण काढून दुःखी झालेले कधीच पाहिले नाही. आहे त्या परिस्थितीत राजासारखे राहत. तेच नव्हे तर माझे काका काकू आणि चुलत भावंडे देखील कधी त्या वैभवाचा उल्लेख करत नसत. आहे त्यामध्ये खुश रहात कधी रडगाणे गात बसायचे नाहीत. माझे दादा आणि माझा भाऊ विलास मला सायकलवरून काल्याला न्यायचे. कराड पासून काले गाव सात किलोमीटर अंतरावर आहे. माझे वडील आजीला भेटायला जाताना मला घेऊन जात. आजी खूप वयस्कर होती आणि ती वडिलांना म्हणायची ,"बाबू मला विहिरीच्या काठावर नेऊन ठेव". त्यावेळी मला त्याचा अर्थ कळायचा नाही. पण ती जीवाला वैतागली होती त्यामुळे तसे म्हणत असेल हे नंतर कळले. माझ्या काकांनी एक कार घेतली होती ते काले ते कराड अशी ट्रिप करत म्हणजे लोकांना ने-आण करत. तेव्हा ते माझ्या वडिलांकडून पण पैसे घेत. त्यावेळी काहीतरी 50-55 पैसे वगैरे असतील. 

                          मला एकच सख्खे काका होते. चुलत काका चार होते आणि चुलत आत्या चार. सगळ्यांची परिस्थिती जेमतेमच होती. फक्त एक मुक्ता आत्या होती, ती खूप श्रीमंत होती तिचा नवरा अकोल्यामध्ये इंजिनियर होता. त्यामुळे ते नातेवाईकांना भेटायला आले की लॉजवर राहत.  विमला आत्या म्हणून होती तिच्या मुलाशी माझ्या मोठ्या बहिणीचे म्हणजे लीला ताईचे लग्न झाले होते. त्यांचे गाव कागल होते. ते माझे भाऊजी ठाण्याला होते. मला सगळ्यात जास्त सहवास विठा आत्या आणि बंडू काकांचा लाभला. बंडू काकांची तर मी खूप लाडकी होते. ते किर्लोस्करवाडीत स्टेट बँकेत शिपाई होते. किर्लोस्करवाडीत सगळ्या कर्मचाऱ्यांना मग बँकेतला असो किंवा किर्लोस्कर कारखान्यातला, त्यांना राहायला स्वतंत्र घरे असत बाजूला मोठे कंपाऊंड आणि स्वतंत्र बाथरूम, तीन रूम. माझे चुलत आजोबा आणि आजी काकांकडे असायचे. विठा आत्या पण किर्लोस्करवाडीत राहत होती पण ती थोडी बाजूला राहायची. बरेच वेळा ती आणि तिची मुले काकांकडे असायची. मला काकांचे ते घर खूप आवडायचे. शिवाय ती आजी पण सुगरण होती. छान छान स्वयंपाक करायची. त्या आजोबांना पण चवीचे खायला लागायचे. त्यामुळे ते पुरणपोळी असेल त्या दिवशी आधीच खपली गहू आणून ते दळून वापरायला लावत, आणि बजावत आज काकडी कोचू नका नाहीतर कणिक बिघडेल. त्यावेळी किर्लोस्करवाडीला जायचे म्हणजे रेल्वेने जावे लागेल. ते एक अट्रॅक्शन होते. काका माझ्यासाठी कराडला येत आणि मला घेऊन काल्याला जात. नेहमी माझ्या हातून लॉटरीचे तिकीट काढत. दुर्दैवाने कधी लागले नाही ती गोष्ट वेगळी. त्यांनी मला स्टुडिओमध्ये नेऊन त्यांच्याबरोबर माझा एक फोटो पण काढला होता. तेव्हा असे उठता बसता फोटो काढता यायचे नाही त्यामुळे फोटोचे खूप अप्रूप असायचे. काकांना कुणी विचारले की ' काय कसे काय चालले आहे?"तर ते हसून म्हणत "चलती का नाम गाडी". तेव्हा त्या नावाचा किशोर कुमारचा एक सिनेमा आला होता. मी मोठी झाल्यावर सुद्धा आणि माझे वडील गेल्यानंतर सुद्धा मी आणि आई काकांकडे माझ्या अभ्यासासाठी महिना महिना जाऊन राहायचं. तिथे त्या आत्याची संजीवनी नावाची मुलगी माझ्या एवढीच होती त्यामुळे मला तिथे करमून जायचे. 

             माझ्या दादांना सोव्हिएत देशाविषयी फार प्रेम होते. त्यांनी कुठून एक लेनीनचा फोटो आणून फ्रेम करून घरात लावला होता. शिवाय आमच्याकडे सोव्हिएत नावाचे एक मासिकही यायचे. त्यांचे एक किरपे  गावचे देवकर म्हणून मित्र होते. धोतर फेटा असा त्यांचा पेहराव होता. माझे दादा त्यांना सर स्ट्राफोर्ड क्रिप्स असे म्हणत. हे स्टाफोर्ड  स्क्रिप्स  कोण हे मला अद्यापही कळले नाही. काल्याचे एक  बटू अण्णा म्हणून आमच्याकडे येत ते उंच होते. आमची शनिवारातली खोली छोटी होती पण तिला दोन दारे  होती. मागच्या दाराची उंची  फार कमी होती. ते बटू अण्णा आले की मागचे दार कमी उंच आहे हे त्यांच्या लक्षात यायचे नाही. आणि दर वेळेस त्यांचे टक्कल असलेले डोके चौकटीला धडकायचे. माझे दादा म्हणायचे,,"बटू अण्णा बाहेर जाताना चौकट थोडी बाहेर ढकलतात आणि आत येताना आत ढकलतात." 

                            बरेच वेळा दादा  मुंबईला जात असत. माननीय यशवंतराव चव्हाण त्यांचे मित्र होते. कोणाची मुले शिकली कि  त्यांना नोकरी साठी ते त्यांच्याकडे घेऊन जात. माझ्या दादांचा पेहराव म्हणजे नेहरू शर्ट आणि पायजमा. एकदा म्हणे दादा  अशाच एका मुलाला घेऊन चव्हाणसाहेबांकडे गेले होते. यांचा पेहराव पाहून तिथल्या शिपायाने यांना अडवले. तेव्हा माझे दादा म्हणाले,"जा यशाला जाऊन सांग बाब्या आलाय म्हणून". त्या शिपायाने आत जाऊन सांगितल्यावर स्वतः यशवंतरावजी यांनी बाहेर येऊन माझ्या वडिलांना मिठी मारली. अर्थात हा किस्सा मला त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या माझ्या एवढ्याच मुलीने म्हणजे वासंतीने सांगितला. ते मित्र म्हणजेच काल्याचे यशवंतराव पाटील त्यांना सगळे मास्तर म्हणत. कारण अगदी नोकरीच्या सुरुवातीलाच ते गांधी चळवळीत उतरल्यामुळे त्यांची शिक्षकाची नोकरी गेली होती. पण त्यांची पत्नी सुगंधाबाई शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या, त्यांना आम्ही बाईच म्हणत असू. त्या काळात कोणी स्त्रिया नोकरी करत नव्हत्या. या सुगंधाबाई शाळेमध्ये शिक्षकी पेशा सांभाळायच्या आणि गृहिणी म्हणून घरी नेहमी डोक्यावर पदर ,कपाळाला मोठे कुंकू ,आणि नऊवारी साडी. येणाऱ्या जाणाऱ्या चे अगत्याने करत. मला तर त्या शिक्षिकेपेक्षा कर्तव्यदक्ष गृहिणी जास्त वाटल्या, तेच त्यांचे आरोप माझ्या मनावर ठसले आहे. सातवी होऊन शिक्षिका झालेल्या त्या रिटायर होईपर्यंत विस्तार अधिकारी पदावर पोहोचल्या होत्या. त्यांची खास आठवण म्हणजे त्या पंचायत समितीमध्ये मीटिंगसाठी येत त्यावेळी पांढऱ्या स्वच्छ कपड्यात बांधून ज्वारीची भाकरी आणि तुरीचा डाळ कांदा हमखास आमच्याकडे येताना घेऊन येत. आणि म्हणत," पदरात आपली भाकरी असलेली बरी" ती त्यांची शिदोरी आणि डाळ कांदा अजून मला चवी सहित आठवतो आहे. दुसरी एक त्यांची खास आठवण म्हणजे, कधीही काल्याला मुक्काम झाला आणि सकाळी उठल्यावर दात घासताना लगेच चूळ भरायला गरम पाणी द्यायच्या. एकदा माझ्या दादांनी मुंबईहून त्यावेळी नवीन निघाली होती ती हॅन्डबॅग आणली होती. केव्हा काल्याचे  यशवंत मास्तर आले होते ,त्यांनाही आम्ही दादा म्हणायचो. यांनी त्यांना कौतुकाने ही बॅग दाखवते, तेव्हा ते म्हणाले छान आहे, मी आता कोकणात मुलीकडे चाललो आहे तेव्हा जाताना नेतो आल्यावर परत देईन. ते घेऊन गेले . मुलीकडून येताना त्यांनी त्या बॅगेतून कोकणातला फणस आणला आणि नव्या ब्यागेची वाट लागली.तोही किस्सा दादा मजेने सांगत बसले. त्यांचा स्वभावच गंमतशीर होता. 

                    आमच्या मिश्रीच्या कारखान्यात एक भामाबाई नावाच्या खूप जाड अशा बाई यायच्या, नऊवारी साडी, छान अंबाडा अशा त्या होत्या. त्याही लक्षात राहण्याचे कारण म्हणजे त्या सांगायच्या त्यांच्या शेजारी विद्यार्थी भाड्याने राहतात. त्यांचे डबे खेड्यातून बस मधून येतात. ती मुले बरेच वेळा राहिलेली भाकरी टाकून देत. भामाबाई त्या मुलांना म्हणायच्या मुलांनो त्या भाकरी टाकू नका त्या मला द्या. त्या घेऊन भामाबाई पत्र्यावर छान वाळवायचा  आणि त्यांचा चुरा करून त्यामध्ये कांदा कोथिंबीर घालून मस्त फोडणी करायच्या. हे वर्णन त्या इतके छान करायच्या की, ऐकून तोंडाला पाणी सुटायचे. नेहमी म्हणायच्या "मोत्यासारखे लेणे नाही". आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी सायरा बानू चे' दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे 'हे गाणे सारखे रेडिओवर लागलेले असायचे. त्या भामाबाई मिश्री पुडीत भरता भरता म्हणायच्या ,"जाण जा की तिकड काय पण आम्हाला कशाला विचारतोस?". आम्हाला हे ऐकताना खूप मजा वाटायची.

                         माझ्या वडिलांना गाणी ऐकायला आवडायची. आम्हाला मात्र त्याचा कंटाळा यायचा. माझ्या भावाने विलासने मिल्ट्रीतून एक रेडिओ आणला होता, त्यावर कधी कधी,'आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है 'हे गाणे लागायचे ते त्यांना फार आवडायचे. दुसरे मिलन मधील ,'सावन का महीना पवन करे शोss र 'तर पुढे ,'अरे बाबा शोर नही  सोsss र '. हे पण गाणे त्यांना आवडायचे. आणि पुढची ओळ ते रिपीट करायचे. अगदी मनमौजी होते. तेव्हडेच  संवेदनशील होते. मी लहान असताना आम्ही तिघे जेवत होतो आणि माझे दादा अचानक उठून उभे राहिले आणि म्हणाले, "आपली लता गेली, माझ्या डोळ्यासमोर लख्खन वीज चमकली ". लता म्हणजे माझी दोन नंबरची मोठी बहीण. डॉक्टरांनी सांगितले होते की हिच्या हृदयाला छिद्र आहे त्यामुळे हिचे लग्न करू नका. पण काही दिवसांनी तिने हट्ट केला की माझे काहीही होऊ दे एखाद्या गरिबाशी माझे लग्न करून द्या. तिचे लग्न केले होते आणि ती नाशिक मध्ये होती. आणि डिलिव्हरी च्या वेळेस ती गेली. ती नाशिक मध्ये आम्ही कराडमध्ये देव जाणे त्यांना तो दृष्टांत कसा झाला. कारण ते खरेच घडले होते. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते एक तर पोस्टात फोन घ्यायचा किंवा तार यायची.            

           . 

 मी दहावी  तून...अकरावीत गेले. दादा तर अजून खुश झाले. माझी पूर्व परीक्षा जवळ आली होती त्यामुळे अभ्यास सुरू होता. तरीही दादांबरोबर बाहेर जाणे काही  बंद नव्हते. मी त्यांची काठी होते ना. ऑगस्ट आठ ला माझा वाढदिवस होता म्हणून त्यांनी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली होती. पण काय झाले कोण जाणे केक काही मिळाला नाही. त्यांच्या मनात पाल चुकचुकली असे का व्हावे?. कारण मी नववीत असताना त्यांना अटॅक येऊन गेल्यापासून जरा काही घडले की मनात शंका यायच्या, असं का झालं बरं. साधारण 18 19 ऑगस्टला माझ्या दादांना परत हार्ट अटॅक आला. डॉक्टर एरम नि त्यांना बेड रेस्ट सांगितली होती. अगदी या कुशीवरून त्या कुशीवर पण वळायचे नाही म्हणून सांगितले होते. त्यांना चैन पडत नव्हता. माझे काका-काकू, भाऊ, माझी ताई सगळे जमले होते. एवढे आजारी असूनही दादा मला अभ्यास कर म्हणत होते. आणि आईला ज्या गोळ्या सांगलीच्या डॉक्टरांनी दिलेल्या त्यांची नावे सारखी घेत होते. ती नावे अजूनही मला आठवतात.  आई हात हातात घेऊन सारखे म्हणायचे की,"मी तुमच्या दोघींसाठी काहीच ठेवले नाही आता तुमचे कसे होणार?". आई म्हणायची,"आधी तुम्ही बरे व्हा मग बघू काय करायचे ते." कारण मिश्रीचा कारखाना हे आमच्या उपजीविकेचे साधन होते, आणि आई कधी घराबाहेर पडली नव्हती. पण दैवा पुढे कोणाचे काय चालणार? 21 ऑगस्टला त्यांना खूप त्रास व्हायला लागला. नेमका त्याच वेळी बल्ब गेला आणि ते स्वतःच म्हणाले "गेला बल्ब". त्यानंतर घशातून घरघर आवाज यायला लागला तेव्हाही म्हणाले," आता घरघर लागली". आणि माझे दादा मला पोरकी करून निघून गेले. अण्णाची तरी रोज एक फेरी असायची. त्याचाही संसार होता, नोकरी होती. आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची.  मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि मग अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली. तेव्हा त्यांनी तिला सगळी माहिती सांगितली. आप्पा म्हणाले," आमच्या घरातल्या बायकांना ड्राफ्ट म्हणजे काय हेही माहिती नाही". खरंतर त्या बायकांचा काय दोष, त्यांनी काही विचारले असते तर यांनी थोडेच सांगितले असते. साधा डोक्यावरून पदर खाली पडला तर म्हणायचे खिळा ठोकला पाहिजे म्हणजे पदर राहील डोक्यावर. ते काहीही असले तरी माझ्या आईला सगळ्यांनी भावाप्रमाणे धीर दिला. आईने कधी नातेवाईकांकडे तर हात पसरला नाहीच पण ओळखीच्या कुणाकडे देखील उसने कधी काही मागितले नाही.

          वाड्यात एकूण चार नळ होते शिवाय बाहेर एक जास्तीचा नळ होता. नंबर लावायची पद्धत होती. आणि तिथेच कपडे धुण्यासाठी दगड ठेवलेले होते, त्यामुळे एकावेळी चार चार बायका बसून नळाचे पाणी घेऊन तिथेच धुणे धुत गप्पा मारत बसत. धबक धबाक करत धुणे धुवायला मजा यायची. मला कधी कसला राग आलेला असला की मी जरा जास्तच धबाक धबक करायची जेणेकरून पाणी आजूबाजूला उडावे आणि तिथेच कपड्याबरोबर राग पण धुवून निघायचा . त्यामुळे कपडे आणि मन दोन्ही स्वच्छ व्हायचं. पाणी सकाळी एक दोन तास असायचे तेवढ्यात धुणे धुऊन, प्यायचे पाणी आणि वापरायचे पाणी भरून ठेवायचे. चांगला व्यायाम व्हायचा. त्या पाण्याच्या वेळात कोणीही आले तरी पाणी भरून झाल्याशिवाय कोणीच लक्ष द्यायचे नाही. आम्ही गमतीने म्हणायचो,"पाण्याच्या वेळात मुख्यमंत्री, पंतप्रधान नव्हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तर त्यालाही म्हणतील थांब बाबा आमचे पाणी भरून झाले की बघू तुझ्याकडे ". खूप मजा यायची. 

       पुढे कॉलेजला असताना माझी मैत्रीण आशा नाईक ओगलेवाडीहून अभ्यासासाठी नेहमी माझ्याकडे राहायला यायची तशी ती एकदा आली होती. आम्ही  वाड्यातल्या काही बायकांसहित चतुर्थी दिवशी कोटातल्या गणपतीला अगदी लवकर उठून जायचो. आम्हाला वाटायचे पहिला हार आमचा पडला पाहिजे. आशा आली होती तेव्हा दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे जाणार होतो. पण आशा म्हणाली मी घरीच थांबते. कारण ती उशिरा उठणार होती. पण विशेष म्हणजे आम्ही परत येईपर्यंत तिने नंबरने पाणी भरून ठेवले होते याचे आम्हाला नवल वाटले. दुसरे म्हणजे दर चतुर्थीला मी एक गणपतीच्या मंदिरा समोर असणाऱ्या लॉटरीच्या स्टॉल वरून तिकीट घ्यायचे 50 पैशाचे. आणि प्रत्येक वेळेस मला फक्त एक रुपयाचे तिकीट लागायचे. आशा नेहमी माझ्याकडे राहायला यायची. आणि आमच्या घरी उन्हाळ्यात खूप गरम व्हायचे त्यावेळी फॅन वगैरे तर नव्हता मी तर कॉट खाली झोपायचे. आशाला जास्त गरम झाले की ती टॉवेल ओला करून अंगावर घ्यायची. आम्हाला सकाळी उठायला नको वाटायचे त्यामुळे आम्ही रात्री तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचो. असेच एकदा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसल्यामुळे आम्हाला दोघींना उन्हाळे लागले. मग आईने आम्हाला दूध पाणी एकत्र करून त्यामध्ये वेलची पूड घालून खाली वर करून दिले. आशाचाही माझ्यावर खूप जीव होता. एकदा मी आजारी पडले होते आणि बरी झाल्यावर तिच्याकडे राहायला गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींकडून तिने माझी दृष्ट काढून घेतली होती. तिचे आई-वडील आणि भाऊ बहिणी सगळेच प्रेमळ होते. त्यांचे गाव  गोव्याकडील सावंतवाडी होते. त्यांच्या घरी गोव्याकडची भाषा बोलली जायची आणि मला ती खूप आवडायची. आशा मुळे मी  जुने हिंदी सिनेमे खूप पाहिले. आमचे कॉलेज सकाळी असायचे. आम्ही शेवटचा पिरियड बुडवून मॅटीनिला जायचो. मॅटिनी बारा वाजता असायची. धावत पळत बस ने जाताना आशा देवाला म्हणायची," देवा तिकीट मिळू दे तुला साखर ठेवी ठेवीन". एकदा तिला मी विचारले," आशे, दर वेळेस देवाला साखर ठेवीन म्हणतेस खरेच ठेवतेस का ग?"त्यावर,"हो तर". असं ती म्हणाली. खरं खोटं देवच जाणे . 

                      आमचा कॉलेजमधला एक ग्रुप होता. मी आशा नाईक , हाजरा शेख, आणि सावित्री आठवले. पण आमचे काही विषय वेगळे होते, जे विषय कॉमन होते त्याला आम्ही एकत्र बसायचो. माझा स्पेशल विषय इंग्लिश होता .आणि माझा स्वभाव भित्रा होता त्यामुळे या तिघी मला माझ्या क्लासरूम पर्यंत सोडायला यायच्या. आता त्या गोष्टीचे मला हसू येते आहे. माझ्या घरी अभ्यास करायला अडचण पडायची म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हाजराच्या घरी अभ्यासाला जायचो तिला आम्ही शेखी म्हणायचो. तिचा बंगला मोठा होता. चारी बाजूला मोकळी जागा आणि छान बाग होती. आम्ही त्या बागेत बसून चौघीजणी अभ्यास करायचो. कधी कधी सुट्टी दिवशी आम्ही शिवाजी हायस्कूलमध्ये अभ्यासाला  जायचो. तिथला एक वयस्कर शिपाई आमच्या ओळखीचा होता तो आम्हाला एखादी क्लासरूम उघडून द्यायचा. आम्ही डबे वगैरे घेऊन तिथे अभ्यास करायचो. कधी कधी बेंचेस जोडून आळीपाळीने डुलकी पण काढायचो. आता या घडीला सगळे मजेशीर वाटते आहे. 

                      आमचे कॉलेज सकाळी असायचे आणि पावणे सातच्या बसने जावे लागायचे. माझा कॉलेजमधला दुसरा एक इंग्लिश डिपार्टमेंटचा ग्रुप होता. यामध्ये छाया करमरकर, माधवी दातार, सिंधू मोहोळकर, कुंजन कुलकर्णी जी आटपाडीची होती. आम्हाला सगळे पंचकन्या म्हणत. आमच्या दोन ग्रुप पैकी आता हाजरा, माधवी. आणि सिंधू हयात नाहीत. कधी कधी मी छायाच्या घरी पण अभ्यासाला जायची आणि कधी सिंधूच्या घरी पण जायची. छाया चे घर पण मोठे होते. तिचे वडील डॉक्टर होते आणि माधवीचे पण. छाया नेहमी गाडीने कॉलेजला यायची. कधीकधी ती कॉलेजमधल्या ऑफिस मधून घरी फोन करायची. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते त्यामुळे आम्हाला कौतुक वाटायचे. मात्र परमेश्वरी कृपेने कधीच कुणाचा हेवा वाटला नाही. वर्षातून एकदा गॅदरिंग असायचे तेव्हा मात्र शेखीचा भाऊ जाफर आम्हाला गाडीतून कॉलेजला सोडायचा कारण गॅदरिंग रात्रीच्या वेळी असायचे. गाडीतून जाताना खूप भारी वाटायचे. एरवी आमचा सगळा प्रवास साध्या बसने असायचा कधी आराम बस नाही. पण त्याचीही कधी खंत वाटली नाही. परमेश्वराने गरजेनुसार वेळोवेळी सगळे काही पुरवले त्यासाठी त्याचे नेहमीच आभार मानते. 

     छायाला एक सवय होती, वर्गात पुढे बसलेल्या मुलीच्या साडी वरचे डिझाईन ती वहीवर काढायची. त्यातले एक अजूनही माझ्याकडे आहे. साधारण 1976-77 मधले असेल. तिला व्हाट्सअप ला फोटो काढून पाठवला तर तिलाही विशेष वाटले. कॉलेजमधली अजून एक मज्जा म्हणजे त्यावेळी आम्ही मुलं मुली एकमेकांशी अजिबात बोलायचो नाही. अगदी गल्लीतला मुलगा असला तरी. काही मुले परगावची असायची. त्यांचे डबे बस ने यायचे त्याचे आम्हाला विशेष वाटायचे. असे असले तरी कॉलेजच्या इलेक्शनच्या वेळी मात्र बरीच मुले घरी म्हणजे घराबाहेर आली होती प्रचार करायला. मुलांपैकी एक सीआर असायचा आणि मुलींपैकी एल आर असायची. गॅदरिंगच्या वेळी फिश पाँड प्रकार होता. सगळे काही लक्षात नाहीत पण एका मुलीचे नाव छबी होते तिला,'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी ', एक भडकमकर नावाचे सर होते ते अतिशय बारीक होते त्यांना 'इथे ओशाळला बोर्नविटा' असे फिश्पाँड पडलेले आठवतात. दुसरे म्हणजे गॅदरिंगच्या दिवशी  एल आर जे त्यावेळी मागेल ते देण्याची पद्धत होती. एल आर स्टेजवर आली आणि तिने काय मागितले हे काही आम्हाला कळले नाही पण बरीच जण बाजूला पळत सुटली. आम्हाला वाटले काय झाले काही संकट तर नाही ना? आम्ही सुद्धा पळण्याच्या सावध पवित्रात बसलो. तेवढ्यात कळले की दुसरे काही नाही एल आर ने सायकलच्या पुंगळ्या मागितल्या. त्यामुळे ज्यांच्या सायकल्स होत्या ते पुंगळ्या वाचवायला आणि ज्यांच्या नव्हत्या ते पुंगळ्या काढायला पळाले होते. हा प्रकार समजल्यावर आम्हाला हसू आवरेना. एकंदरीत ते दिवस फुलपाखरी होते, ना कसली जबाबदारी ना कसली काळजी फक्त अभ्यास एके अभ्यास. एका सेमिस्टरला मला आणि आशाला अगदी एकसारखे म्हणजे काहीतरी 67 पॉईंट 50 म्हणजे वरचे पॉईंट पण सारखे पडले होते. 

        आशाने एक कविता केली होती. मग मी पण एक हिंदी कविता केली आमच्या कॉलेजचा वार्षिक अंक होता,'हिरवळ 'त्यामध्ये आमच्या </div>कविता छापून आल्या होत्या. शेखीने पण एक कविता दिली होती. गंमत म्हणजे ते एक हिंदी गाणे होते पण कोणी काही त्यावर आक्षेप घेतला नाही. शेखीची आई जरा स्वभावाने कडक होती. त्यामुळे आम्ही थोडे जपून असायचो. तरी ती प्रेमळ होती. तिचे वडील खूप प्रेमळ होते. मी बँकेचे- पोस्टाचे व्यवहार करायची त्याचे त्यांना फार कौतुक वाटायचे. आमचे ग्रॅज्युएशन झाल्यावर मी एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला जाणार आहे असे सांगितल्यावर, हाजराला ते म्हणाले तू पण जा शामा बरोबर आणि तू पण एम्प्लॉयमेंट कार्ड काढ. अर्थात तिला काही गरज नव्हती. पण तिलाही थोडी माहिती व्हावी म्हणून त्यांनी तिला सांगितले. तिच्या हातात सतत सोन्याच्या कंगन, पाटल्या, गोठ वगैरे असायच्या त्यांचा आवाज मला खूप आवडायचा. तिचा स्वभावही खूप विनोदी होता. आम्ही रस्त्याने जाताना समोरच्या व्यक्तीबद्दल अगदी मोठ्याने ती विनोदी काहीतरी बोलायची, मला हसू आवरायचे नाही आणि ही निरागस चेहरा करून चालत असायची. तिला मी म्हणायची ,"अगं त्या माणसाला काय वाटेल ?"तर म्हणायची, त्याला काय कळणार आपण त्याच्याबद्दल बोलतोय का कुणाबद्दल ते". 

                           माझे एम ए पूर्ण झाल्यावर मी नोकरीसाठी प्रयत्न करायला लागले. त्यावेळी आई अगदी तहसील कार्यालयातला शिपाई असला तरी त्यालाही म्हणायची, "माझ्या मुलीसाठी एखादी नोकरी बघा हो". मला काही ते आवडायचे नाही. तहसील कार्यालयात आईला दीडशे आणि मला पन्नास रुपये असे माझे लग्न होईपर्यंत किंवा मला 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत मिळणार होते. सुरुवातीला तहसील कार्यालयात जाऊन ती पेन्शन घ्यावी लागायची. तिथे एक तानाजी माने नावाचे क्लार्क होते. तेही स्वभावाने चांगले होते. एकदा मी त्या कार्यालयाच्या जाहिरातीवरून रेकॉर्ड रूम मध्ये डेली वेजेस नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या मानेंना मी हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की,"तुलाही नोकरी नक्की मिळेल पण तू ती करू नकोस".

          वडील गेल्यानंतर आईला व मला मिळणारी दोनशे रुपये पेन्शन, आईची शिलाई आणि मला वर्षातून एकदा मिळणारी स्वातंत्र्यसैनिकांची स्कॉलरशिप यावर आमचा दोघींचा उदरनिर्वाह चालू होता. मला वर्षातून एकदा मिळणारे सातशे वीस रुपये आम्ही बँकेत ठेवायचो. कॉलेजला वार्षिक उत्पन्नाचा दाखला देताना मी आठ हजार की काहीतरी उत्पन्न दाखविले होते. आमच्या सरांनी मला बोलावून विचारले की एवढे कमी उत्पन्न तुमचे असे वाटत नाही. त्यावर मी त्यांना सांगितले की त्यापेक्षा कमी कसे दाखवायचे म्हणून तर मी तेवढे दाखवले आहे, खरं तर तेवढेही नाही. त्यांना मी खरी परिस्थिती सांगितली होती. कॉलेजला असताना मला फक्त दोनच साड्या होत्या त्यावेळी खटावच्या वायल मिळत. माझ्या मैत्रिणी मला विचारत ,"तू रोज साड्यांना इस्त्री करतेस का?". त्यांना मी सांगायची की,"माझी आई साडी धुवून व्यवस्थित वाळत घालते आणि नंतर छान घडी करून ठेवते". तेव्हा घरी इस्त्री पण नव्हती.. माझे शिक्षण होऊन वर्ष होत आले तरी नोकरीचा काही चान्स दिसेना. मी नेहमी पेपर मध्ये जाहिराती पाहून अर्ज करायची आणि तो रजिस्टर ने पाठवायची. मला बाहेर जायला नकोसे वाटायचे त्यामुळे घरमालकांचा शरद होता त्याच्याजवळ ते सगळे तयार करून द्यायची. असे बरेच अर्ज मी पाठवले होते. पण एकाचेही काही पुढे झाले नाही. नंतर नंतर तर रजिस्टरचा खर्चही फार वाटायला लागला त्यामुळे पोस्टात असणाऱ्या रजिस्टर वरच नोंद करून अर्ज पाठवायला लागलो. 

              एकदा घरमालकांचा शरद परगावी गेला होता. त्याचवेळी झेडपीची जाहिरात पेपर मध्ये आली .तो फॉर्म भरून दोन दिवसात पाठवायचा होता. मग काय एका दिवसात आम्ही मायलेकी त्या मानेंकडे अर्ज कसा भरायचा इथपासून ते तो पाठवेपर्यंत सकाळ पासून संध्याकाळपर्यंत घरातून फक्त चहा पिऊन बाहेर होतो. तेव्हा रिक्षा वगैरे काही नव्हत्या सगळीकडे पायपीट करत फिरत होतो. घरी येऊन आदल्या दिवशीची होती ती भाकरी आणि चटणी खाऊन शांत बसलो. त्या अर्जावर पण काही लवकर उत्तर येईना. 

  शेवटी एकदाचा  साध्या पोस्टकार्ड वर पण छापील स्वरूपात इंटरव्यू चा कॉल आला. इंटरव्यू सातारा झेडपी मध्ये होता. त्यापूर्वी मी हाजराच्या घरी गेले होते. त्यांचे रोजे सुरू होते. तिच्या बाबांना ही बातमी सांगून  नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले ,"श्यामा आज माझा 27 वा रोजा आहे, माझा तुला आशीर्वाद आहे की ही नोकरी तुला मिळणार". सगळीकडून असा ग्रीन सिग्नल होता तरीही धाक धुक होतीच. कारण यापूर्वी मी खूप अर्ज केले होते आणि एकाचेही उत्तर आले नव्हते. त्या मानेंच्या ओळखीचे एक शिंदे साहेब म्हणून होते. ते झेडपी मध्ये अकाउंट ऑफिसर होते. इंटरव्यूला जाशील तेव्हा त्या शिंदे साहेबांना भेट असे माने यांनी सांगितले होते. मी आणि आई सातारा झेडपी मध्ये गेलो होतो पण त्यावेळी त्या शिंदे साहेबांना आधी भेटावे हे काही लक्षात आले नाही. इंटरव्यू झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी इंटरव्यू कसा झाला वगैरे विचारले, तेव्हा त्यांना सगळे सांगितले. इंटरव्यू च्या वेळेस आतून जो मुलगा किंवा मुलगी बाहेर येत होती त्यांना आम्ही लाईन मध्ये बसलेले विचारत होतो काय विचारले म्हणून? इंटरव्यूला औरंगाबादचे 10 जण होते ते आलटून पालटून प्रश्न विचारत होते. मला जास्त काही नाही एक दोन प्रश्न विचारले होते ते म्हणजे स्त्रियांसाठी कोणी काम केले मी,"महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महात्मा फुले" ही नावे सांगितली होती. नंतर त्यांनी विचारले की,'मनी इज अ सोर्स ऑफ ऑल हॅपिनेस' या वाक्याचे भाषांतर सांगा मी म्हणाले की,"पैसा हे सर्व सुखाचे साधन आहे". झाले एवढेच. परमेश्वराने त्यावेळी मला बुद्धी दिली शिवाय माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद. मला ही नोकरी मिळाली ती दादांच्या कृपेमुळेच असे मला मनोमन वाटते. कारण त्या औरंगाबाद निवड मंडळांनी स्वातंत्र्य सैनिकांची मुलगी म्हणूनही मला प्राधान्य दिले असावे. कारण तशी सर्टिफिकेट जोडण्याबद्दल जाहिरातीत उल्लेख होता. मी माझ्या वडिलांच्या सन्मान पत्राची हाताने लिहून सर्टिफाइड केलेली कॉपी त्याला जोडली होती, त्यावेळी झेरॉक्स मशिन नव्हते. इंटरव्यू झाल्यावर आम्ही त्या शिंदे साहेबांना भेटून चालत चालत निघालो. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांचा ड्रायव्हर हाका मारत आला. तो म्हणाला," तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे म्हणून". आम्हाला वाटले आता काय झाले? गेलो परत त्यांच्याकडे. ते म्हणाले,"अगं तुझा इंटरव्यू चा नंबर वगैरे काही सांगितला नाहीस". तो मी त्यांना दिला. त्यानंतर चार दिवसांनी आम्ही शिंदे साहेबांना भेटायला गेलो कारण ते कराडमध्येच राहत होते. त्यांना विचारले तर ते म्हणाले,"तुझा इंटरव्यू तर चांगला झाला आहे". तेवढेच समाधान वाटले. आता प्रतीक्षा ऑर्डरची होती. कधी कॉल लेटर येते म्हणून वाट पाहत होतो. दहा महिने झाले तरी काही ते आले नाही. कोणी म्हणायचे की आणखी दोन महिने झाले तर ते काही येणार नाही. मग मन खूप उदास व्हायचे. पण आशा काही सुटायची नाही. 

          कराडमध्ये एक गुजराती गृहस्थ होते, ते भविष्य सांगत असत. माझ्या आईच्या मैत्रिणीने म्हणजे दिलीपच्या आईने एकदा तिला त्यांच्याकडे नेले होते. त्यांच्यावर तिचा विश्वास होता.एकदा आई त्या गुजराती काकांकडे गेली आणि म्हणाली की,"जरा माझ्या मुलीच्या लग्नाचे किंवा नोकरीचे काही जमेल का बघता का?". त्यावर त्यांनी थोडा वेळ शांत बसून सांगितले की,"लग्नाचा तर काही सध्या योग दिसत नाही पण तिला बरोबर 21 दिवसात नोकरीचा योग आहे". आईने मला त्यांच्याकडून आल्यावर हे सांगितले. मी म्हणाले,"आज एप्रिल ची तीस तारीख आहे बघूया किती खरे ठरते ते". आणि अशीच साधारण महिन्याभराने आईने भजी केली नाही म्हणून मी चिडून कॉटवर पडले होते. तेवढ्यात घरमालकांचा जयंत आला, तो म्हणाला,"अगं झोपलीस काय तुझे नाव मी झेडपीच्या ऑर्डर मध्ये पाहिले". तेव्हा निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि आमच्या गल्लीतला थोरात म्हणून एक मुलगा उपोषणाला बसला होता, त्यामुळे तिथेच त्याच्या हातात ऑर्डर दिली होती. आणि हा जयंत कशासाठी तरी तिथे गेला होता आणि त्याने ते पाहिले. ती बातमी ऐकल्यानंतर जो आनंद झाला तो काय  वर्णावा. अगदी सिनेमात पाहतो तसे वाटले. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी मे महिन्याची 21 तारीख होती वर्ष होते 1980. त्या गुजराती काकांनी सांगितलेले भविष्य अगदी खरे झाले होते. कारण ऑर्डर वर 22 मे 1980 तारीख होती आणि ती मला रजिस्टर ने मिळणार होती. पण मला मिळणार ते पण आधीच कळले. जयंत म्हणाला,"समोरच्या वाड्यातल्या मुळकांच्या मुलाला सांगू की ते रजिस्टर लवकर आणून दे म्हणून" कारण तो पोस्टात होता. पण कसले काय पोस्टात माझ्या दादांचे यादव नावाचे मित्र होते. ते त्याला म्हणाले,"तिलाच इकडे पोस्टात यायला सांग". पोस्ट जवळच होते. मग मी पाच रुपये घेऊन पोस्टात गेले. ते यादव म्हणाले" पेढे दे ". तेव्हा मी म्हणाले,"हे काय पेढ्यासाठी पाच रुपये घेऊन आले आहे". तेव्हा ते म्हणाले,"असू दे असू दे आधी जाऊन हजर हो मग बघू पेढ्याचे". मग काय ऑर्डर घेऊन आले तरंगतच घरी. त्या गुजराती काकानी सांगितल्याप्रमाणे 21 व्या दिवशी ते पत्र आले. 

           काहीवर्षांनी  माझ्या भाऊजींची बदली कराडला झाली. त्यांना खोली मिळेपर्यंत आम्ही चौघं ,माझी ताई भाऊजी आणि त्यांची तीन मुलं एवढे त्या एका खोलीत राहत होतो. तरीही त्यावेळी काहीच अडचण वाटली नाही. त्यानंतर त्यांना बुधकर वकिलांच्या चाळीत दोन रूमची खोली भाड्याने मिळाली. ते तिकडे राहायला गेले.           माझी लिलाताई खूप अगत्त्यशील होती. त्यामुळे काल्याहून कराडला येणारे लोक आता आधी ताईकडे जात आणि मग आमच्याकडे येत. तिचाही माझ्यावर खूप जीव होता. मी पहिलीत असल्यापासून नेमके माझ्या रिझल्टच्या वेळी ताई-भाऊजी सुट्टीमुळे कराडला यायचे. माझा रिझल्ट लागला की भाऊजी पैसे काढून द्यायचे आणि म्हणायचे,"जा पेढे आण जा". भाऊजींची पर्सनॅलिटी पाहता स्वभाव रागीट वाटायचा. त्यामुळे आम्ही सगळी भावंडे त्यांना घाबरून असायचो. ते नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असायचे. आम्ही ताईकडे गेलो असताना मी म्हणाले की आम्हाला भगवत गीता शिकवत आहेत मला एक छोटी गीता आणायची आहे. त्यांनी लगेच एक छोटी गीता काढून मला दिली आणि म्हणाले,"ही घे, ही तुझ्या कंपास मध्ये बसेल."मी आठवीत असताना त्यांनी दिलेली ती गीता अजूनही माझ्याकडे आहे. गुरुकृपा म्हणायची दुसरे काय? भाऊजींना आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा. माझी ताई पण सुगरणच होती. मला तिच्या हातचे जेवण खूप आवडायचे, छानच करायची. तिला चार मुलगे आणि एक मुलगी होती. अनंताच्या पूजेला तर आमच्या काकांची फॅमिली,आम्ही सगळे, माझा अण्णा तोही ओगलेवाडीला बदलून आला होता, त्याचे कुटुंब शिवाय तिच्या सासरचे लोक असे सगळे यायचे. एवढ्या सगळ्यांचे ती अगदी मनापासून करायची. हसत मुखाने, कधी दमले बाई म्हणालेली मला आठवत नाही. 

        माझा भाऊ अण्णा, त्याचाही माझ्यावर खूप जीव होता. तो ग्रामसेवक होता आधी तो किन्हईला होता, त्यानंतर वाघोलीला, जिथे जिथे त्याची बदली होईल तिथं तिथं आम्ही जाऊन राहायचो. तिथल्या लोकांना भेटायला न्यायचा त्यांना कौतुकाने ही माझी धाकटी बहीण आणि आई म्हणून ओळख करून द्यायचा. तो ग्रामसेवक असल्यामुळे  त्याला  सगळे अण्णासाहेब म्हणत. तो जिथे जिथे गेला तिथे त्यानेही माणसे जोडली. त्याच्याकडे सुट्टीत महिना पंधरा दिवस आम्ही जाऊन राहत असू. जवळपास जे पाहण्यासारखे असेल तिथे तो आम्हाला दाखवायला न्यायचा. त्याची मित्रमंडळी देखील चहासाठी बोलवत. त्याचाही स्वभाव फार गंमतशीर होता. त्याने भिंतीवर देवांच्या काही फ्रेम्स लावल्या होत्या. तेव्हा तो सांगायचा की हा अमका देव हा तमका देव आणि नंतर तिथे एक कॅलेंडर लावले होते ते दाखवून म्हणायचा आणि हा देव आनंद.  एकदा आम्ही दोघं एका दुकानात काहीतरी आणायला गेलो होतो. तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि म्हणाली की, "एक रुमाल द्या "तेव्हा हा म्हणाला की, "हो हो लवकर द्या. "आणि माझ्याकडे बघून मिश्किल पणे हसत होता. कारण ती मुलगी सारखी नाक फुरफुर करून ओढत होती. तो रिटायर झाल्यावर माझे काका वारले तेव्हा त्याने एक पांढरा शर्ट आणि विजार घातली होती. थोडे इकडच्या तिकडे झाल्यावर मला म्हणाला,"अगं हे कपडे मी कोणाच्या अशा कार्याला जाताना घालायलाच ठेवले आहे, कारण हे शिवल्यापासून सारखे कुणाच्या ना कुणाच्या कार्यालाच जावे लागते आहे". आणि म्हणाला "असं कार्याला का होईना यायचे म्हणजे मला बरा टाईमपास झाला आहे" कारण तो ओगलेवाडीत राहत होता आणि बाकी  सगळे कराडमध्ये. आईचा पण माझ्या सर्व भावंडांवर जीव होता. सख्खे सावत्र असे कधी मनातही आले नाही. एकदा मी आणि आई ओगलेवाडीला अण्णा कडे गेलो होतो, त्याचवेळी तो समोरून येताना दिसला. त्याला पाहून आई म्हणाली,"बघ कसा अमिताभ बच्चन सारखा दिसतोय" कारण तो खूप उंच होता आणि त्याने दाढी वाढवली होती आणि ती पांढरी झाली होती. आमच्या वहिनी नेमक्या बुटक्या आहेत. त्यामुळे त्यांना जया-बच्चन ची जोडी असे म्हणायचो. फक्त अरुणचा सहवास मात्र मला जास्त लाभला नाही. तो पण ग्रामसेवक होता. पण तो लांब कोकणात असायचा. त्यामुळे त्याच्याकडे जाणे झाले नाही तो येईल तेवढाच त्याचा सहवास.

                          विलास आणि सु हे दोघे रिमांड होम मधून बाहेर आल्यावर घरीच होते. आधी विलास आला. त्याचे आणि माझे फार जमायचे. मी पाचवीत गेले तरी तो मला पाठीवर उचलून घ्यायचा. मी सहावीत गेले त्यावर्षी गणिताचे पुस्तक बदलले होते आणि बरीच दुकाने शोधली पण मला काही पुस्तक मिळाले नाही. मग विलास म्हणाला तुझ्या एखाद्या मैत्रिणीचे पुस्तक आण मी लिहून काढतो, त्याचे अक्षरही छान होते. त्याने थोडे लिहायला सुरुवात केली, आणि मग ते पुस्तक मिळाले. त्याने मला सायकल चालवायला शिकवली.  विलास मला सायकल वरून काल्याला घेऊन जायचा. त्याचाही स्वभाव विनोदी होता. दुसरे म्हणजे त्याला एक सवय होती आपण म्हणालो ना,"  जेवण तयार आहे जेवून घे " तर तो म्हणणार "मला आत्ता भूक नाही" आणि एखाद्या वेळेस स्वयंपाक तयार नसेल तर म्हणणार,"मला सिनेमाला जायचे आणि अजून स्वयंपाक तयार नाही". असा उलट वागायचा म्हणून कधी आपण त्याला उलट सांगितले तर मात्र बरोबर सुलट वागायचा. एकदा तो सांगत होता की, हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या वेटरला म्हणालो की,"रवा लाडू दे" वेटर म्हणाला" रवा लाडू नाही ". तर हा म्हणाला मग " गरा लाडू दे ". "तर तो वेटर माझ्याकडे बघून हसला". हा किस्सा त्याने सांगितल्यावर आम्ही सुद्धा खो-खो हसलो आणि त्याला म्हणालो की,"अरे रवा आणि गरा एकच आहे" वडिलांच्या नंतर तो आणि मी एका ताटात जेवायचो. त्याचे मिल्ट्रीतले मित्र त्याला भेटायला यायचे, ते म्हणायचे ,"तुम्ही सावत्र भावंडे आहात यावर विश्वास बसत नाही". एकच खोलीत असल्याने सगळे समोरच असायचे. एकदा विलास त्याच्या एका खेड्यातल्या मित्राकडे जाऊन आला होता. त्यानंतर त्याचा एक मित्र भेटायला आला. तर याने त्याला अण्णांच्या म्हणजे घर मालकांच्या ऑफिसमध्ये बसवले, आणि तिथे नेऊन चहा दिला. सगळे झाल्यावर तो मित्र म्हणाला,"चला आता आईची आणि श्यामाची गाठ घेतो आणि जातो". आणि तो आम्हाला भेटायला घरात आला. तर त्याचे काय झाले होते. खेड्यात मोठी घरे असतात. आणि बायका सहसा बाहेर येत नाहीत हे त्याने त्या खेड्यातल्या मित्राकडे पाहिले होते म्हणून तो पण तसे करायला गेला, पण त्याचा झाला पोपट.  पुन्हा काही तो असले करायच्या भानगडीत पडला नाही. 

         पुढे तो मिलीटरीमधून रिटायर झाल्यावर कोल्हापुरला राजाराम कॉलेजला,सुरक्षा रक्षक म्हणुन कामाला लागला. एकदा त्याच्याकडे कोल्हापूरला आम्ही गेलो होतो. बऱ्याच वर्षात तिथे राहणारी माझी मैत्रीण आशा नाईक हिला भेटले नव्हते. तिचा पत्ता शोधून काढून आम्ही दोघेच तिच्या घरी गेलो. तिने छान पोहे आणि चहा केला. खूप गप्पा मारून घरी आलो. त्यानंतर विलास मला म्हणाला की,"अगं तुझ्या मैत्रिणीने तुझ्यासाठी एक महत्त्वाची वस्तू दिली, थांब मी तुला देतो." आणि त्याने खिशात हात घातला. मला वाटले तिने मला न देता याच्याजवळ एवढे काय बर दिले असेल. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. त्याने त्याची मूठ अगदी अलगद उघडली आणि काय एक छोटासा हरभऱ्या एवढा खडा होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. तर म्हणतो कसा,"अग तिने पोहे खायला दिले होते ना त्यात सापडला मला". मग काय बसलो आम्ही हसत. 

                मी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याच्याकडे गेले होते. वहिनी म्हणाल्या होत्या की मी सगळे करते, तसे त्या हौसेने सगळे करतात. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर रोज सकाळी उठल्यावर विलास मला ताजे ब्रेडचे स्लाईस आणि एक मोठा ग्लास भरून गरम दूध द्यायचा. त्याचे पण माझ्यावर आणि आईवर खूप प्रेम होते. तरीही कधी कधी आमच्यात रुसवे फुगवे अबोला एक एक दोन दोन वर्षे चालायचा, कारण तसं किरकोळच असायचं. पण आईसारखी आण्णाला विचारायची की,"विलास कसा आहे रे? तो सारखा माझ्या स्वप्नात येतो". असे आम्ही सगळे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले होतो. सख्खे सावत्र असले आमच्या डोक्यातही नसायचे. तर असाच एकदा एक वर्षाचा अबोला होता. आणि अण्णाच्या सगळ्यात धाकट्या मुलाचे सोमाचे लग्न होते, त्यासाठी आम्ही सगळे ओगलेवाडी जमलो होतो. लग्न वगैरे झाल्यावर आई अशीच गप्पा मारत बसली होती. मीही तिथेच उभी होते. तेवढ्यात विलास समोरून आला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून नुसता रडत होता. आईच्या पण डोळ्यातून दोन दोन धारा आणि माझ्यापण. आम्ही कोणीच काही बोलत नव्हतो. फक्त अश्रूंचा अभिषेक सुरू होता. अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात आपसूकच पाणी येते. अगदी आताही हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत पुढचे लिहायला दिसेना.                            

            दादा असताना स्वातंत्र्य सैनिक पेन्शन चा काहीतरी जीआर आला होता, त्यासाठी एक वर्षाची कैद ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भोगली त्यांना पेन्शन मिळणार होती. त्यासाठी त्यांनी जिथे जिथे कैद झाली होती तिथले दाखले मागवले होते. त्यांची कैद एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त होती. पण काही ठिकाणाहून रेकॉर्ड उपलब्ध नाही असे पत्र आले होते. पण तरीही जेवढे दाखले मिळाले होते ती एक वर्षाची होती. त्यांचे निधन झाले त्यामुळे तात्पुरते सानुग्रह अनुदान म्हणून सरकारकडून एकूण पाच हजार रुपये मंजूर झाले होते. माझ्या वडिलांचे मित्र राजाराम पाटील म्हणून होते त्यांनाही गोष्ट कळली. त्यांनी सचिवालयात जाऊन सांगितले की हे पैसे तुम्ही त्यांना एक रकमी देण्यापेक्षा दरमहा ठराविक रक्कम द्या. आणि त्या लोकांनी पण दरमहा 100 रुपये असे तहसील कार्यालयात पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी हेही नसे थोडके, तेवढाच ' बुडत्याला काडीचा आधार '. कारखान्यातील मालापासून तयार केलेले मिश्रीचे  पुडे विक्रीसाठी पाठवले पण लोकांनी पैसे बुडविले. आधी चे जे  मटेरियल होते त्याचे पैसे द्यायचे होते. आईला वाटले होते की हे सगळे विकून झाल्यावर ते पैसे देता येतील, पण पैसे आलेच नाहीत. जयसिंगपूरहून त्या माणसाचे सारखे, तगादे यायला लागले की पैसे पाठवा म्हणून. आई तर हतबल झाली होती. एक दिवस त्यांचे पत्र आले की मी समक्ष येऊन जे असेल ते जप्त करतो, त्याप्रमाणे तो माणूस एक दिवस आला. घरातले जुजबी सामान पाहून त्याला परिस्थितीची कल्पना आली. आणि तो आल्या पावली काहीही न बोलता परत गेला. त्यानंतर त्याने कधीही पैसे मागितले नाहीत. आईने मग शिलाई वरच भिस्त ठेवली. कसेतरी दिवस पार पडत होते. दादा गेले त्यावर्षी तर मी अकरावीत नापासच झाले. शरदनेच रिझल्ट आणला होता. मी तर अगदी निराश झाले. पण सगळ्यांनी समजावल्यावर मी पुन्हा तयारीला लागले. आईला मिळणारे पाच हजार रुपये संपल्यावर ते मिळणारे पैसे बंद झाले. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवांना मिळणाऱ्या पेन्शन साठी दादांचे जवळचे मित्र रामजी पाटील (ज्यांना मी आप्पा म्हणते) त्यांनी तिला अर्ज करायला सुचवले वेळोवेळी सातारला येऊन मार्गदर्शनही केले. तिने स्वतः पण कोर्टात जाऊन अ‍ॅफिडेव्हीट करून, कोर्टासमोर जे काही करावे लागेल ते केले. माझी वाघीण आई सगळीकडे बेधडक एकटी लढत होती. मी एवढी अकरावी झाले तरी मला अजिबात मॅच्युरिटी नव्हती. जेवढी आत्ता माझ्या बारा वर्षाच्या नातीला काव्याला आहे. माझे दादा 1970 मधे गेले आणि 1972 ला आईला शंभर रुपये आणि मला 50 रुपये वयाचे 24 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत मंजूर झाले. ते मंजुरीचे पत्र आले तेव्हाही अरुणा बाहेर होती. त्या पत्रावर आड्नाव चुकीचे होते . तिने तिथेच पोस्टमनला सांगितले की इथे कोणी मोरेवाडीकर रहात नाही. पण आधी आईचे नाव  होते. आणि आईने हे ऐकले होते ती म्हणाली,"ते माझेच पत्र आहे आडनाव चुकले आहे ते मी ऑफिसमधून दुरुस्त करून आणेन". नशीब ते रजिस्टर पत्र असल्यामुळे आईच्या सहीसाठी आमच्यापर्यंत आले. तहसील कार्यालयातील ते माने होतेच, त्यांना आईने विचारले तेव्हा ते म्हणाले सातारच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. मग माझी वाघीण निघाली त्या मोहिमेवर तेही एकटीच. तेव्हा सातारचे ऑफिस राजवाड्यामध्ये भरत होते. तिथे गेल्यावर ऑफिस मधला क्लार्क म्हणाला,"द्या इकडे मी ते दुरुस्त करून देतो". त्यावर आई म्हणाली,"नको, ते जिथून आले आहे तिथेच पाठवा ". त्यावेळी हे तिने मला सांगितले होते पण मला त्याचे काही विशेष वाटले नव्हते. पण आता विशेष वाटते कारण माझी आई कशीबशी चौथीपर्यंत शिकलेली होती. आणि तिला हे कसे सुचले असेल. त्यानंतर ते पत्र दुरुस्त होऊन आले. ती पेन्शन केंद्र सरकारने मंजूर केलेली होती. नंतर राज्य सरकारने पण शंभर रुपये दरमहा आईला  पेन्शन मंजूर केली. दोन्ही पत्रे इंग्लिश मध्येच होती. आईला इंग्लिश येत नव्हते. पण कसे कोण जाणे कधी कशासाठी पत्र लागले तर ती बरोबर हे केंद्र सरकारचे हे राज्य सरकारचे असे म्हणून शोधून द्यायची. त्याचे मात्र मला तेव्हाही कौतुक वाटायचे, आणि नेहमीच वाटते. घरमालकांचे सगळे भाऊ तिला बहिणीचा मान देत. पैकी आप्पा सगळ्यांच्या वतीने तिच्याकडून भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला न चुकता ओवाळून घेत. आणि त्यांच्या घरातील मुले माझ्याकडून ओवाळून घेत. त्यापैकी सुरेश नेहमी मला 50 पैशाचे लॉटरीचे तिकीट ओवाळणी मध्ये द्यायचा. आप्पांचा रवी अगदी चार-पाच वर्षांचा होता. तो पण माझ्याकडून ओवाळून घ्यायला आला. ओवा आल्यावर त्याने मला खिशातून 50 पैसे काढून ओवाळणी दिली. मी म्हणाले,'"अरे नको काही देऊस मोठा झाल्यावर दे काय द्यायचे ते". पण तो काही ऐकेना. शरद मात्र काही ना काही विशेष वस्तू देत असे. फक्त भाऊबीज आणि राखी पौर्णिमेला नाही तर माझ्या वाढदिवसाला देखील आवर्जून काहीतरी विशेष भेट देई. त्यासाठी त्याला कुठून पैसे मिळाले असतील हेही विचारले नाही.  मी मात्र करंटी त्याचा वाढदिवसही लक्षात ठेवला नाही.

            आईसारखीच ही इतर कमी शिकलेली माणसेही खूप हुशार होती. म्हणजे आईला पेन्शन मंजूर झाली त्यापूर्वी त्यांनी तिच्या जन्माचा दाखला मागितला होता. यापूर्वी त्याची कधीच गरज पडली नव्हती. तिचा जन्म पाटण तालुक्यातला. पुन्हा मानेंना विचारले ते म्हणाले,"पाटण तहसील कार्यालयात अर्ज द्यावा लागेल." तेव्हा नेमके नरसिंहपुरचे आबासाहेब पाटील आमच्या वाड्यात राहायला होते त्यांचे मेहुणे पाटण तहसील कार्यालयात होते. मग त्यांनाच पत्र लिहायचे ठरले. तेव्हा घरमालक आण्णंनी सुचवले की, 1930 नंतरचे आणि 1935 च्या आधीचे रेकॉर्ड चेक करावे लागेल. आणि आईचा जन्म 19 ऑगस्ट 1932 चा होता. या गोष्टीचेही त्यावेळी विशेष वाटले नव्हते पण आता नवल वाटते आहे. मनोमन अण्णा नाही नमस्कार करते आहे. तसेच माझे दादा गेल्यानंतर वाड्यात आम्हाला जी सुरक्षितता मिळाली त्याचे ऋण आम्ही आयुष्यात विसरणार नाही. कारण माझे दादा गेले तेव्हा मी सतरा वर्षांची आणि आई फक्त 38 वर्षांची होती.

              आणखी एक प्रसंग म्हणजे एकदा कसल्या तरी निवडणुका होत्या. त्यामध्ये दोन उमेदवार आमच्या दादांचे मित्र होते. एक होते शामराव मुळीक पैलवान आणि दुसरे होते जिरगे. तेव्हाही घरमालक आप्पा आमच्याकडे आले आणि आईला म्हणाले,'तुम्ही त्या अमक्याला मत द्या". आई म्हणाली,"हो  मी देईन त्यांना मत" त्यावर अप्पा म्हणाले,"नुसते हो नाही तो देवाचा तांब्या घ्या, त्यावर हात ठेवून हो म्हणा". ही म्हणाली," मुळीच नाही, मी एकदा शब्द दिलाय ना तो मी खरा करेन". अशी स्पष्टवक्ती होती ती. मला त्यावेळी भीती वाटलेली, पण आप्पांनी कधी त्या गोष्टीचा आकस मनात ठेवला नाही. तसेच माझे दादा गेल्यानंतर एकदा अप्पा आले आणि म्हणाले की,"दादांनी मला सांगितले आहे की त्या सोनाराकडे त्यांनी आईची एकदाणी गहाण ठेवली आहे, ती आपण आणूया". ते परत आणण्याएवढे पैसे आमच्या जवळ होते. एकदा मला कॉलेजला पास काढायला पैसे नव्हते. त्यावेळी फक्त नऊ रुपये मध्ये कराड स्टॅन्ड ते विद्यानगर असा पास मिळायचा. तेव्हा मात्र आईने घर मालकांकडून नऊ रुपये घेतले होते. धन्य ते घर मालक आणि धन्य ते  भाडेकरू. कधीही असे जाणवले नाही की ते घर मालक आणि आम्ही भाडे करू. असा जिव्हाळा आणि असे प्रेम पुन्हा कधी अनुभवायला मिळाले नाही.

            त्यांच्यातली आणखी एक व्यक्ती म्हणजे अण्णांचा शरद. तो इकडून तिकडून यायचा आणि आमच्या दाराजवळच भिंतीवर जो आरसा होता त्यामध्ये भांग पाडत उभा राहायचा. कधी कधी त्याच्याशी जास्त संवादही नसायचा. एकदा असेच डॉक्टर शांताराम पोतदार हे अमचे काल्याचे स्नेही कधी कधी आमच्याकडे येत ते आले आणि दारात उभे राहिले. आम्ही दोघी पोळ्या लाटत होतो. एकीने लाटायची आणि दुसरीने भाजायची असे आमचे सुरू असायचे. तर ते शांताराम पोतदार येऊन दारात उभे होते आणि आम्हाला वाटले नेहमीप्रमाणे शरद असेल म्हणून आम्ही पाहिले नाही. तेव्हा ते आश्चर्याने म्हणाले,"मी पाच मिनिटे झाले इथे उभा आहे आणि तुमचे लक्ष नाही". तेव्हा कुठे आम्ही पाहिले आणि त्यांना म्हणालो की आम्हाला वाटले नेहमीप्रमाणे शरदच आहे.".

           शरद चा मित्र सुरेश लाटे म्हणून होता त्याचे दुकान मंडईत होते. शरद त्याच्याकडे दिवसातून दहा वेळा जायचा. आणि मधून मधून आईला विचारायचा,"तुमची तपकीर आणायची आहे का ?"आणि येता जाता घेऊन यायचा. तेव्हा कोणाकडे फ्रिज मिक्सर गॅस असे काही नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यात कोणी आमच्याकडे आलेले दिसले की शरद विचारायचा,"लिंबू आणायचे आहे का?"आणि घेऊन यायचा. तो जसा काही आमच्या घरातलाच सदस्य होता. एकदा मी काल्याला यशवंत मास्तरांच्या वासंतीकडे एक दोन दिवस राहायला गेले होते. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी शरद हजर, म्हणाला,"तुला आईने बोलावले आहे, तुझे मामा आले आहेत." माझे सख्खे मामा तेव्हा मुंबईत टॅक्सी चालवायचे आणि कधीतरी गावाकडे आले की आईला भेटायला कराडला यायचे. पाच भावंडांमध्ये दोन मामा आणि दोन मावश्या यामध्ये माझी आई तीन नंबरची होती पण का कुणास ठाऊक ही सगळ्यांची लाडकी होती.



No comments:

Post a Comment

आत्मानंद - प्रेमा नरेवाडीकर - 4

            मला बाहेर जायचे म्हटले की आई किंवा कोणीतरी मैत्रीण बरोबर हवी असायची. त्यामुळे माझे सगळे अर्ज पोस्टात जाऊन शरदच रजिस्टर करायचा. त...