मला बाहेर जायचे म्हटले की आई किंवा कोणीतरी मैत्रीण बरोबर हवी असायची. त्यामुळे माझे सगळे अर्ज पोस्टात जाऊन शरदच रजिस्टर करायचा. तेव्हा झेरॉक्स नव्हते त्यामुळे मार्कलिस्ट किंवा कुठलेही सर्टिफिकेट त्याचे फॉर्म स्पेस मध्ये मिळत. ते हाताने लिहून ते गॅझेटेड ऑफिसर करून सही करून घ्यावे लागायचे. तेही काम शरद करायचा. माझ्या सगळ्या मैत्रिणी त्याला माहिती होत्या. त्यांनाही काही द्यायचे असेल किंवा त्यांच्याकडून काही आणायचे असले तरी तोच जायचा. एवढेच नाही तर माझे सगळे भाऊ परगावी असल्यामुळे, माझ्या दादांच्या श्रद्धाचा नैवेद्य नदीला सोडायला पण तो जायचा. त्याचे मामा कराड मध्येच होते. त्यामुळे तो कधी कुठल्या गावाला गेला नव्हता. आम्ही पुण्याला मावशीकडे सुट्टीत जायचो, एकदा त्याची अकरावी झाल्यावर सुट्टी होती, तेव्हा त्याला घेऊन आम्ही पुण्याला गेलो होतो. माझ्या भावाने विलास ने एक छोटा कॅमेरा आणला होता, त्यावर तो फोटो काढायला शिकला आणि आता चांगला फोटोग्राफर झाला आहे.
मी कॉलेजला जायला लागले तेव्हा मी कॉलेजला गेले असताना आईला चक्कर आली होती. मी परत येईपर्यंत वाड्यातल्या सगळ्यांनी तिला दवाखान्यात नेऊन ऍडमिट केले होते. आणि घरी पण माझ्या जेवणापासून सगळी काळजी घेतली. रात्री आईजवळ थांबायला दिलीपच्या आई गेल्या आणि घरी माझी काळजी घ्यायला ही सगळी. वाड्यात कुणालाही काही झाले आणि त्या घरातले दुसरे कोणी नसले तर सगळे मिळून त्यांना दवाखान्यात नेणे छोटे कुणी असेल तर त्याची काळजी घेणे असे करायचे. बारा कुटुंबे असली तरी सगळी एकाच प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली होती. कधी कुणी कुणाचा दुस्वास किंवा राग राग केल्याचे आठवत नाही. आणि पाण्यावरून कधी काही छोटेसे भांडण झाले आणि एकमेकात अबोला झाला तर पुन्हा कधी एकमेकांशी बोलतो असे व्हायचे.
मला नोकरीचा कॉल येण्यापूर्वी माझे आणि पेन्शन शिलाई असे बचत केलेले बँकेत काहीतरी हजार की काही रुपये उरले होते. एक दिवस मी आणि आई विचार करत होतो की, अजून नोकरीचे काही दिसत नाही हे पैसे संपल्यावर काय करायचे? पण परमेश्वराला काळजी असते. सिनेमात घडते तसा कॉल आला. त्या ऑर्डरमध्ये एकूण 13 लोकांची नावे होती. मध्ये कराड मधले आम्ही तिघे होतो. एक ची मैत्रीण आणि अंजू क्षीरसागर आणि दुसरा तो थोरात म्हणून उपोषणाला बसलेला मुलगा. ऑर्डर मध्ये लिहिले होते की 30 तारखेपर्यंत कधीही हजर व्हा. मग काय मी ठरवले की 30 तारखेला हजर हो. पण अण्णा आला आणि त्याला ते पत्र दाखवून मी म्हणाले की," मी तीस तारखेला हजर होईन."पण अण्णा म्हणाला,"अगं तसं नसतं ते तू लगेच हजर हो कारण पुढे सीनियरिटी लिस्ट मध्ये तुझे नाव मागे राहील".
ऑफिसला गेले तर तिथे मनोरकर नावाच्या B.D.O. होत्या. त्यांची पर्सनॅलिटी पाहून माझा जीव दडपून गेला. शिंदे साहेबांनी त्यांना सांगितले होते आणि माझ्याजवळ चिट्ठी पण दिली होती. त्यांना सांगितले होते की या मुलीला तिच्या जवळच्या ऑर्डर प्रमाणे हजर करून घ्या. कारण ऑफिसची कॉपी कदाचित उशिरा पोहोचेल. त्या शिंदे साहेबांना चांगल्या ओळखत होत्या. त्या म्हणाल्या," हम भैरू पैलवान ने चिट्ठी दिली आहे का ?". त्यांनी माझ्या ऑर्डरवरून मला हजर करून घेतले. हजार रिपोर्ट कसा लिहायचा इथून सुरुवात. तिथं सगळे सीनियर होते ते अकरावी होऊन लागलेले आणि एखादा दुसरा सीनियर असिस्टंट बाकीचे सगळे ज्युनिअर असिस्टंट होते. माझे शिक्षण एम. ए. म्हणून मला माने साहेबांनी सांगितले होते की, तू सीनियर असिस्टंट म्हणूनच फॉर्म भर. त्यामुळे मला सीनियर असिस्टंट म्हणून अपॉइंटमेंट मिळाली होती. सगळ्यांच्या नजरेत कौतुक स्पष्ट दिसत होते. पहिल्यांदा मला कोणीतरी मॅडम म्हणत होते. मला आतून खूपच मजा वाटत होती. कधी एकदा घरी जाते आणि आईला ही गंमत सांगते असे झाले होते. मी नवीनच हजर झाले होते आणि दुसऱ्या दिवशी त्या B.D.O. मला म्हणाल्या,"चला तुम्हाला बीबीला नेते ". मी मनात म्हटले आता ही कुठली बीबी? मग गेलो आम्ही मस्तपैकी ऑफिसच्या जीपमधून. पाटण तालुक्यात बीबी नावाचे गाव आहे तिथे नेले त्यांनी. त्यानंतर एके दिवशी त्या म्हणाल्या "चला तुम्हाला म्हावशी दाखवते ". मला मला वाटले आता कुठल्या मावशीला भेटायला नेत आहेत. तर त्या नावाचेही गाव होते. अजून माझे ऑफिस काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे माझी मजा आणि कौतुक सुरू होते. संध्याकाळी परत जाताना मात्र बस मध्ये पेंगळून झोप यायची. पण घरी गेल्यावर हे सगळे आईला सांगायचे असायचे. तिला पण वाटायचे आता माझी लेक साहेब झाली. वाड्यात पण सगळ्यांना कौतुक वाटत होते. तिथे पाटणच्या ऑफिसमध्ये पण मी एकटी आणि आणखी एक पाठकजी म्हणून मुख्य सेविका होत्या. पण त्यांची फिरती असल्यामुळे त्या ऑफिसला एक दोन दिवसच असायच्या. त्या असल्या की आम्ही दोघी एकत्र डबे खायचो. त्या नसल्या की मी मीटिंग हॉलमध्ये बसून एकटी डबा खायचे. मला संकोच वाटायचा. अजून ओळखी पण झालेल्या नव्हत्या. नेमकी मी तिथे हजर झाले आणि आठ दहा दिवसात माणिक ची बदली सातारा झाली.
मी सकाळी लवकर उठून घरातून निघायची. मधली सुट्टी अडीच ला व्हायची म्हणून मी एका डब्यात पोहे किंवा काहीतरी आणि दुसरा डबा जेवण असा घेऊन जायची. माझी एक सरला देशमुख नावाची मैत्रीण पाटणला राहायची , ती एम ए ला माझ्या वर्गात होती , तिचे वडील डॉक्टर होते. तिचे घर ऑफिसला जायच्या वाटेवर होते. आधी तिच्या घरी तो छोटा डबा खाऊन मग मी ऑफिसला जायची. मनोलकर B.D.O. माझे लाड करत होत्या. पण एके दिवशी त्यांनी मला पाठक ची बाईच्या बरोबर पाहिले. या दोघींचे काय वाकडे होते देव जाणे. पण मला सगळ्यांसमोर रागावल्या आणि म्हणाल्या,"ऑफिस वेळेत मला बाहेर गेलेले चालणार नाही". कारण पाठक जी वाहिनी मला त्यांच्या घरी नेले होते, त्यांचे घर जवळ होते आणि त्यांचा फिरकीचा जॉब असल्यामुळे त्यांना वेळेचे बंधन नव्हते. त्यानंतर मात्र मी ऑफिस वेळ कधीही इकडे तिकडे गेले नाही. फक्त B.D.O. बाईंनी कुठे नेले तरच त्यांच्याबरोबर तेवढी जायची. एकदा त्या म्हणाल्या,"चला तुम्हाला कोयनेचा युनिफॉर्म दाखवते" हे सगळे माझ्यासाठी मजेशीर होते. कोयनेतील लोक फक्त लंगोट वर असायचे म्हणून त्या तशा म्हणाल्या होत्या हे मला तिथे गेल्यावर कळले. अजून मला कुठला कार्यभार सोपवला नव्हता. मला वाटले की मी 22 मे ला हजर झाले आहे म्हणजे आता बहुतेक माझा पगार पुढच्या महिन्यात सुरू होईल. पण ऑफिसमध्ये एक शेती अधिकारी पाटील म्हणून होते ते म्हणाले,"मॅडम तुमचे दहा दिवसाचे पगार बिल करा, मी तुम्हाला दाखवतो कसे करायचे ते" त्यांनी सांगितले तसे मी तयार केले. मला वाटले होते पगार होणार म्हणजे कसा कोण देणार?
महिना झाल्यावर एक एक जण अकाउंट शाखेत जाऊन तिकीट लावून सही करून पगार घेत होते. मीही माझा दहा दिवसांचा 500 रुपये की काय घेतले. त्यादिवशी पण कधी एकदा घरी जाते आणि माझा पहिला पहिला पगार आईच्या हातावर देते असे झाले होते. खरंच आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींचे किती महत्त्व वाटते. आईला पण खूप आश्चर्य वाटले ती म्हणाली,"बाई दहा दिवसांचा पण पगार काढला?" नंतर मला ऑफिसमधले आस्थापना म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार बिल आणि बाकीचे काम दिले. त्यावेळी तिथे जे बी पानस्कर म्हणून होते ते आधी ते काम करत होते. त्यांनी मला या कामात मार्गदर्शन केले. ते सुद्धा ज्युनियर असिस्टंट होते पण मी सगळ्यांशी आदराने वागायचे. मी म्हणायचे की,'"मी जरी सीनियर असिस्टंट असले तरी तुमचा सगळ्यांचा अनुभव मोठा आहे". त्यामुळे तेही सगळे माझ्याशी आदराने वागत, त्यांना वाटायचे की हिला गर्व नाही. मला आस्थापनेचे काम आवडायला लागले. कोणाची रजा वगैरे असेल तर त्याच्या नोंदी कशा घ्यायच्या, प्रत्येक महिन्यात कोणाचे इन्क्रिमेंट असेल तर त्याप्रमाणे पगार काढायचा अशी वेगवेगळी कामे होती. हे सगळे ते पानस्कर होते त्यांनी मला शिकवले. मला खूप इंटरेस्ट वाटायचा. एक दिवस ते म्हणाले आपण तुमचे सेवा पुस्तक भरुया त्यासाठी डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागेल. ऑफिसमध्ये एक ढालाईत म्हणून होते ते मीटिंग चे काम पाहायचे आणि स्टोअर क्लार्क म्हणून पण काम करायचे. ते पण कराड होऊन येऊन जाऊन करत होते. ते मला म्हणाले," इथे पाटण पी एच सी आहे, तिथे जाऊन आपण चेकअप करूया. इथे डॉक्टर खोत म्हणून आहेत ते सर्टिफिकेट देतील. ऑफिस पासून पी एच सी फार लांब नव्हती. ढालाईत माझ्यासोबत आले. डॉक्टरांनी तपासून सर्टिफिकेट दिले. मी ढालाइतना विचारले "त्यांना किती पैसे द्यायचे?"तेव्हा ते म्हणाले अहो पीएचसी आपल्या ऑफिसच्या अंडर येतात. सरकारी दवाखाना आहे , काही पैसे वगैरे नाही. हेही पहिल्यांदाच घडले. नंतर मला माझे ऑफिसचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक कपाट दिले होते. त्याला कुलूप नव्हते म्हणून मी नवीन विकत आणले. तेव्हा ढलाईत म्हणाले,"त्याचे बिल तुम्हाला मिळेल". खरंतर ते कुलूप काही फार महाग नव्हते. पण हे सगळे माझ्यासाठी नवलाईचे होते. मला खूप मजा वाटायची. आस्थापनेचे काम मला जमायला लागले मी ते हौसेने सगळे करत होते. हो s आणि दहा दिवसाचा पगार मिळाल्यावर जेव्हा सुट्टी आली तेव्हा जाऊन नवीन चप्पल आणली. वाड्यात सगळ्यांना कौतुकाने दाखवली. शेतात जाणारे घरमालकांचे दादा शेतातून आले की वाड्यात मोठे तुळशी वृंदावन होते तिथे कट्ट्यावर बसत. त्यांनाही चप्पल दाखवली आणि सांगितले की चाळीस रुपयाची आणली आहे. तेव्हा ते म्हणाले की,"चाळीसच रुपयांची का? आता बाप कमाई नाही आप कमाई आहे". मला अजूनच मजा वाटली.
जून महिना सुरू झाला आणि पावसाने सुरुवात केली. पाटण तालुका डोंगराळ भागात असल्याने धुवाधार पाऊस पडायचा. कसेबसे एक दोन महिने येऊन जाऊन केले. तेव्हा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असायची. मग ठरवले की पाटणमध्येच भाड्याचे घर पाहावे. परमेश्वराने जिथे तिथे आधीच सोय केलेली असते पण आपल्याला वाटते मी हे केले अन ते केले. तर पाटण मधील कोर्टात वाड्यात राहणारे एक शिर्के म्हणून होते त्यांचा भाऊ होता. त्याला सांगितले आणि त्याने एक घर दाखवले. ते दोन खोल्यांचे होते, खाली जमीनच होती पण हेही पहिल्यांदाच दोन खोल्या असल्यामुळे आम्हाला छान वाटले. खोली मीच त्या काकांबरोबर जाऊन ठरविली होती. आईने काही ते पाहिलेले नव्हते. तिला मी सांगितल्यावर ती म्हणाली," अगं मला स्वप्न पडले की, घराजवळ एक छोटेसे दत्त मंदिर आहे." मी फक्त खोली पाहिली होती. नंतर राहायला गेल्यावर पाहिले तर खरोखर घर मालकांच्या मालकीचे एक अगदी छोटे दत्त मंदिर होते. त्यावेळी आम्ही तिथे पाच दिवस राहायचो आणि सुट्टी दिवशी कराडला जायचो. घर मालकांची पुढे मागे चाळ होती आमची खोली मात्र एकच मध्ये होती, आमच्या बाजूला तीन तीन भाडेकरू होते.
No comments:
Post a Comment